रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या शाश्वतता अहवालात पर्यावरण शाश्वततेसाठी केलेले प्रयत्न अधोरेखित

प्रविष्टि तिथि: 15 JUL 2025 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जुलै 2025

 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा शाश्वतता अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्राधिकरणाचा हा आपला सलग दुसरा शाश्वतता अहवाल असून, या अहवालाच्या माध्यमातून प्राधिकरणाने पर्यावरण शाश्वततेबद्दलची आपली वचनबद्धताही अधोरेखित केली आहे. या सर्वसमावेशक अहवालातून प्राधिकरणाने आपल्या कार्यान्वयनाच्या प्रत्येक पैलूमध्ये पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) तत्त्वांचा अंतर्भाव करण्यासाठी तयार केलेल्या भक्कम आराखड्याची सविस्तर माहिती दिली आहे. या अहवालातून प्राधिकरणाची भारताच्या जागतिक वचनबद्धतेशी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत भविष्यासाठी प्रारंभ केलेला मिशन लाईफ (पर्यावरणपूरक जीवनशैली) हा उपक्रम तसेच चक्रीय अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेशी असलेली सुसंगता देखील अधोरेखित केली गेली आहे. अलिकडेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले.

शाश्वतता अहवाल 2023-24 या अहवालातून प्राधिकरणाने पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा संवर्धनासाठी केलेल्या विविध प्रयत्नांची परिणामकारकता मांडली आहे. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचे प्रमाण 20% वाढले, मात्र त्याचवेळी प्राधिकरणाने आपल्या हरितगृह वायूंच्या (GHG) उत्सर्जनाची तीव्रता 1.0 MTCO2e/किमी वरून 0.8 MTCO2e/किमी पर्यंत खाली आणण्यातही यश मिळवले आहे. अहवालात नमूद या वस्तुस्थितीमुळे बांधकामाच्या प्रमाणातील वाढ आणि उत्सर्जन या दोन्ही गोष्टींचा थेट परस्पर संबंध नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या अहवालात प्राधिकरणाने शाश्वततेच्या मुख्य स्तंभांपैकी एक असलेल्या चक्रीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेले प्रयत्नही ठळकपणे अधोरेखित केले गेले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात फ्लाय-ऍश (fly-ash), प्लास्टिक कचरा आणि प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणलेल्या डांबरासह (reclaimed asphalt) 631 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर केलेल्या साधन-सामग्रीचा उपयोग केला असल्याचे नमूद केले आहे.

याव्यतिरिक्त, प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांच्या लगत देशव्यापी वृक्षारोपण मोहीम राबवण्याचा उपक्रमही सुरू ठेवला असल्याची नोंद या अहवालात केली गेली आहे. या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, प्राधिकरणाने 56 लाखांपेक्षा जास्त रोपे लावली, तर 2024-25 या वर्षात 67.47 लाख इतकी रोपे लावली, एकूण हरित महामार्ग (वृक्षारोपण, स्थलांतरण, सुशोभिकरण आणि देखभाल) धोरण 2015 लागू झाल्यापासून प्राधिकरणाने सुमारे 4.69 कोटीपेक्षा जास्त रोपे लावली आहेत. प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे अत्यावश्यक असलेल्या कार्बन सिंकची (carbon sinks) निर्मिती करण्यात तसेच महामार्गालगतच्या परिसरात सकारात्मक पर्यावरणीय शाश्वततेच्या वातावरणाचा विस्तार घडवून आणण्यात मोठी मदत झाली आहे.

याशिवाय प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांलगतच्या परिसरात जलस्रोतांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवनाचे उपक्रम देखील हाती घेतले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार प्राधिकरणाने अमृत सरोवर अभियानांतर्गत देशभरात 467 जलस्रोतांच्या विकासाचे काम पूर्णत्वाला नेले आहे. प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे स्थानिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवनाच्या बरोबरीनेच राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी देखील सुमारे 2.4 कोटी घनमीटर इतकी मातीदेखील उपलब्ध झाली, यामुळे प्राधिकरणाची अंदाजे 16,690 कोटी रुपयांचीही बचत झाली.

हा संपूर्ण अहवाल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या संकेतस्थळावर खाली दिलेल्या दुव्यावर उपलब्ध आहे.

 https://nhai.gov.in/nhai/sites/default/files/2025-07/Sustainability-Report-of-NHAI-for-FY-2023-24.pdf

 

* * *

सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2144962) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Malayalam