संरक्षण मंत्रालय
ऑपरेशन सिंदूर दरम्यान शौर्य आणि स्वदेशी उपकरणांचे झालेले दर्शन यामुळे जागतिक पातळीवर आपल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी आणखी वाढली : महानियंत्रक परिषद 2025 मध्ये संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
“खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागामुळे,आपली जबाबदारी आता नियंत्रकाची नसून,सुविधा देणाऱ्याची आहे”
"निर्णय जलदगतीने घेतले जातील याची सुनिश्चिती करण्याचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून आपण भारतातच मोठ्या इंजिनांचे उत्पादन सुरू करू शकू"
Posted On:
07 JUL 2025 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 07 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे महानियंत्रक, संरक्षण लेखा विभागाच्या (डीएडी) परिषदेला संबोधित केले. त्यांनी सशस्त्र दलांची परिचालन सज्जता आणि आर्थिक तत्परता यांना बळकटी देण्यात विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख केला आणि आपल्या सैन्याचे शौर्य व देशांतर्गत उपकरणांच्या क्षमतेचे प्रदर्शन यामुळे जागतिक पातळीवर स्वदेशी उत्पादनांची मागणी आणखी वाढली असल्याचे सांगितले. "जग आपल्या संरक्षण क्षेत्राकडे नव्या आदराने पाहत आहे. आर्थिक प्रक्रियेतला एखादाही विलंब किंवा त्रुटी थेट परिचालन सज्जतेवर परिणाम करू शकतात," असे ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रातील खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागासोबतच त्यांनी डीएडीला 'नियंत्रक' ते 'सुविधादाता' असे विकसित होण्याचे आवाहन केले.

राजनाथ सिंह यांनी, संरक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या परिवर्तनाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला दिले. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आत्मनिर्भरता आणि संरक्षण नियोजन, वित्त आणि नवोन्मेषात संरचनात्मक सुधारणांकडे वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले."आपण पूर्वी जी उपकरणे आयात करत असू, त्यापैकी बहुतांश आता भारतात तयार केली जात आहेत. उच्च स्तरावरील स्पष्टता आणि वचनबद्धता यामुळे आपल्या सुधारणा यशस्वी होत आहेत," असे ते म्हणाले.
'संरक्षणातील आत्मनिर्भरता' यावर पंतप्रधानांचा भर असून भारतातील उद्योगांनी जागतिक मागणीतील बदलानुरूप सज्ज असले पाहिजे आणि निर्यात व नवोन्मेषात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे,असे त्यांनी सांगितले."निर्णय जलदगतीने घेतले जातील याची सुनिश्चिती करण्याचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून आपण भारतातच मोठ्या इंजिनांचे उत्पादन सुरू करू शकू,"असे त्यांनी सांगितले आणि प्रगत स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

संरक्षण क्षेत्राच्या वाढत्या धोरणात्मक आणि आर्थिक महत्त्वाकडे लक्ष वेधताना राजनाथ सिंह यांनी, संरक्षण खर्चाकडे केवळ 'खर्च' या नजरेतून न पाहता बहुविध परिणामांसह आर्थिक गुंतवणूक म्हणून पाहण्याचे आवाहन केले.
"शांततेचा काळ हा एक भ्रम आहे. अगदी तुलनेने शांततेच्या काळातही, आपण अनिश्चिततेसाठी सज्ज असले पाहिजे. अचानक घडणाऱ्या घडामोडी आपल्या आर्थिक आणि कार्यात्मक स्थितीत पूर्णपणे बदल घडवून आणू शकतात. उपकरणांचे उत्पादन वाढवणे असो किंवा आर्थिक प्रक्रियांमध्ये बदल करणे असो, आपण नेहमीच नवोन्मेषी तंत्रे आणि प्रतिसादात्मक प्रणालींसह सज्ज असले पाहिजे," असे संरक्षण मंत्री म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी सरकारी ई-मार्केटप्लेस (जेम) द्वारे सार्वजनिक खरेदीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल विस्तृतपणे सांगितले. यामुळे पारदर्शकता आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढला असल्याचे ते म्हणाले.
संरक्षण वस्तुनिर्माणात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी फेसलेस आणि टाइम बाउंड पेमेंट व्यवस्थेकडे वळण्याचे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी विभागाला केले.

विभागाच्या प्रक्रियांमधील लहानशा चुकादेखील मोठा परिणाम घडवू शकतात, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला.
"कायम सतर्क,चपळ आणि लवचिक राहण्याची प्रतिज्ञा आपण सर्वजण घेऊया, जेणेकरून आपले काम प्रासंगिक आणि प्रभावी राहील. आपली जबाबदारी मोठी आहे आणि आपण घेतलेला प्रत्येक निर्णय राष्ट्रीय सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनात योगदान देणारा आहे," असे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले.
N.Chitale/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2142906)