युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
नाडा इंडिया कडून नवी दिल्लीमध्ये वाडाच्या जागतिक अँटी-डोपिंग गोपनीय माहिती आणि तपास जाळ्याबाबत कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
26 JUL 2025 10:43AM by PIB Mumbai
नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) इंडिया या राष्ट्रीय उत्तेजक सेवन प्रतिबंधक संस्थेने, युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने, वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) या जागतिक उत्तेजक सेवन प्रतिबंधक संस्थेच्या इंटेलिजन्स अँड इन्व्हेस्टिगेशन्स (I&I) अर्थात गोपनीय माहिती आणि तपास कार्यशाळेची दुसरी आवृत्ती 21 ते 25 जुलै 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली होती. ही कार्यशाळा WADA च्या मार्गदर्शनाखाली आणि INTERPOL तसेच स्पोर्ट इंटेग्रिटी ऑस्ट्रेलिया यांच्या भागीदारीत आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला भारत, मलेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, नेपाळ, म्यानमार, भूतान, बांगलादेश, ब्रुनेई दारुस्सलाम आणि फिलिपाईन्स या देशांतील राष्ट्रीय अँटी-डोपिंग संस्था (NADOs) तसेच कायदा अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत सहभागी प्रतिनिधींनी विविध महत्त्वाच्या विषयांवरील गहन चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. यामध्ये गोपनीय माहिती मिळवण्याच्या पद्धती, तपासाच्या कार्यपद्धती, गोपनीय स्रोतांचे व्यवस्थापन, सार्वजनिक माध्यमातून उपलब्ध असलेली माहिती (ओपन-सोर्स इंटेलिजन्स) गोळा करणे, तसेच प्रभावी विश्लेषण आणि मुलाखत तंत्र यांचा समावेश होता. चर्चांमधून खेळाडूंचे संरक्षण आणि स्वच्छ, प्रामाणिक स्पर्धेच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी गोपनीय माहितीवर आधारित सामूहिक प्रयत्नांची वाढती गरज अधोरेखित झाली.
भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे सचिव श्री. हरी रंजन राव यांनी या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक व्यक्त केले. नाडा इंडियाचे महासंचालक श्री. अनंत कुमार म्हणाले,
"या वर्षी मे महिन्यात पहिल्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन झाल्यानंतर, दहा दक्षिण आशियाई देशांमधील प्रतिनिधींसह ही दुसरी कार्यशाळा, WADA च्या गोपनीय माहिती आणि तपास क्षमता तसेच कौशल्य वृद्धी प्रकल्पातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या माध्यमातून जागतिक अँटी-डोपिंग इंटेलिजन्स अँड इन्व्हेस्टिगेशन नेटवर्क (GAIIN) अधिक मजबूत होईल."
WADA चे I&I संचालक, गुंटर युंगर म्हणाले, "आशिया आणि ओशिनिया या क्षेत्रात, गोपनीय माहिती आणि तपास (I&I) क्षमता आणि कौशल्य वृद्धी प्रकल्पाअंतर्गत चौथी कार्यशाळा घेण्यासाठी भारतात पुन्हा येऊन आम्हाला आनंद होत आहे. या महत्त्वपूर्ण कार्यशाळांचे आयोजन आणि यजमानपद स्वीकारण्यासाठी गेल्या काही महिन्यांत सातत्याने केलेल्या प्रयत्नांसाठी मी NADA इंडिया आणि भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे आभार मानतो. भारतात झालेल्या या कार्यशाळा, आशिया आणि ओशिनिया प्रदेशातील NADOs आणि कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये सतत संवाद राहावा, तसेच गोपनीय माहिती आणि तपास कौशल्य अधिक सक्षम व्हावे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील."
ही कार्यशाळा, क्षमता आणि कौशल्य वृद्धी प्रकल्पाचा एक महत्त्वाचा घटक होती. हा प्रकल्प, WADA चा प्रमुख उपक्रम असून जागतिक अँटी-डोपिंग गोपनीय माहिती आणि तपास जाळे (GAIIN) मजबूत करण्यासाठी राबवला जातो. जागतिक भागीदारीला प्रोत्साहन आणि तपास क्षमतेला अधिक बळकटी देत, सहकार्य आणि माहिती-विनिमय वाढवून डोपिंगविरोधी जागतिक प्रतिसाद अधिक प्रभावी बनवणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या महत्त्वपूर्ण जागतिक उपक्रमात सातत्याने योगदान देण्याचा भारताला अभिमान वाटतो. या मालिकेतील अंतिम कार्यशाळा एप्रिल 2026 मध्ये आयोजित केली जाणार आहे.
***
माधुरी पांगे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148879)