ऊर्जा मंत्रालय
विद्युत सुरक्षा दिनानिमित्त केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या वतीने अखिल भारतीय विद्युत सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
28 JUN 2025 11:03AM by PIB Mumbai
26 जून 2025 रोजी नवी दिल्लीत विद्युत सुरक्षा दिन 2025 निमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. केंद्र सरकारचे उर्जा मंत्रालय, केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA), आणि बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय (BSES) यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या स्वच्छ आणि स्मार्ट ऊर्जा महत्त्वाकांक्षेसोबतच समांतरपणे शून्य हानी विद्युत परिसंस्था निर्माण करण्याची भारताची वचनबद्धता ठळकपणे अधोरेखित केली.
कल्पक ऊर्जा, सुरक्षित राष्ट्र (Smart Energy, Safe Nation) ही यंदाच्या विद्युत सुरक्षा दिनाची संकल्पना होती. या संकल्पनेतून भारताच्या उर्जा क्षेत्राच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीत, विशेषतः बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली (BESS), इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग विषयक पायाभूत सुविधा आणि छतावरील सौर उर्जा सुविधा यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुरक्षिततेचा प्राधान्याने अंतर्भाव करण्याची गरज अधोरेखित केली गेली. एकीकडे उर्जा व्यवस्थेचे वेगाने विद्युतीकरण आणि विकेंद्रीकरण होत असल्यामुळे संबंधित धोक्यांचे प्रमाणही वाढले आहे, अशावेळी विद्युत सुरक्षा ही एक सामूहिक गरज बनली आहे.

केंद्रीय उर्जा, आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. भारताच्या वेगाने होत असलेल्या ऊर्जा संक्रमणासोबतच, एक भक्कम नियोजित मानक सुरक्षा व्यवस्था स्थापित होण्याची गरज त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली. या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्राशी संबंधित उपयोगिता आणि नियामक संस्था, मुख्य राज्य विद्युत निरीक्षणाधिकारी, रहिवासी कल्याण संघटना, मूळ उपकरण उत्पादक (OEMs), उत्पादक, क्षेत्र तंत्रज्ञ आणि सक्रिय ऊर्जा वापरकर्ते (prosumers) या आणि अशा विविध विभाग, आस्थापना, संस्था - संघटनांचे सुमारे 300 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. याशिवाय असंख्य प्रतिनिधींनी युट्युबच्या लाइव्ह वेबकास्टच्या माध्यमातूनही या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यामुळे हा कार्यक्रम आणि त्याच्या परिणामकारकतेची व्याप्तीही वाढली. या कार्यक्रमाला देशपातळीवर केवळ 22 तासांत सुमारे 25000 पेक्षा जास्त प्रेक्षकसंख्याही लाभली.
सुरक्षा शक्ती या अधिकृत विद्युत सुरक्षा शुभंकराचे (Mascot) अनावरण हे या कार्यक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य ठरले. नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेबाबत हसत खेळत आणि माहितीपूर्ण पद्धतीने मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करता येईल अशा आकर्षक स्वरुपात हा शुभंकर तयार केला गेला आहे. यासोबतच, विद्युत सुरक्षा विषयक हस्तपुस्तिकेच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशनही या निमित्ताने केले गेले. ही हस्तपुस्तिका हा केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA) आणि बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय (BSES) यांचा संयुक्त उपक्रम असून, या पुस्तिकेतून बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली (BESS), छतावरील सौर प्रणाली आणि इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जरचा प्रत्यक्ष वापर आणि देखभालीसंदर्भातली सुरक्षा विषयक मार्गदर्शक तत्त्वे मांडली आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रानंतर केंद्रीय विद्युत प्राधिकरण, राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्था, बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय आणि अर्थिंग सोल्यूशन्स या संस्थांसह विद्युत क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांनी तंत्रज्ञानविषयक महत्वाची सादरीकरणे केली, तसेच परस्पर संवाद स्वरुपातील विविध सत्रांचेही आयोजन केले गेले.

या कार्यक्रमाच्या एका सत्रात सत्यजित पाध्ये यांनी विद्युत सुरक्षेवर आधारित बोलक्या बाहुल्यांचा खेळही सादर केला. या उपक्रमाअंतर्गत बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेविषयीच्या जटिल संकल्पनांना सोप्या पद्धतीने मांडण्यात आली. यामुळे हा उपक्रम रहिवासी कल्याण संघटना (RWAs) आणि सामान्य ग्राहकांशी सहजतेने जोडून घेण्यात उपयुक्त ठरला.
विद्युत सुरक्षा दिनाच्या या सोहळ्यानंतर देशभरात आठवडाभर विशेष मोहीम राबविली जाणार आहे. याअंतर्गत सुरक्षा प्रतिज्ञा समारंभ, सर्वोत्तम पद्धतींचा प्रचार प्रसार आणि जागरुकतेच्या प्रयत्नांच्या व्याप्तीचा विस्तार अशा अनेक उपक्रमांचा समावेश असणार आहे. या उपक्रमांची परिणामकारकता वाढावी यासाठी सर्व जागरुकता मोहिमांमध्ये सुरक्षा शक्ती शुभंकराचा व्यापक वापर केला जाणार आहे, तसेच शाळा, रहिवासी कल्याण संघटना (RWAs) आणि उद्योग व्यवसायांच्या ठिकाणी सुरक्षा प्रतिज्ञेचे संस्थात्मकीकरण घडवून आणणे तसेच भारतातील उर्जा क्षेत्राच्या संपूर्ण परिसंस्थेत विद्युत सुरक्षा विषयक नियोजित मानक सुरक्षा व्यवस्थेचा आणि मार्गदर्शक तत्त्वांचा सातत्याने प्रचार प्रसार करत राहण्यासारखे प्रयत्न केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले गेले होते. हा संपूर्ण कार्यक्रम पुढे दिलेल्या दुव्यावर पाहता येईल : www.youtube.com/CEA-ElectricalSafetyDay2025
***
M.Pange/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140434)