नागरी उड्डाण मंत्रालय
केदारनाथ विभागात आज हेलिकॉप्टर अपघात
एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाद्वारे बचावकार्य सुरू
चारधाम यात्रेसाठी आर्यन एव्हिएशनच्या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती
Posted On:
15 JUN 2025 3:43PM by PIB Mumbai
"श्री केदारनाथ जी – आर्यन हेलीपॅड, गुप्तकाशी" या मार्गावर कार्यरत असलेले आर्यन एव्हिएशनचे बेल 407 हेलिकॉप्टर (नोंदणी क्रमांक व्हीटी-बीकेए) आज एका दुर्दैवी अपघातात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी, एक लहान बाळ आणि एक क्रू सदस्य होते.
हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून पहाटे 5:10 वाजता उड्डाण करून 05:18 वाजता श्री केदारनाथ जी हेलीपॅडवर उतरले. नंतर 05:19 वाजता परत गुप्तकाशीसाठी निघाले आणि साधारण 05:30 ते 05:45 च्या दरम्यान गौरीकुंडजवळ कोसळले.
प्राथमिक माहितीनुसार, अपघाताचे संभाव्य कारण नियंत्रित उड्डाण असताना कोसळणे ('कंट्रोल्ड फ्लाइट इंटू टेरेन' - सीएफआयटी) असल्याचे दिसते, कारण दरीच्या प्रवेश भागात दाट धुके व कमी दृश्यमानता असूनही हेलिकॉप्टर उडत होते. अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी विमान अपघात चौकशी विभाग (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोद्वारे एएआयबी) द्वारे सखोल चौकशी केली जाईल.
अपघात स्थळी एनडीआरएफ व एसडीआरएफच्या पथकाद्वारे सध्या बचावकार्य सुरू आहे.
या घटनेनंतर, मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सकाळी 11:00 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीला उत्तराखंड सरकारचे वरिष्ठ अधिकारी, नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव, डीजीसीए आणि संबंधित पथकांचे सदस्य उपस्थित होते. या संदर्भात खालील तात्काळ कृती करण्यात आल्या आहेत:
1. चारधाम यात्रेसाठी आर्यन एव्हिएशनच्या संचालनावर तात्काळ प्रभावाने स्थगिती घालण्यात आली आहे.
2. मे. ट्रान्सभारत एव्हिएशनचे व्हीटी-टीबीसी आणि व्हीटी-टीबीएफ हे दोन हेलिकॉप्टर प्रतिकूल हवामान परिस्थितीत उड्डाण करताना आढळल्याने त्यांच्या दोन्ही वैमानिकांचे अनुक्रमे कॅप्टन कॅप्टन योगेश ग्रेवाल - CPL(H)-1453 जितेंद्र हरजाई- CPL(H)-1046) यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.
3. खबरदारी म्हणून या भागातील सर्व चार्टर व शटल हेलिकॉप्टर सेवा 15 व 16 जून 2025 रोजी स्थगित करण्यात आल्या आहेत.
4. सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी, सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी सर्व ऑपरेटर आणि वैमानिकांसह व्यापक आढावा बैठक घेण्याचे निर्देश यूसीएडीएला देण्यात आले आहेत.
5. यूसीएडीए कडून वास्तविक-वेळ संचालनाच्या देखरेखीसाठी एक स्वतंत्र नियंत्रण व समन्वय कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणत्याही धोक्याच्या संकेतांची त्वरित माहिती दिली जाऊ शकेल.
6. केदारनाथ खोऱ्यातील सर्व हेलिकॉप्टर हालचालींवर सक्रियपणे देखरेख करण्यासाठी आणि यूसीएडीएला नियंत्रण व समन्वय कक्षाच्या कामकाजाचा काटेकोरपणे आढावा घेण्यासाठी हवाई योग्यता, सुरक्षा आणि संचालनासाठी अधिकारी तात्काळ नियुक्त करण्याचे निर्देश नागरी उड्डाण मंत्रालयाने दिले आहेत.
विमान वाहतूक सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही आणि कोणत्याही ऑपरेटरने हवामानाशी संबंधित आणि इतर प्रोटोकॉलचे उल्लंघन करून उड्डाणे करू नयेत, असेही नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले आहे. मानवी जीवनाचे पावित्र्य लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत सर्व तरतुदी पूर्ण अधिकाराने अंमलात आणाव्यात आणि उड्डाण संचालनात शिस्त राखली जाईल याची खात्री करण्याचे निर्देशही नागरी उड्डाण मंत्रालयाने दिले आहेत.
***
S.Kane/N.Gaikwad/R.Dalekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136477)