सांस्कृतिक मंत्रालय
योग आणि वारशाचा संगम: एएसआय स्मारकांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
Posted On:
21 JUN 2025 8:35PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जून 2025
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या देशभरातील आयोजनांअंतर्गत, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या 81 वारसा स्थळांवर आज आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने योग सत्रांचे उत्साही आयोजन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व केले. योगाच्या समावेशक स्वरूपावर भर देत त्यांनी सांगितले की "सीमा, पार्श्वभूमी, वय किंवा क्षमता यांच्या पलीकडे, योग हा सर्वांसाठी आहे. आंतरिक शांती जिथे जागतिक धोरण बनते त्या मानवतेसाठी योग नव्या युगाची सुरुवात ठरू दे, असे ते पुढे म्हणाले.

'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' ही संकल्पना, शारीरिक तंदुरुस्तीला जागरूक जीवनशैलीशी जोडण्यात जगाचे नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाला पुढे नेते आणि अशा प्रकारे जागतिक स्तरावर समग्र आरोग्याला प्रोत्साहन देते.

गुजरातमधील अदलज की वाव पासून ते कोणार्कमधील सूर्य मंदिरापर्यंत, हे वास्तुशिल्प चमत्कार सर्व वयोगटातील लोकांच्या सामूहिक योग सहभागासाठी योगाभ्यासाचे प्रेरणास्थळ ठरले. या स्थळांनी योगसाधनेचा भव्य उत्सव पाहिला - एक प्राचीन आरोग्य परंपरा, जी आज सर्व स्तरातील लोक स्वीकारत आहेत.
या उत्सवाचा एक भाग म्हणून अनेक केंद्रीय मंत्री एएसआय-संरक्षित स्मारकांमध्ये योग सत्रांमध्ये सहभागी झाले, ज्यामुळे राष्ट्रीय चळवळ म्हणून योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित झाले.

सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानातील जोधपूर येथील मेहरानगड किल्ल्यावर योगासने केली; गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सहभाग घेतला; पट्टडकल स्मारक समूहात प्रल्हाद जोशी यांनी योगासने केली आणि देशभरातील विविध ठिकाणी इतर प्रमुख मान्यवरांसह सहभाग घेतला. त्यांच्या सहभागाने एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा एक शक्तिशाली संदेश दिला, ज्यामुळे देशभरातील नागरिकांना योगासने जीवनाचा मार्ग म्हणून स्वीकारण्यास प्रेरणा मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाचे सर्व 81 एएसआय स्थळांवर थेट प्रक्षेपण करण्यात आले, जिथे सहभागींनी एकत्रितपणे सहभाग घेतला.
योग ही भारताकडून जगाला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे, जी संपूर्ण मानवतेसाठी समग्र लाभ देऊ करते.
* * *
PIB Mumbai | M.Pange/H.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138601)