संरक्षण मंत्रालय
कारगिल विजय दिवस: 1999 साली भारताला विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांच्या अदम्य साहसाला आणि बलिदानाला राष्ट्राचे अभिवादन
Posted On:
26 JUL 2025 1:32PM by PIB Mumbai
26 जुलै रोजी साजऱ्या केला जाणाऱ्या ‘कारगिल विजय दिवसा’निमित्ताने मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या शूरवीरांना राष्ट्र अभिवादन करत आहे. 1999 साली भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक (NWM) येथे हुतात्मा वीरांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.


स्मारकाला भेट देणाऱ्यांच्या नोदवहीत लिहिलेल्या संदेशात, संरक्षण मंत्री महोदयांनी राष्ट्राच्या वतीने वीर जवानांप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. कारगिल विजय भविष्यातील पिढ्यांसाठी शौर्याचे एक अद्वितीय उदाहरण राहील, असे संरक्षण मंत्र्यांनी आपल्या संदेशात लिहिले आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक हे वीरांनी केलेल्या बलिदानाचे जिवंत प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

X या समाज माध्यमावरील संदेशात राजनाथ सिंह यांनी कारगिल युद्धातील अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत देशाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भारतीय वीरांनी दाखवलेले असाधारण शौर्य, धैर्य आणि अटल निर्धाराचे स्मरण केले. "कारगिल युद्धातील भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च बलिदान आपल्या सशस्त्र दलांच्या अटल निर्धाराचे शाश्वत प्रतीक आहे. देश त्यांच्या सेवेचा कायम ऋणी राहील," असे त्यांनी आपल्या संदेशात लिहिले आहे.
कारगिल मधील द्रास येथे, ‘मेरा युवा भारत’ या योजनेअंतर्गत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'कारगिल विजय दिवस पदयात्रेचे नेतृत्व केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले. या पदयात्रेत 1,000 पेक्षा जास्त युवा, सशस्त्र दलाच्या सेवेतील आणि निवृत्त जवान, हुतात्मा वीरांचे कुटुंबीय आणि सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. या पदयात्रेची सुरुवात द्रास येथील हिमाबास पब्लिक हायस्कूल येथून झाली, आणि सुमारे 1.5 किलोमीटर अंतर कापत भीमबेट येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात या पदयात्रेची सांगता झाली.

यानंतर, दोन्ही मंत्री 100 युवा स्वयंसेवकांसह कारगिल युद्ध स्मारकाकडे रवाना झाले. 1999 साली सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना रक्षा राज्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

X या समाज माध्यमावरील संदेशात, रक्षा राज्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की शूर सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या कथा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. "शूर सैनिकांचे बलिदान प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करत राहील," असे ते म्हणाले.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून हुतात्मा वीरांना अभिवादन केले.

संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमण्य यांनीही नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शूर सैनिकांना अभिवादन केले.


यावेळी चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सशस्त्र दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी, निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. कारगिल विजय दिवस प्रत्येक भारतीयाला आपल्या राष्ट्राची प्रादेशिक अखंडता जपण्यासाठी शौर्याने लढा देणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्याची, धैर्याची आणि देशभक्तीचे स्मरण करून देतो, तसेच हा दिवस पाकिस्तानच्या खोटेपणाचे सत्यही जगासमोर आणतो असे ते म्हणाले. आपले शत्रू आपल्या दृढनिश्चयाची सतत परीक्षा घेत राहतील, परंतु कारगिलचा वारसा आपल्याला एकता, सज्जता आणि अटूट धैर्याची शिकवण देतो. आपण शत्रूचा खोटारडेपणा आणि आक्रमकतेवर कायम विजय मिळवत राहू, ही बाब अलिकडच्याच ऑपरेशन सिंदूरच्या यशानेही पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणाऱ्यांच्या अभिप्राय पुस्तिकेत आपला संदेशही लिहिला. आपल्या संदेशातून त्यांनी हुतात्मा वीरांच्या दृढ भावना आणि धैर्याला सलाम केला. सध्या कार्यरत असलेले सैनिक, निवृत्त सैनिक आणि वीर नारी यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या समर्पणाची, दृढनिश्चयाची आणि चिरस्थायी वचनबद्धतेची प्रशंसाही त्यांनी या संदेशात केली.

यावेळी नौदल प्रमुखांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाच्या शूरवीरांनी निर्माण केलेला वारसा स्वतःच्या ‘आधी कर्तव्य’ या भावनेचा आणि राष्ट्राच्या सेवेसाठी असलेल्या अतूट निष्ठेचा दाखला आहे असे ते म्हणाले. तुमचे बलिदान केवळ आपल्या देशाच्या भावी पिढ्यांसाठीच नाही, तर कर्तव्य-सन्मान-शौर्याच्या भावनेने संरक्षण दलात सेवा करण्याचा निर्णय घेणाऱ्यांसाठीही प्रेरणा देत राहील असे ते म्हणाले.

सेना प्रमुखांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या अदम्य धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे असे ते म्हणाले. त्यांनी राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि स्वाभिमान जपण्याची भारतीय सैन्याची वचनबद्धताही आपल्या मनोगतातून पुन्हा अधोरेखित केली.
हवाईदल प्रमुखांनीही राष्ट्रीय युद्ध स्मारक हे राष्ट्रीय स्मृती आणि कृतज्ञतेचे एक पवित्र प्रतीक असल्याची भावना व्यक्त केली. हे स्मारक हुतात्मा वीरांचा वारसा अमर करते. या वीरांचे शौर्य भारतीय सशस्त्र दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणा देत राहील असे ते म्हणाले. भारतीय हवाई दल आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि शूरवीरांनी घालून दिलेल्या धैर्य, सन्मान आणि कर्तव्याच्या गौरवशाली परंपरांचे पालन करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

संरक्षण सचिवांनीही आपल्या संदेशातून, हुतात्मा आणि भारताच्या संरक्षण दलांप्रति आदर व्यक्त केला. कारगिल विजय दिवस राष्ट्राला सशस्त्र दलातील जवानांचे शौर्य आणि त्यागाचे स्मरण करून देतो. राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या वीरांचे अदम्य धैर्य लोकांच्या हृदयात कायमच जिवंत राहील, असे ते म्हणाले.

व्हाईस चिफ ऑफ आर्मी स्टाफ यांनी देखील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या शूरवीरांची निस्वार्थ सेवा राष्ट्राच्या स्मृतीत कायमची कोरली जाईल, आणि ती भावी पिढ्यांना आपल्या सशस्त्र दलांच्या सर्वोच्च परंपरांचे पालन करण्यासाठी प्रेरणा देत राहील असे ते म्हणाले. याच शौर्याने आणि समर्पणाने राष्ट्राची सेवा करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

***
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148854)