वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर ब्रेशिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली
Posted On:
06 JUN 2025 2:41PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर इटलीचे उत्पादन केंद्र असलेल्या ब्रेसिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. पियुष गोयल यांच्या इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या (जेसीईसी) 22 व्या अधिवेशनाचे सहअध्यक्षपद भूषवले. यावेळी भारत आणि इटली मध्ये अनेक उदयोन्मुख आणि धोरणात्मक क्षेत्रातील सहकार्याला प्राधान्य देण्यावर सहमती झाली. यामध्ये इंडस्ट्री 4.0, एरोस्पेस, ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत गतिशीलता यांचा समावेश आहे. कौशल्य विकास, डिजिटल परिवर्तन, स्थलांतर आणि गतिशीलता तसेच भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर यासारख्या जागतिक कनेक्टिविटी उपक्रमांमधील संयुक्त प्रयत्नांच्या महत्त्वावरही दोन्ही बाजूंनी भर दिला.
जेसीईसीमधून अनेक ठोस निष्कर्ष समोर आले. भारत आणि इटलीने कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याचा आणि ऑटोमोबाईल आणि अंतराळ क्षेत्रात संयुक्त कार्यगट स्थापन करण्याचा संकल्प केला. दोन्ही बाजूंनी शाश्वत कृषी-मूल्य साखळी, कृषी-यंत्रसामग्री, अन्न पॅकेजिंग तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सहकार्याच्या संधी ओळखल्या. दोन्ही देशांनी हरित हायड्रोजन आणि जैवइंधन यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यावर सहमती दर्शविली तसेच दोन्ही देशांदरम्यान परस्परांच्या कुशल व्यावसायिकांची ये-जा सुलभ करण्याचा हेतू व्यक्त केला. या भेटीदरम्यान सुमारे 90 कंपन्यांच्या उच्चपदस्थ नेतृत्वाचा समावेश असलेले भारतीय व्यावसायिकांचे प्रतिनिधीमंडळ केंद्रीय मंत्री गोयल यांच्याबरोबर होते. या प्रतिनिधीमंडळाने इटालियन उद्योगांना भेट दिली आणि स्थानिक कंपन्यांबरोबर अनेक बैठका घेतल्या. गोयल यांनी देखील इटालियन कॉर्पोरेट नेत्यांशी थेट संवाद साधला, आणि भारतात परिचालन , उत्पादन किंवा कार्यालयांचा विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचे स्वागत केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, गोयल आणि उपपंतप्रधान ताजानी यांनी ब्रेशिया येथील ए2ए या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या इटालियन कंपनीला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत प्रतीकात्मक उपक्रम म्हणून, दोन्ही नेत्यांनी सांता गिलिया युनेस्को वारसा संकुलात आपल्या आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134544)