आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान आरोग्य मंदिर आणि राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 10.18 कोटी महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी
Posted On:
26 JUL 2025 10:17AM by PIB Mumbai
देशभरात 30 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 10.18 कोटींहून जास्त महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत एक मोठा टप्पा गाठला आहे. हे यश आयुष्मान आरोग्य मंदिरांद्वारे (AAMs) राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत (NHM) राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोगांची (NCDs) तपासणी, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी लोकसंख्या-आधारित उपक्रमाचा एक भाग आहे.
हा उपक्रम 30 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे. या अंतर्गत प्रामुख्याने प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे AAM अंतर्गत उप-आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एसिटिक अॅसिड (VIA) सह व्हिज्युअल इन्स्पेक्शन वापरून तपासणी केली जाते. व्हीआयए पॉझिटिव्ह प्रकरणे पुढील निदानासाठी प्रगत केंद्रांकडे पाठवली जातात.
तळागाळात, मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते (ASHAs) समुदाय-आधारित मूल्यांकन यादी (CBAC) फॉर्म वापरून जोखीम असलेल्या व्यक्ती ओळखून आणि AAMs मध्ये नियमित आरोग्य तपासणी आणि तपासणीमध्ये त्यांचा सहभाग सुलभ करून महत्त्वाची भूमिका बजावतात. आशा संस्था लवकर निदान आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास देखील मदत करतात.
समुदाय पातळीवर आरोग्यविषयक उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि लक्ष्यित संवाद मोहिमा कर्करोग नियंत्रणाच्या प्रतिबंधात्मक पैलूला आणखी हातभार लावतात.
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन आणि जागतिक कर्करोग दिन यासारखे कार्यक्रम नियमितपणे साजरे केले जातात. याव्यतिरिक्त, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया मंचाचा वापर गर्भाशयाच्या कर्करोगासह NCD वर सातत्यपूर्ण सार्वजनिक सहभागाची खातरजमा करतो.
एनएचएम अंतर्गत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्रम अंमलबजावणी योजना (पीआयपी) नुसार जागरूकता निर्माण करण्याच्या उपक्रमांसाठी समर्पित निधी प्रदान केला जातो.
30 वर्षे आणि त्याहून जास्त वयाच्या व्यक्तींसाठी तपासणीच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी मंत्रालयाने 20 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत कालबद्ध एनसीडी स्क्रीनिंग मोहीम देखील सुरू केली होती. या मोहिमेच्या यशामुळे सध्याच्या यशात वाढ झाली आहे.
20 जुलै 2025 पर्यंत, राष्ट्रीय एनसीडी पोर्टलवरील डेटानुसार 30 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 25.42 कोटी पात्र महिलांपैकी 10.18 कोटी महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे. हे आयुष्मान आरोग्य मंदिरांद्वारे व्यापक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरवण्यासाठी सरकारची दृढ वचनबद्धता दर्शवते.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148855)