श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओने मे 2025 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 20.06 लाख निव्वळ सदस्यांची केली नोंदणी; ईपीएफओ मध्ये 9.42 लाख नवीन सदस्यांची नोंदणी
Posted On:
21 JUL 2025 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मे 2025 साठीचा तात्पुरता वेतन आकडेवारी जारी केली आहे, ज्यामध्ये 20.06 लाख निव्वळ सदस्यांची भर पडल्याचे दिसून आले आहे. एप्रिल 2018 मध्ये वेतन आकडेवारी ट्रॅकिंग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक नोंद आहे. एप्रिल 2025 च्या तुलनेत चालू महिन्यात निव्वळ वेतन वाढीमध्ये 4.79 % वाढ झाल्याचे ही आकडेवारी दर्शवते.
“कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मे 2025 मध्ये इतिहासातील सर्वाधिक निव्वळ सदस्य वाढ नोंदवली आहे. हे भारताच्या औपचारिक रोजगार क्षेत्राच्या वाढत्या ताकदीचा पुरावा आहे” असे केंद्रीय कामगार आणि रोजगार तसेच युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी या कामगिरीबद्दल बोलताना सांगितले.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेतन आकडेवारीतील (मे 2025) प्रमुख ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
नवीन सदस्य नोंदणी:
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मे 2025 मध्ये सुमारे 9.42 लाख नवीन सदस्य नोंदवले, जे एप्रिल 2025 च्या तुलनेत 11.04 % वाढ दर्शवते. या वाढीचे श्रेय वाढत्या रोजगार संधी, कर्मचाऱ्यांच्या लाभाबद्दल वाढलेली जागरूकता आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या यशस्वी जनजागृती कार्यक्रमांना जाते.
18 ते 25 वयोगटात मोठी भरती :
या आकडेवारीचा एक लक्षणीय पैलू म्हणजे 18 ते 25 वयोगटातील सदस्यांची संख्या आघाडीवर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 18 ते 25 वयोगटातील 5.60 लाख नवीन सदस्य नोंदवले आहेत, जे मे 2025 मध्ये नोंदवलेल्या एकूण नवीन सदस्यांच्या 59.48 % आहे.
पुन्हा सामील झालेले सदस्य:
मे 2025 मध्ये आधी बाहेर पडलेल्या सुमारे 16.11 लाख सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत पुन्हा सामील झाले. ही आकडेवारी एप्रिल 2025 च्या तुलनेत 2.12 % वाढ दर्शवते. ही आकडेवारी मे 2024 च्या तुलनेत 14.27% वार्षिक वाढ देखील दर्शवते.
महिला सदस्यात्वात वाढ :
मे 2025 मध्ये सुमारे 2.62 लाख नवीन महिला सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत सामील झाल्या. एप्रिल 2025 च्या तुलनेत ही आकडेवारी 7.08 % ची वाढ दर्शवते. मे 2024 च्या तुलनेतही वार्षिक 5.84 % वाढ देखील दर्शवते.
उद्योगनिहाय वाढीचा कल :
महिन्याभरातील उद्योगनिहाय तुलनेत पुढील उद्योगांमध्ये कार्यरत संस्थांमध्ये निव्वळ वेतन आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून येते.
i. तज्ञ सेवा,
ii. कापड उद्योग,
iii. स्वच्छता, स्वच्छता सेवांमध्ये गुंतलेली आस्थापने,
iv. विद्युत, अभियांत्रिकी किंवा सामान्य अभियांत्रिकी उत्पादने,
v. वित्तपुरवठा संस्था,
vi. तयार कपड्यांचे उत्पादन
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2146448)