शिक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात लिव्हरपूल विद्यापीठाला स्वारस्यपत्र करण्यात आले सुपूर्द
लिव्हरपूल विद्यापीठ भारतात संकुल स्थापन करणारे दुसरे ब्रिटिश विद्यापीठ बनले
एसटीईएम (STEM) मध्ये संकुल सुरु करण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठे भारतात येणार - धर्मेंद्र प्रधान
शाश्वतता, आरोग्य आणि निरामयता आणि समृद्धी हा आज जगाचा सामायिक अजेंडा आहे आणि विद्यापीठे त्याचे केंद्र आहेत - धर्मेंद्र प्रधान
Posted On:
26 MAY 2025 3:13PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे लिव्हरपूल विद्यापीठाला स्वारस्यपत्र (लेटर ऑफ इंटेंट) सुपूर्द करण्याच्या समारंभाचे अध्यक्षपद भूषवले. विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी द्वारे (भारतात परदेशी उच्च शैक्षणिक संस्थांच्या संकुलाची स्थापना आणि संचालन) अधिनियम ,2023 अंतर्गत स्वारस्यपत्र मिळवणारे हे दुसरे परदेशी विद्यापीठ आहे.
भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन सीबी ओबीई; युजीसीचे अंतरिम अध्यक्ष आणि शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी; लिव्हरपूल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. टिम जोन्स; लिव्हरपूल विद्यापीठातील जागतिक सहभाग आणि भागीदारीसाठी प्र-कुलगुरू प्रा . तारिक अली; यांच्यासह परराष्ट्र मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकारी आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट (आरसीओजी), अॅस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेड, यूवीकॅन आणि ड्रीम 11 यासारख्या कंपन्या आणि संस्थांसोबत भविष्यातील सहकार्याच्या संधींचा शोध घेण्यासाठी आज तीन महत्त्वाचे सामंजस्य करार देखील करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना प्रधान म्हणाले की, हे स्वारस्यपत्र जागतिक उच्च शिक्षणात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताच्या उदयाला दुजोरा देते . आघाडीच्या जागतिक विद्यापीठांसोबत शैक्षणिक भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासातला हा आणखी एक मैलाचा दगड आहे. ही अशी एक आकांक्षा आहे जी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या परिवर्तनकारी दृष्टिकोनात दृढपणे अंतर्निहित आहे असे ते म्हणाले.



प्रधान यांनी संशोधन आणि विकास तसेच नवोन्मेष यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आणि लिव्हरपूल विद्यापीठ नवोन्मेषाला चालना देणाऱ्या विज्ञान, तंत्रज्ञान , अभियांत्रिकी आणि गणित (STEM) संबंधित संशोधनावर लक्ष केंद्रित करणार आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. जागतिक नागरिकांची एक नवीन पिढी तयार करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. भारतातील नवोन्मेष केंद्र विद्यापीठ आणि समाज दोघांसाठीही परस्पर लाभदायी ठरेल, असे ते म्हणाले. लिव्हरपूल विद्यापीठ हे भारतात आपली शाखा जाहीर करणारे चौथे परदेशी विद्यापीठ आहे यावर त्यांनी भर दिला. या शैक्षणिक वर्षापर्यंत, 15 परदेशी विद्यापीठे भारतात विशेषतः STEMB मध्ये येतील असे ते म्हणाले.-----------------------------------------
बंगळुरूमधील लिव्हरपूल विद्यापीठाचा परिसर हा एक जागतिक परिसर असेल, जो संशोधन आणि नवोन्मेषाच्या सीमा ओलांडेल तसेच जागतिक कल्याण आणि समृद्धीसाठी योगदान देण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाश्वतता, आरोग्य व कल्याण आणि समृद्धी हे आज जगाच्या विषयपत्रिकेवरील सामान्य मुद्दे आहेत आणि विद्यापीठे हे त्याची आकर्षण केंद्र आहेत असे मंत्री म्हणाले. 'वसुधैव कुटुंबकम' या तत्वज्ञानाने युक्त भारत हे जागतिक मुद्दे चालवण्यासाठी आणि जागतिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी योग्य ठिकाण आहे, असेही त्यांनी सांगितले.
लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरूमध्ये पहिले परदेशी विद्यापीठ संकुल उघडण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) कडून औपचारिक मान्यता मिळाली आहे. ऑगस्ट 2026 मध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटाचे स्वागत करण्यासाठी नियोजित असलेले हे विद्यापीठ सुरुवातीला व्यवसाय व्यवस्थापन, लेखा आणि वित्त, संगणक विज्ञान आणि बायोमेडिकल सायन्सेस या विषयांमध्ये अभ्यासक्रम सादर करेल. उल्लेखनीय म्हणजे, ते गेम डिझाइनमध्ये एक कार्यक्रम देखील सादर करेल. हा भारतातील युके विद्यापीठ संकुल देत असलेला एक नाविन्यपूर्ण विषय आहे. नवीन संकुल समृद्ध जागतिक विनिमय संधी देखील निर्माण करेल, ज्यामुळे युके- स्थित विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अभ्यासासाठी एक रोमांचक नवीन गंतव्यस्थान मिळेल.
या कार्यक्रमादरम्यान 'द फ्री ट्रेड अॅग्रीमेंट अँड बियॉन्ड' आणि 'द इंडिया-युके चॅलेंज ऑफ अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर)' या शीर्षकाखाली दोन पॅनेल चर्चा देखील आयोजित करण्यात आल्या.
लिव्हरपूल विद्यापीठाबद्दल
1881 मध्ये मूळ 'रेड ब्रिक' म्हणून स्थापित, लिव्हरपूल विद्यापीठ हे युकेच्या आघाडीच्या संशोधन-केंद्रित उच्च शिक्षण संस्थांपैकी एक आहे ज्याची वार्षिक उलाढाल £ 708.3 दशलक्ष आहे. जगभरातील अव्वल 175 विद्यापीठांमध्ये सातत्याने स्थान मिळवलेले हे विद्यापीठ रसेल ग्रुप या युकेतील आघाडीच्या संशोधन विद्यापीठांच्या प्रतिष्ठित सदस्यांपैकी एक आहे. त्यांची जागतिक पोहोच आणि प्रभाव देशातील सर्वात मोठ्या नागरी संस्थांपैकी एक म्हणून आपला शैक्षणिक वारसा प्रतिबिंबित करतो.
***
S.Patil/S.Kane/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2131452)