ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुरक्षेसाठी ग्राहकांना फक्त भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे केंद्राचे आवाहन


आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बीआयएसने 500हून अधिक हेल्मेटची चाचणी घेत 30हून अधिक शोध आणि जप्तीची केली कारवाई

दिल्लीत कालबाह्य किंवा रद्द केलेले परवाने असलेल्या नऊ उत्पादकांकडून 2,500 नियमबाह्य/अयोग्य हेल्मेट जप्त

Posted On: 05 JUL 2025 10:49AM by PIB Mumbai

 

भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) तर्फे देशभरातील ग्राहकांना केवळ बीआयएस-प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, विभागाने बीआयएस प्रमाणपत्राशिवाय हेल्मेटचे उत्पादन किंवा विक्री करण्याविरुद्ध कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय रस्त्यांवर 21 कोटींहून अधिक दुचाकी वाहने असल्याने, दुचाकीस्वारांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत हेल्मेट घालणे अनिवार्य असले तरी, त्याचा प्रभावीपणा गुणवत्तेवर अवलंबून असतो. कमी दर्जाचे हेल्मेट संरक्षणाशी तडजोड करतात आणि त्यांचा मूळ उद्देश साध्य होत नाही. यावर उपाय म्हणून, 2021 पासून एक गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू करण्यात आला आहे, या अंतर्गत सर्व दुचाकी चालकांसाठी BIS मानकांनुसार (IS 4151:2015) प्रमाणित ISI-चिन्हांकित हेल्मेट अनिवार्य कण्यात आले. जून 2025 पर्यंत, भारतभर 176 उत्पादकांकडे संरक्षक हेल्मेटसाठी वैध BIS परवाने आहेत. दरम्यान, विभागाने असे निरीक्षण नोंदवले आहे की रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या अनेक हेल्मेटमध्ये अनिवार्य असलेले BIS प्रमाणपत्र नाही, ज्यामुळे ग्राहकांना मोठा धोका निर्माण होतो आणि रस्ते अपघातात असंख्य मृत्यू होतात. म्हणूनच, या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.

गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी, BIS नियमित कारखाना आणि बाजारपेठेतील देखरेख करते. गेल्या आर्थिक वर्षात, BIS मानक चिन्हाचा गैरवापर केल्याबद्दल 500 हून अधिक हेल्मेट नमुने तपासण्यात आले आणि 30 हून अधिक शोध आणि जप्ती मोहिमा राबवण्यात आल्या. दिल्लीतील एका कारवाईत, कालबाह्य किंवा रद्द केलेले परवाने असलेल्या नऊ उत्पादकांकडून 2,500 हून अधिक गैर-अनुपालन/ नियमबाह्य हेल्मेट जप्त करण्यात आले. 17 किरकोळ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी अशाच प्रकारच्या कारवाईमुळे सुमारे 500 निकृष्ट दर्जाचे हेल्मेट जप्त करण्यात आले आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.

रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटपासून संरक्षण देण्यासाठी, ग्राहक व्यवहार विभागाने जिल्हाधिकारी (डीसी) आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना (डीएम) पत्र लिहून दुचाकी चालकांसाठी नियमांचे पालन न करणारे हेल्मेट विकणाऱ्या उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांना लक्ष्य करून देशव्यापी मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते. बाजारात उपलब्ध असलेल्या हेल्मेटच्या गुणवत्तेबद्दल आणि रस्त्यावरील जीव वाचवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका याबद्दल वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

विभागाने पप्रत्येक जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात वैयक्तिक रस घेण्याचे आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून त्याचा प्रभाव जास्तीत जास्त वाढेल.  यासाठी या मोहिमेला विद्यमान रस्ता सुरक्षा मोहिमांशी एकत्रित केले जाणार आहे. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी बीआयएस शाखा कार्यालयांना जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागांशी सतत संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले होते. या सर्व बाबतीत निकाल उत्साहवर्धक असल्याचे दिसून आले, विशेषतः दिल्ली एनसीआर प्रदेशात आणि ही मोहीम इतर प्रदेशांमध्येही राबवली जात आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, बीआयएस चेन्नई टीमने आयएसआय-मार्क केलेले हेल्मेट वाटप करणारा एक यशस्वी रोड शो आयोजित केला आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक वाहतूक अधिकाऱ्यांच्या भागीदारीत जागरूकता मोहीम राबवली. विविध माध्यम चॅनेल, सोशल मीडिया आउटरीच आणि नागरी समाजाच्या सहकार्याद्वारे ही मोहीम वाढवली जात आहे, आयएसआय-मार्क केलेले प्रोटेक्टिव्ह हेल्मेटद्वारे सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे.

ग्राहकांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी, BIS ने BIS केअर अॅप आणि BIS पोर्टलवर हेल्मेट उत्पादक परवानाधारक आहे की नाही हे तपासण्यासाठी एक तरतूद देऊ केली आहे आणि वापरकर्त्यांना BIS केअर अॅपवर तक्रार नोंदवण्याची परवानगी देखील यात आहे. देशव्यापी ग्राहक जागरूकता उपक्रमाचा एक भाग म्हणून, BIS क्वालिटी कनेक्ट मोहिमेचे आयोजन करते जिथे 'मानक मित्र' स्वयंसेवक हेल्मेट आणि इतर उत्पादनांसाठी अनिवार्य प्रमाणपत्राबद्दल माहिती देण्यासाठी ग्राहकांशी थेट संवाद साधतात.

ग्राहक संरक्षण आणि रस्ता सुरक्षेसाठी सरकारची वचनबद्धता ग्राहक व्यवहार विभाग अधोरेखित करतो. बाजारातून कमी दर्जाचे हेल्मेट नाहिशे करून, विभागाचे उद्दिष्ट रस्ते अपघातात होणारे मृत्यू टाळणे आणि उच्च दर्जाच्या सुरक्षा उपकरणांना प्रोत्साहन देणे आहे.

***

M.Jaybhaye/H.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2142440) Visitor Counter : 2