युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्यात माय भारत 2.0 मंच विकसित करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी
माय भारत 2.0 हा केवळ एक डिजिटल मंच नव्हे तर विकसित भारतासाठी युवा शक्तीला सक्षम करण्यासाठीची ती एक राष्ट्रीय चळवळ आहे – केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय
सेवा भाव, म्हणजेच सेवा करण्याची भावना ही भारतीय समाजाची मोठी ताकद आहे आणि माय भारत मंच याच नैतिक मूल्यांची तंत्रज्ञानासोबत सांगड घालतो : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
माय भारत 2.0 मंच अमृत पिढीला सक्षम करेल आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नाला चालना देईल
देशातील 1.76 कोटी तरुण आणि 1.19 लाखांहून अधिक संस्थांनी माय भारत मंचावर नोंदणी केली आहे
Posted On:
30 JUN 2025 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2025
देशातील युवकांच्या डिजिटल सहभागाला बळकटी आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्रित युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने (एमवायएएस) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमईआयटीवाय) आधिपत्याखालील डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनशी (डीआयसी) सामंजस्य करार केला आहे. माय भारत 2.0 मंचाच्या विकसनासाठी झालेल्या या करारावर आज नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा अद्ययावत राष्ट्रीय युवा मंच देशभरातील तरुण वर्गाला सक्षम करण्यासाठी आणि त्यांना जोडून घेण्यासाठी तंत्रज्ञान-चलित उपायांचा वापर करेल. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच श्रम आणि रोजगार विभागाचे मंत्री डॉ.मनसुख मांडवीय, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण विभाग मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर, माय भारत 2.0 ची निर्मिती करण्यासाठी माय भारत मंचामध्ये व्यापक अद्यतने करण्यात येतील. ही सुधारित आवृत्ती वापरकर्त्यांना अधिक उत्तम अनुभव, उपलब्धता तसेच कार्यक्षमता पुरवण्याच्या उद्देशाने नव्या सुविधांसह सुसज्ज असेल. व्यापक प्रमाण तसेच लवचिकता यांची सुनिश्चिती करण्यासाठी मोड्युलर रचनात्मक दृष्टीकोनाचा वापर करून हा मंच संपूर्णतः नव्याने उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय, अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रणालींसाठी अनुकूल ठरणाऱ्या एका संपूर्णतः कार्यक्षम मोबाईल अॅपचे देखील विकसन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना दिशा, हेतू आणि संधीसह सक्षम करण्यासाठी एकाच ठिकाणी उपाय स्वरुपात माय भारतची कल्पना केली आहे. माय भारत 2.0 ही एक खिडकी डिजिटल परिसंस्था असून ती सेवा भावाच्या उर्जेने युक्त असलेल्या कारकीर्द घडवण्याच्या संधी, कौशल्य विकास तसेच नागरी सहभागासह युवा नागरिकांसाठी अनुकुल ठरते. यापूर्वीच नोंदणी केलेल्या 1.75 कोटी युवकांसह, हा मंच म्हणजे 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या मोहिमेशी युवा आकांक्षांना जुळवून घेण्याची एक चळवळ आहे. माय भारत 2.0 सह आपण युवा आकांक्षांना विकसित भारताच्या पायाचे रूप देण्यासाठी अधिक उत्तम एकात्मता, सखोल सहयोग आणि एका नव्या धाडसी दिशेने निघालो आहोत.”
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, तरुण हे आपले नेते आणि राष्ट्र निर्माते आहेत. ते म्हणाले की गेल्या 11 वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी विविध क्षेत्रांमध्ये – मग ते क्रीडा क्षेत्र असो किंवा तंत्रज्ञान, विविध संस्था असो किंवा शिक्षण प्रणाली- अशा सर्वच क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे.

मंत्र्यांनी भारताच्या सेमिकंडक्टर उत्पादनातील दशकानुदशकांच्या स्वप्नाचा उल्लेख करताना सांगितले की, 1960 च्या दशकापासून प्रयत्न सुरू असले तरीही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग यावर भर देण्यात आला आहे. इंडिया सेमिकंडक्टर मिशन (आयएसएम) सुरू झाल्यानंतर तरुणांमध्ये आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. आता शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी चिपसेट डिझाइन करत आहेत, आणि आयएसएम-सक्षम प्लॅटफॉर्म देशभरातील 240 विद्यापीठांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वैष्णव यांनी पुढे सांगितले की, इंडिया एआय मिशन अंतर्गत सामायिक संगणक सुविधा विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना वापरासाठी उपलब्ध करून दिली जात आहे. सध्या 34,000 जीपीयूज उपलब्ध असून 6,000 जीपीयूज लवकरच या योजनेत समाविष्ट होणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश भारतीय तरुणांना नवीनतम तंत्रज्ञानाचे व्यासपीठ पुरविणे हा आहे.
त्यांनी ही माहिती दिली की ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स भारतात 15 लाखांहून अधिक तरुणांना रोजगार देत आहेत आणि ही संधी द्वितीय श्रेणी शहरांमध्येही पोहोचवण्यासाठी नवीन संरचना विकसित करण्यात येत आहे, जेणेकरून सर्व समावेशक तंत्रज्ञानात्मक विकास साधता येईल.
“सेवा भाव, म्हणजेच सेवा करण्याची भावना, ही भारतीय समाजाची मोठी ताकद आहे आणि एमवाय भारत (माय भारत) या उपक्रमात हीच भावना तंत्रज्ञानासोबत एकत्रित केली आहे. यावर्षी आपण डिजिटल इंडिया चा 10 वर्षांचा उत्सव साजरा करत आहोत आणि माय भारत 2.0 हे त्यामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. तरुण-केंद्रित या मंचाचा डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाशी समन्वय साधल्यामुळे तरुणांना आणि देशाला दोघांनाही प्रचंड लाभ मिळणार आहे,” असे वैष्णव यांनी सांगितले.या व्यासपीठाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी एक समर्पित कॉल सेंटर,प्रशिक्षण मॉड्यूल्स, क्लाउड सेवा, एमआयएस (मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम) आणि ईमेल व एसएमएस सेवा यांचा समावेश असलेली सहाय्यक सेवा केंद्र स्थापन केले जातील. याशिवाय काही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय)आधारित वैशिष्ट्यपूर्ण सेवा सुरू केल्या जातील. जसे की स्मार्ट सीव्ही बिल्डर, वैयक्तिकृत डिजिटल प्रोफाइल, आणि एआय-चालित चॅटबॉट्स. स्पीच-टू-टेक्स्ट आणि व्हॉइस-असिस्टेड नेव्हिगेशन यांसारख्या सुविधा वापरकर्त्याचा अनुभव सुलभ व सर्वसमावेशक बनवतील.
माय भारत 2.0 हे व्यासपीठ कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्था आणि शैक्षणिक संस्थांना परिणामांचे प्रभावीपणे विश्लेषण आणि निरीक्षण करण्यासाठी इंटिग्रेटेड डॅशबोर्ड उपलब्ध करून देईल. स्थान बुद्धिमत्ता आणि भौगोलिक-टॅगिंग साधने तरुणांना त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार किंवा आवडीनुसार जवळच्या संधी शोधण्यास मदत करतील. याव्यतिरिक्त, सहभाग वाढविण्यासाठी आणि सातत्यपूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी परस्परसंवादी शिक्षण मॉड्यूल आणि प्रश्नमंजुषा देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत.

माय भारत 2.0 आधार, डिजीलॉकर, भाषिणी आणि मायगव्ह सारख्या राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठांबरोबर सुसंगतरित्या एकत्रित केले जाईल, ज्यामुळे परस्परकार्यक्षमता आणि एकीकृत वापरकर्ताभिमुख अनुभव सुनिश्चित होईल. हे सुधारित पोर्टल डेटा संरक्षण आणि गोपनीयतेच्या सर्वात अद्ययावत नियमांचे पालन करेल, जेणेकरून सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल वातावरण तयार होईल.
याशिवाय, या व्यासपीठाच्या सुधारित आवृत्तीमध्ये राष्ट्रीय करिअर सेवांसाठी समर्पित विभाग, एक मेंटॉरशिप हब आणि फिट इंडिया विभाग यांचा समावेश असेल, जे तरुणांमध्ये करिअर वृद्धी, वैयक्तिक विकास तसेच आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देतील. हे एकत्रीकरण माय भारत व्यासपीठाला युवा सहभाग आणि सक्षमीकरणासाठी एक व्यापक वन-स्टॉप डिजिटल प्रवेशद्वार बनवण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत करतील.
ही सुधारणा तंत्रज्ञान, प्रशासन आणि युवा उर्जेचा धोरणात्मक संगम आहे, ज्याचा उद्देश भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाला विकासात्मक लाभांशात रूपांतरित करणे हा आहे. माय भारत 2.0 हे अमृत पीढीच्या क्षमतेचा वापर करून ‘विकसित भारत -2047 चे स्वप्न साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
माय भारत (https://mybharat.gov.in) हे युवा व्यवहार विभाग (DoYA) द्वारे संकल्पित आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC) द्वारे विकसित केलेले एक सक्रिय आणि गतिमान तंत्रज्ञानाधिष्ठित व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ भारतातील तरुणांना संरचित आणि अर्थपूर्ण पद्धतीने सहभागी करून घेण्यासाठी तसेच एकत्रित करण्यासाठी एक संस्थात्मक चौकट म्हणून काम करते. हे व्यासपीठ 31 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे सुरू करण्यात आले. माय भारत या व्यासपीठावर आतापर्यंत, 1.76 कोटींहून अधिक तरुण आणि 1.19 लाखांहून अधिक संस्थांनी नोंदणी केली आहे.
* * *
N.Chitale/Sanjana/Gajendra/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140917)
Visitor Counter : 2