पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
ऊर्जा भागीदारींना चालना : 9व्या ओपेक आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी घेतली ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक नेत्यांची भेट
Posted On:
10 JUL 2025 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2025
व्हिएन्ना येथे आयोजित 9व्या ओपेक आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होताना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि व्यावसायिक बैठका घेतल्या. भारताच्या ऊर्जा भागीदारी अधिक दृढ करणे आणि देशाच्या वाढत्या ऊर्जा गरजांना पाठबळ देणे हा या भेटींचा उद्देश होता.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कुवेतचे तेल मंत्री आणि कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, महामहीम तारेक सुलेमान अल-रुमी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही बाजूंनी सध्याचे संबंध आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. कुवेत सध्या भारतासाठी कच्च्या तेलाचा 6वा सर्वात मोठा स्त्रोत , एलपीजीचा चौथा स्त्रोत आणि 8व्या क्रमांकाचा सर्वात मोठा हायड्रोकार्बन व्यापार भागीदार आहे. या आकडेवारीमधून या द्विपक्षीय ऊर्जा संबंधांची खोली आणि धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होत आहे.
आणखी एका बैठकीत, हरदीप सिंग पुरी यांनी नायजेरियाचे पेट्रोलियम संसाधन राज्यमंत्री, महामहीम सिनेटर हेनेकेन लोकपोबिरी यांची भेट घेतली. दावोस येथे 2024 मध्ये झालेल्या त्यांच्या यापूर्वीच्या भेटीनंतर ही चर्चा झाली. भारतीय कंपन्या नायजेरियन कच्च्या तेलाच्या सातत्यपूर्ण खरेदीदार आहेत, आणि या चर्चेत दोन्ही देशांमधील हायड्रोकार्बन व्यापार आणखी वाढवण्याच्या आणि दीर्घकाळ चाललेली भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजनावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

याव्यतिरिक्त, हरदीप सिंग पुरी यांनी शेलचे सीईओ वेल सावन यांच्यासोबत एक संक्षिप्त बैठक घेतली. भारताच्या महत्त्वाकांक्षी अन्वेषण आणि उत्पादन योजनांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य सहकार्यावर चर्चा करणे हा या भेटीचा उद्देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत नवीन अपतटीय आणि तटवर्ती क्षेत्रांमध्ये जवळपास 2.5 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात अन्वेषण करण्यास सज्ज आहे, जी जगातील सर्वात मोठ्या बोलीच्या फेऱ्यांपैकी एक आहे. भारताच्या नैसर्गिक वायूचा ऊर्जा मिश्रणातील वाटा 6% वरून 15% पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न प्रगत तांत्रिक भागीदारींसाठी महत्त्वपूर्ण संधी निर्माण करत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत, हरदीप सिंग पुरी यांनी ओपेकचे सरचिटणीस हैथम अल घैस यांची भेट घेतली. या भेटीत भारताची ओपेकसोबतची मजबूत भागीदारी आणि तेल बाजार संतुलित आणि पुर्वानुमानीत कसे ठेवता येतील यावर चर्चा झाली, जेणेकरून सध्याच्या काळातील भू-राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हरित आणि पर्यायी ऊर्जांकडे जागतिक संक्रमण सुलभ होईल.
बीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मरे ऑचिनक्लॉस यांच्यासोबतच्या बैठकीबद्दल माहिती देताना, त्यांची चर्चा सविस्तर आणि अंतर्दृष्टीपूर्ण होती, असे पुरी यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त,पुरी यांनी व्हिटॉलचे ग्रुप सीईओ रसेल हार्डी यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी जागतिक ऊर्जा बाजारातील सध्याची आव्हाने आणि हायड्रोकार्बन मूल्य साखळीतील संभाव्य सहकार्यावर चर्चा केली.
रशियन तेल खरेदीबाबत पत्रकार परिषदेत विचारणा केली असता, मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले की, भारताने कधीही कोणताही प्रतिबंधित माल खरेदी केलेला नाही. रशियन तेलावर कधीही जागतिक निर्बंध नव्हते, कारण जागतिक तेल पुरवठा साखळ्यांची वास्तविकता जाणणाऱ्या दूरदर्शी निर्णयकर्त्यांना याची जाणीव होती. त्यावर केवळ मूल्यविषयक मर्यादा घालण्यात आली होती. तेल बाजाराचे आकलन नसलेले आमच्या धोरणांवर अनावश्यक मतप्रदर्शन करतात, असेही पुरी यांनी नमूद केले.
N.Chitale/S.Patil/P.Malndkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143890)