वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जकार्ता इथे 67 व्या शासकीय मंडळाच्या बैठकीत आशियाई उत्पादकता संघटनेच्या अध्यक्षपदाचा भारताने स्वीकारला पदभार


भारत 2025-26 या कालावधीसाठी एपीओच्या धोरणात्मक कार्यसूचीचे नेतृत्व करणार — नवोन्मेष, शाश्वतता आणि डिजिटल परिवर्तनावर भर

Posted On: 21 MAY 2025 5:00PM by PIB Mumbai

 

इंडोनेशियातील जकार्ता इथे 20-22 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या 67 व्या शासकीय मंडळाच्या सत्रात 2025-26 या कार्यकाळासाठी एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदभार भारताने स्वीकारला आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) चे सचिव आणि एपीओचे भारताचे संचालक असलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अमरदीप सिंग भाटिया करीत आहेत.

एपीओचे अध्यक्षपद स्वीकारून भारताने एपीओ व्हिजन 2030 पुढे नेण्यास आणि हरित उत्पादकता 2.0 या चौकटीचा विस्तार करण्यास आपण वचनबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. भारताने डिजिटल परिवर्तन, शाश्वतता, नवोन्मेष आणि उद्योजकतेला  चालना देण्यासाठी प्रादेशिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, आशिया-प्रशांत क्षेत्रातील सतत बदलणाऱ्या उत्पादकता आणि विकासविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समावेशक, प्रतिसादक्षम आणि परिणामकेंद्रित कार्यक्रमांमध्ये भारताचा सक्रिय सहभाग असेल, असे सांगितले.

दरवर्षी, डीपीआयआयटी अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय उत्पादकता परिषद (एनपीसी) च्या माध्यमातून शंभराहून अधिक भारतीय व्यावसायिक एपीओच्या क्षमता बांधणी उपक्रमांमध्ये सहभागी होतात. या कार्यक्रमांमुळे भारतातील उद्योग, सेवा आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीस मोलाचा हातभार लागतो. देशभरात हरित उत्पादकता आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी उद्योग 4.0 या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून विविध प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे.

शासकीय मंडळ ही एपीओचे निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असून ती दरवर्षी संघटनेच्या धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी, महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी आणि सचिवालयाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एकत्र येते. तिची 67 वी वार्षिक बैठक ही इंडोनेशिया सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

एपीओची स्थापना 1961 मध्ये झाली. ही टोकियो स्थित आंतरशासकीय संस्था असून, आशिया-प्रशांत क्षेत्रातील उत्पादकता वृद्धीसाठी परस्पर सहकार्य आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून कार्यरत आहे.

सध्या 21 देशांच्या अर्थव्यवस्था एपीओच्या सदस्य आहेत - बांग्लादेश, कंबोडिया, तैवान, फिजी, हाँगकाँग (निष्क्रिय), भारत, इंडोनेशिया, इराण, जपान, दक्षिण कोरिया, लाओ पीडीआर, मलेशिया, मंगोलिया, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपिन्स, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, तुर्कीए आणि व्हिएतनाम. भारत एपीओचा संस्थापक सदस्य असून, संघटनेचा दृष्टीकोन घडवण्यात आणि उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीत भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

***

S.Patil/R.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2130401)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil