कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांच्या केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीचा (CPGRAMS) मे 2025 या महिन्याचा अहवाल केला प्रसिद्ध, या प्रणालीचा हा 37वा मासिक अहवाल

Posted On: 13 JUN 2025 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2025

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक  तक्रार विभागाने केंद्रीकृत सार्वजनिक  तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीच्या (CPGRAMS )मासिक अहवालाअंतर्गत मे 2025 या महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात लोकांकडून प्राप्त तक्रारींचे प्रकार, वर्गवारी आणि निवारणाच्या स्वरूपाचे सविस्तर विश्लेषण मांडण्यात आले आहे. या प्रणालीचा प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाने प्रकाशित केलेला हा आत्तापर्यंतचा 37वा मासिक अहवाल आहे.

या अहवालात नमूद मे 2025 या महिन्यातील प्रगतीनुसार केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांनी एकूण 1,24,101 तक्रारींचे निवारण केले आहे. तर 1 मे ते 31 मे 2025 या कालावधीतील तक्रार निवारणाचा सरासरी कालावधी 16 दिवस इतका होता. तक्रार निवारणाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि त्यासाठीच्या कालमर्यादेत घट साध्य करण्याच्या उद्देशाने प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाने केंद्रीकृत सार्वजनिक  तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली अंतर्गत सुधारणांचा दहा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. हा मासिक अहवाल देखील याच सुधारणा कार्यक्रमाचाच एक भाग आहे.

या अहवालात मे 2025 महिन्यात केंद्रीकृत लोक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली पोर्टलवर नोंदणी केलेल्या नव्या वापरकर्त्यांची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार मे 2025 मध्ये एकूण 60,499 नव्या वापरकर्त्यांनी नोंदणी केली, त्यापैकी सर्वाधिक नोंदणी उत्तर प्रदेशमधून (10,043 नोंदणी) झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्याचवेळी अभिप्रायासाठीच्या अर्थात फीडबॅक कॉल सेंटरने मे 2025 या महिन्यात एकूण 65,601 अभिप्राय संकलित केले, त्यापैकी 38,968 अभिप्राय केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांबद्दलचे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच या अहवालात मे 2025 महिन्यात सामायिक सेवा केंद्रांच्यामार्फत नोंदवल्या गेलेल्या तक्रारीवरचे विविध मंत्रालये आणि विभागांनिहाय विश्लेषणही मांडण्यात आले आहे.

या व्यतिरिक्त या अहवालात केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या पुनरावलोकन बैठक प्रारुपांचा (Review Meeting Module) आढावाही दिला आहे. या प्रारुपांमुळे सचिव स्तरावर तक्रारींचे पुनरावलोकन करणे शक्य होते, आणि परिणामी तक्रार निवारण यंत्रणेची कार्यक्षमता वाढते. यामुळे तक्रारदार नागरिकांच्या समाधानातही वृद्धी दिसून येते.

प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाने केंद्रीकृत लोक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीसंबंधी मे 2025 या महिन्यासाठी प्रसिद्ध केलेल्या अहवालातील ठळक बाबी खाली नमूद केल्या आहेत:

लोक तक्रारींची प्रकरणे:

1·  मे 2025 मध्ये केंद्रीकृत लोक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली पोर्टलवर लोक तत्रारींची एकूण 1,25,332 प्रकरणे प्राप्त झाली, यापैकी 1,24,101 प्रकरणांचे निवारण करण्यात आले असून 60,892  प्रकरणे प्रलंबित आहेत.
लोक तक्रारींची अपीलातील प्रकरणे:

2·  मे 2025 मध्ये एकूण 21,332 अपील प्राप्त झाली, त्यांपैकी 23,006 अपीलीय प्रकरणे निकाली काढण्यात आली.

1 मे 2025 ते 31 मे 2025 या कालावधीत केंद्रीय सचिवालयाअंतर्गत लोक तक्रारींची अपीलातील एकूण 23,617 प्रकरणे प्रलंबित आहेत.

3. तक्रार निवारण मूल्यांकन आणि निर्देशांक (GRAI) – मे 2025

तक्रार निवारण मूल्यांकन आणि निर्देशांकाच्या गट ए (500 किंवा त्याहून अधिक तक्रारी) अंतर्गत दूरसंचार विभाग, टपाल विभाग आणि अप्रत्यक्ष कर आणि केंद्रीय सीमाशुल्क मंडळ या विभागांनी मे 2025 मध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

तक्रार निवारण मूल्यांकन आणि निर्देशांकाच्या गट B (500 पेक्षा कमी तक्रारी) अंतर्गत आदिवासी कार्य मंत्रालय, संसदीय कार्य मंत्रालय आणि गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग या विभागांनी मे 2025 मध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

संपूर्ण अहवाल पाहण्यासाठी या दुव्याला भेट द्या.

https://darpg.gov.in/sites/default/files/2025-05-01.pdf


N.Chitale/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2136283)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil