रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रथमच मालमत्ता मुद्रीकरण धोरण दस्तऐवज केले जारी
Posted On:
09 JUN 2025 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2025
भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासात कार्यरत राष्ट्रीय महामार्ग मालमत्तेच्या मूल्याचा लाभ घेण्यासाठी आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी वाढवण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज त्यांचे पहिले 'रस्ते क्षेत्रासाठी मालमत्ता मुद्रीकरण धोरण' जारी केले. हे धोरण एक संरचित चौकट सादर करते जे टोल-ऑपरेट-ट्रान्सफर (ToT), पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट (InvITs) आणि सिक्युरिटायझेशन मॉडेल्सद्वारे भांडवल जमवण्यासाठी एक मजबूत रूपरेषा प्रदान करते. या साधनांमुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन अंतर्गत 6,100 किमी पेक्षा जास्त लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांसाठी 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारण्यास मदत झाली आहे.
हे धोरण तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे, ज्यामध्ये सरकारी रस्ते मालमत्तेचे मूल्य वाढवणे, प्रक्रियांची पारदर्शकता आणि गुंतवणूकदारांशी संबंधित माहितीचा प्रसार करणे आणि गुंतवणूकदारांची संख्या वाढवून बाजारपेठेचा विकास करणे तसेच हितधारकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे.
जारी करण्यात आलेल्या धोरण दस्तावेजाबद्दल बोलताना, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव म्हणाले, "मालमत्ता मुद्रीकरणासाठी एनएचएआयने अवलंबलेला अनोखा दृष्टिकोन केवळ आर्थिक शाश्वतता सुनिश्चित करत नाही तर खाजगी क्षेत्रासाठी संधी देखील खुल्या करतो , प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतो, आपल्या रस्ते मालमत्तेची गुणवत्ता आणि दीर्घायुष्य वाढवतो. या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे एनएचएआयला वित्तपुरवठाचा स्थिर प्रवाह मिळेल, ज्यामुळे पारंपारिक निधी स्रोतांवरील आपले अवलंबित्व कमी होईल."
एनएचएआयचे मालमत्ता मुद्रीकरण धोरण केंद्र सरकारच्या मालमत्ता मुद्रीकरण योजना - 2025-30 अंतर्गत उद्दिष्टाशी सुसंगत आहे आणि शाश्वत, बाजार-संचालित पायाभूत सुविधांच्या वित्तपुरवठ्याच्या दिशेने एक महत्त्वाचे संक्रमण अधोरेखित करते. हे धोरण दस्तऐवज एनएचएआयच्या वेबसाइट https://nhai.gov.in/nhai/sites/default/files/mix_file/Asset-Monetization_Strategy_Document.pdf वर उपलब्ध आहे.
पर्यायी वित्तपुरवठा व्यवस्थेकडे सर्वप्रथम वळणाऱ्या काही संस्थांपैकी एक असलेले एनएचएआय विविध मुद्रीकरण साधनांचा यशस्वीपणे वापर करत आहे. रस्ते नेटवर्कच्या मूल्याचा लाभ घेण्यात एनएचएआयद्वारे मालमत्ता मुद्रीकरणाचे यश महत्त्वाचे असून देशातील राष्ट्रीय महामार्ग ढाचा विकासात त्याने योगदान दिले आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135228)