पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचा 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांचा दौरा


दरभंगा इथे न्यू सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाचे आणि पाटणा इथे अत्याधुनिक उष्मायन सुविधेचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

बिहारमधील संपर्क व्यवस्था सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या चार नवीन अमृत भारत रेल्वेगाड्या पंतप्रधानांच्या हस्ते निशाण दाखवून सुरू केल्या जाणार

पश्चिम बंगालमधील दुर्गपूर इथे 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन व लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार

तेल व नैसर्गिक वायू, उर्जा, रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रांमधील प्रकल्पांचा यामध्ये समावेश

Posted On: 17 JUL 2025 2:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील मोतीहारी इथे सकाळी सुमारे 11.30 वाजता राज्यातल्या 7,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांचे भाषणही होणार आहे.

त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देतील. यावेळी दुर्गपूर इथे दुपारी 3 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते 5,000 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करतील.

पंतप्रधानांचे बिहारमधील कार्यक्रम 

पंतप्रधान विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. रेल्वे, रस्ते, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्पांचा यामधे समावेश आहे.

संपर्क व्यवस्था सक्षम करणे आणि भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याच्या आपल्या वचनाला अनुसरुन पंतप्रधान अनेक रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करतील. यात समस्तीपूर-बछवारा रेल्वे मार्गावरील स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा यामध्ये समावेश असून यामुळे या भागातील रेल्वे वाहतूक अधिक कार्यक्षम होईल. दरभंगा-थलवारा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि दरभंगा-समस्तीपूर रेल्वे मार्गावरील समस्तीपूर-रामभद्रपूर दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण या प्रकल्पांचा लोकार्पण सोहोळा या कार्यक्रमात होणार आहे. 580 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या या कामामुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढेल व रेल्वेगाड्यांना होणारा विलंब कमी होईल.

पंतप्रधानांच्या हस्ते अनेक रेल्वे प्रकल्पांचे भूमीपूजनदेखील होणार आहे. पाटलीपुत्र इथे वंदे भारत रेल्वेगाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधेचे भूमीपूजन यावेळी होणार आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी भाटणी-छपरा ग्रामीण रेल्वेमार्गावरील (114 किमी) स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. जलद रेल्वेगाड्यांच्या सुविधेसाठी आणि उर्जा क्षमता वाढविण्यासाठी भाटणी-छपरा ग्रामीण रेल्वे विभागातील ट्रॅक्शन यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. 4,800 कोटी रुपये खर्चाच्या दरभंगा-नरकटियागंज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे विभागीय क्षमता वाढेल, प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढेल आणि बिहारचा उत्तर भाग देशाच्या इतर भागांशी सक्षम रेल्वे वाहतुकीने जोडला जाईल.   

रस्ते वाहतुकीला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमीपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. आरा-मोहानिया दरम्यानच्या एनएच 319 आणि पाटणा बक्सर दरम्यानच्या एनएच 922 या राष्ट्रीय मार्गांना जोडणाऱ्या आरा बाह्यवळण मार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहतूक सुरळीत होईल तसेच प्रवासाचा वेळही कमी होईल.  

एनएच 319 वरील परारिया ते मोहानिया दरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. आरा शहराला एनएच 02 (सुवर्ण चतुष्कोन) मार्गाशी जोडणाऱ्या 820 कोटी रुपये खर्चाच्या या विकास कामामुळे प्रवासी तसेच माल वाहतुकीत सुधारणा होईल. याशिवाय एनएच 333 सी राष्ट्रीय महामार्गावरील सरवन ते चकई मार्गाच्या रुंदीकरणामुळे प्रवासी व माल वाहतुकीत सुधारणा होईल तसेच हा मार्ग बिहारला झारखंडशी जोडणारा प्रमुख मार्ग ठरेल.   

दरभंगा येथील न्यू सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया संकुलाचे आणि पाटणा येथील अत्याधुनिक उष्मायन सुविधेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामुळे माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर व सेवा निर्यातीला चालना मिळेल. तसेच नव उद्योजक घडविणे, नवोन्मेषाला प्रोत्साहन, बौद्धिक संपदा हक्क व उत्पादन विकास यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप परिसंस्थेलादेखील बळ मिळेल. 

बिहारमधील मत्स्यव्यवसाय आणि जलसिंचन क्षेत्र अधिक सशक्त करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, पंतप्रधान प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसव्हाय) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनेक मत्स्य विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. या उपक्रमांतर्गत बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये आधुनिक मत्स्य पायाभूत सुविधांचा शुभारंभ होईल, ज्यामध्ये नवीन मत्स्य हॅचरिज, बायोफ्लॉक युनिट्स, सजावटीय मत्स्य पालन, एकत्रित जलसिंचन युनिट्स आणि मत्स्य आहार उत्पादन केंद्रांचा समावेश आहे. हे जलसिंचन प्रकल्प रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात, मत्स्य उत्पादन वाढवण्यात, उद्योजकतेला चालना देण्यात आणि बिहारच्या ग्रामीण भागातील सामाजिक-आर्थिक विकास गतीमान करण्यात महत्त्वपूर्ण ठरतील.

त्यांच्या भविष्यकालीन सक्षम रेल्वे नेटवर्कच्या दृष्टिकोनानुसार, पंतप्रधान चार नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. या गाड्या राजेंद्र नगर टर्मिनल (पटना) ते नवी दिल्ली, बापूधाम मोतीहारी ते दिल्ली (आनंद विहार टर्मिनल), दरभंगा ते लखनऊ (गोमती नगर) आणि मालदा टाउन ते लखनऊ (गोमती नगर) भोपाळपूरमार्गे धावतील, ज्यामुळे या भागातील संपर्कामध्ये लक्षणीय सुधारणा होईल.

त्याचबरोबर पंतप्रधान दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएव्हाय-एनआरएलएम) अंतर्गत बिहारमधील सुमारे 61,500 स्वयं-सहायता समूहांना (एसएचजीएस) 400 कोटी रुपये वितरित करतील. महिला नेतृत्वाखालील विकासावर विशेष भर देत, आतापर्यंत 10 कोटींपेक्षा अधिक महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्या आहेत.

पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 12,000 लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशाचा एक भाग म्हणून पंतप्रधान  काही लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या हस्तांतरित करतील आणि 40,000 लाभार्थ्यांना 160 कोटी रुपयांहून अधिक निधीचे वितरण करतील.

पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये

पंतप्रधान पश्चिम बंगाल मध्ये  तेल व वायू, ऊर्जा, रस्ते आणि रेल्वे क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पण करतील.

पश्चिम बंगालमधील तेल आणि गॅस पायाभूत सुविधेला चालना देत, पंतप्रधान बंकुरा व पुरुलिया जिल्ह्यांतील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) शहर वायू वितरण (सीजीडी) प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. सुमारे 1,950 कोटींच्या या प्रकल्पामध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी पीएनजी  जोडणी उपलब्ध होतील, तसेच सीएनजी स्टेशन देखील सुरू होतील आणि त्यातूनच रोजगार निर्मिती होईल.

पंतप्रधान दुर्गापूर ते कोलकाता विभाग (132 किमी),जो जगदीशपूर-हल्दिया आणि बोकारो-धामरा पाईपलाइन प्रकल्पाचा (प्रधानमंत्री ऊर्जा गंगा पीएमयूजी) भाग आहे, तो राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे 1,190 कोटी खर्च करून बांधण्यात आलेला हा  पाईपलाईन प्रकल्प पूर्व बर्धमान, हुगळी आणि नदिया या जिल्ह्यांतून जातो . या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल आणि लाखो घरांमध्ये नैसर्गिक वायूचा पुरवठा सुलभ होईल.

सर्वांसाठी स्वच्छ हवा आणि आरोग्य सुरक्षा या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान दुर्गापूर स्टील थर्मल पॉवर स्टेशन आणि रघुनाथपूर थर्मल पॉवर स्टेशन (दामोदर वॅली  कॉर्पोरेशन) मधील फ्लू गॅस डीसल्फरायझेशन (एफजीडी) प्रणाली राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पाची किंमत 1,457 कोटींपेक्षा अधिक असून,  हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना देईल व रोजगाराच्या संधी निर्माण करेल.

तसेच या भागातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करत, पंतप्रधान पुरुलिया – कोटशिला रेल्वे लाईनचे (36 किमी) दुहेरीकरण राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे 390 कोटींच्या या प्रकल्पामुळे जमशेदपूर, बोकारो व धनबाद येथील उद्योगांना रांची व कोलकाताशी जोडणाऱ्या रेल्वे संपर्कात सुधारणा होईल आणि मालगाड्यांची वाहतूक सुलभ होईल.

पंतप्रधान सेतु भारतम कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या दोन रेल्वे ओव्हर ब्रिजेसचे (आरओबीएस) अनुक्रमे टॉपसी आणि पांडबेश्वर, पश्चिम बर्धमान यांचे उद्घाटन करतील. सुमारे 380 कोटी खर्चून बांधलेले हे पूल, संपर्कता सुधारण्यात मदत करतील आणि रेल्वे फाटकांवरील अपघात टाळण्यासाठी उपयुक्त ठरतील.

 
जयदेवी पुजारी स्वामी/सुरेखा जोशी/गजेंद्र देवडा/ प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2145479) Visitor Counter : 6