संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्यामध्‍ये नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी व्यक्त केली सहमती

Posted On: 04 JUN 2025 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2025

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री  रिचर्ड मार्ल्स यांच्या दरम्यान  आज, 4 जून,2025 रोजी नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक झाली. दोन्ही मंत्र्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि या निर्घृण हल्ल्यामध्‍ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. सीमेपलीकडून होत असलेल्या  दहशतवादी हल्ल्‍याला स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर देण्याचा भारताचा अधिकार संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केला आणि पाकिस्तानविरुद्ध नवी दिल्लीच्या कृती अगदी अचूक, संतुलित, तणावरोधक, प्रमाणबद्ध आणि जबाबदार असल्याचे सांगितले. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी  एकत्र काम करण्याचे उभय नेत्‍यांनी मान्य केले.

या बैठकीनंतर समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील एका पोस्टद्वारे, संरक्षणमंत्र्यांनी पहलगाममधील क्रूर दहशतवादी कृत्याविरुद्ध भारताच्या दृढ प्रतिसादाला ऑस्ट्रेलियाने दिलेल्या स्पष्ट, ठोस  पाठिंब्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे आभार मानले.

दोन्ही मंत्र्यांनी ऑस्ट्रेलिया-भारत संयुक्त संशोधन प्रकल्पावर स्वाक्षरी करण्याचे स्वागत केले आणि संरक्षण उद्योग सहकार्य अधिक वेगाने करण्‍याबरोबरच त्यामध्‍ये  वैविध्य आणण्‍यासाठी   सहमती दर्शविली. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रिस्तरीय बैठकीसाठी त्यांनी संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य प्रकल्पांना पुढे नेण्यावर चर्चा केली. नोव्हेंबर 2023  मध्ये झालेल्या शेवटच्या 2+2 मंत्रिस्तरीय संवादानंतर झालेल्या प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला.

या बैठकीमुळे दोन्ही बाजूंना उदयोन्मुख प्रादेशिक आणि जागतिक परिस्थितींच्या संदर्भात द्विपक्षीय सहभागाच्या  स्थितीचे  पुनरावलोकन करण्याची संधी मिळाली. या चर्चेत उद्योग सहकार्य, सायबर आणि नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी, जलविज्ञान आणि सागरी सुरक्षा यासारख्या विस्तृत मुद्द्यांचा समावेश होता. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा मुद्द्यांवरही दोन्ही बाजूंनी विचारांची देवाणघेवाण केली.

भारत-ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारीवर स्वाक्षरी करण्याच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त, दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले आणि संरक्षण सहकार्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ही भागीदारी उदयास आली  आहे,हे मान्य केले.दोन्ही देशांमधील वाढत्या धोरणात्मक अभिसरणाबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आणि मुक्त आणि खुल्या हिंद महासागर आणि पॅसिफिक बेट प्रदेशासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले.

दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य सतत मजबूत करण्याचे आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, समृद्धी, स्थिरता आणि प्रगतीचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचे आवाहन केले.

ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या संघीय निवडणुकीत कामगार पक्षाच्या प्रभावी विजयानंतर  रिचर्ड मार्ल्स यांची  पुन्हा नियुक्ती झाल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी अभिनंदन केले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला आणि शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली.

या बैठकीच्या आधी माणेकशॉ केंद्र येथे तीनही सैन्यदलाच्यावतीने ऑस्‍‍ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांना मानवंदना देण्‍यात आली आणि मान्यवरांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

ऑस्‍ट्रेलियाचे संरक्षण मंत्री मार्ल्स 3 आणि 4 जून 2025 रोजी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणून पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे.

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2133918)