कृषी मंत्रालय
15 दिवस चाललेल्या 'विकसित कृषी संकल्प अभियाना'चा औपचारिक समारोप
केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विविध राज्यांना दिलेल्या भेटीनंतर शेतकऱ्यांशी साधला संवाद
अभियानाच्या समारोपप्रसंगी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी गुजरातमधील बारडोली येथे शेतकऱ्यांना संबोधित केले
55 हजारांहून अधिक कार्यक्रम, 1 लाखाहून अधिक गावांपर्यंत पोहोच आणि सुमारे 1 कोटी 12 लाख शेतकऱ्यांशी संवाद
यंदा साडेसात लाख हेक्टरवर नैसर्गिक शेतीचे उद्दिष्ट- शिवराजसिंह चौहान
Posted On:
12 JUN 2025 8:11PM by PIB Mumbai
अहमदाबाद, 12 जून 2025
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज 'विकसित कृषी संकल्प अभियाना'च्या 15 व्या आणि समारोपाच्या दिवशी गुजरातमधील बारडोली येथे किसान संमेलनाला संबोधित केले. अभियानाच्या समारोपाची औपचारिक घोषणा करताना शिवराजसिंह चौहान म्हणाले की, आज या अभियानाचा समारोप होत असला, तरी शेतकऱ्यांशी संपर्क आणि संवादाची प्रक्रिया सुरूच राहील.
शिवराजसिंह चौहान म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'लॅब टू लँड'च्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी 'विकसित कृषी संकल्प अभियान' सुरू करण्यात आले. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान 18 टक्के आहे.आजही देशाची निम्मी लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. या मोहिमेअंतर्गत 16 हजार शास्त्रज्ञांची 2,170 पथके गठीत करण्यात आली. शास्त्रज्ञांच्या पथकांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांना संशोधनाबाबत योग्य माहिती दिली. परिसरातील हवामानाची परिस्थिती आणि शेतीची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. समतोल खते व कीटकनाशकांच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर भविष्यातील पुढील संशोधनाची दिशाही ठरवण्यात आली.
शिवराज सिंह यांनी सांगितले की ‘विकसित कृषी संकल्प अभियाना’ची आज औपचारिक सांगता होत असली तरी हा शेवट नाही. ‘एक राष्ट्र – एक शेती – एक संघ’ या भावनेने शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्क व संवाद सुरू राहील. शेतीमध्ये सुधारित वाणांचा वापर, यांत्रिकीकरण, प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादन, सिंचनासाठी पाण्याचा प्रभावी वापर, नवीन बियाण्यांचा वापर या दिशेने आपण पुढे जाणे आवश्यक आहे.
यंदा साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.यासाठी 18 लाख शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. शेती प्रगत व्हावी आणि समृद्धीसह शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटावे, यासाठी आम्ही दिवसरात्र काम करत आहोत, असे चौहान यांनी सांगितले
शेवटी,शिवराज सिंह चौहान यांनी या अभियानाचा औपचारिक समारोप जाहीर केला आणि अभियानातील शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय सहभागाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या अभियानांतर्गत सुमारे 1 कोटी 12 लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला असून 1 लाखांहून अधिक गावांमध्ये पोहोचता आले आहे. 55 हजारांहून अधिक ठिकाणी संवाद कार्यक्रम घेण्यात आले आहेत, हे सांगताना आनंद वाटतो आहे, असे ते म्हणाले. या अभियानादरम्यान आम्ही अशा शेतकऱ्यांनाही भेटलो ज्यांनी नव्या कल्पना आणि योजनांचा लाभ घेऊन आपले उत्पन्न 10 पटीने वाढवले. हे शेतकरी खरे शास्त्रज्ञ असून त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन घेता येईल. या साऱ्या अनुभवांवर आणि प्रयत्नांच्या आधारे आम्ही भविष्यातील कृषी धोरणे ठरवू आणि शेती अधिक सक्षम करू,असे त्यांनी सांगितले.
ही राष्ट्रव्यापी 15 दिवसीय मोहीम 29 मे रोजी ओदिशात सुरू झाली. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी विविध राज्यांना भेटी दिल्या आणि किसान चौपाल, संमेलने, पदयात्रा या माध्यमांतून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या अभियानांतर्गत शिवराज सिंह चौहान यांनी ओदिशा, जम्मू, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, महाराष्ट्र, पंजाब,उत्तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, दिल्ली, गुजरात इथे भेट दिली.
S.Kakade/R.Agashe/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136037)