उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

2047 पर्यंत ‘विकसित भारत’ होणे हेच आपले ध्येय, यासाठी सीमांवर शांतता आवश्यक – उपराष्ट्रपती जगदीप धनखड


युद्धजन्य परिस्थिती असेल तर आर्थिक विकास होऊ शकत नाही – उपराष्ट्रपती

राष्ट्रीय सुरक्षेला राष्ट्रवादाप्रती अतूट, ठाम वचनबद्धता आणि अविरत तयारीची गरज – उपराष्ट्रपती

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताच्या कारवाईचा कोणीही पुरावा मागत नाही आहे, कारण ज्या दहशतवाद्यांना आपण लक्ष्य केले होते, त्यांच्या देशाच्या लष्करी दलाने, त्या देशाच्या राजकीय वर्गाने आणि दहशतवाद्यांनी शवपेट्यांना सोबत करून संपूर्ण जागतिक समुदायाला स्वतःहून पुरावा दिला - उपराष्ट्रपती

पंतप्रधानांना विकासाची तीव्र ओढ, त्यांना जलद आणि मोठ्या व्याप्तीने अंमलबजावणी करण्यावर विश्वास  – उपराष्ट्रपती

नुकतेच उद्घाटन झालेले विझिंजम बंदर हे संघराज्य व्यवस्थेचे एक उल्लेखनीय उदाहरण – उपराष्ट्रपती

जहाज बांधणी क्षेत्रात आपण आघाडी घेतली पाहिजे, समुद्रावर नियम-आधारित सुव्यवस्था प्रस्थापित होणेही गरजेचे – उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींच्या हस्ते मोर्मुगाव बंदरातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

Posted On: 21 MAY 2025 2:40PM by PIB Mumbai

 

2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र, विकसित भारत बनणे हेच आपले उद्दिष्ट आहे असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. यासाठी दरडोई उत्पन्नात आठपट वाढ होणे आवश्यक आहे,तसेच यासाठी आपल्या सीमांवर शांतता असणेही गरजेचे आहे ही बाबही त्यांनी नमूद केली. युद्धजन्य परिस्थिती असेल तर आर्थिक विकास होऊ शकत नाही. शांतता ही प्रगती आणि विकासाची मूलभूत गरज आहे असे ते म्हणाले. सामर्थ्यातून शांतता येते – सुरक्षेतील सामर्थ्य, अर्थव्यवस्थेतील सामर्थ्य, विकासातील सामर्थ्य आणि राष्ट्रवादाप्रति असलेली गहिरी, अतूट, बिनशर्त वचनबद्धता महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी राष्ट्रवादाप्रति अतूट वचनबद्धता आणि अविरत तयारीची गरज असते हा विचार आपण अनेक ठिकाणी मांडला असून इथेही पुन्हा तो मांडत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जगदीप धनखड यांनी ऑपरेशन सिंदूरचीही प्रशंसा केली. जेव्हा भारताने 22 एप्रिल रोजी पहलगाम इथल्या पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले... मुरिदके आणि बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या तळांवर  अचूक लक्ष्यभेद केला, त्यातून भारताने जगाला एक ठोस संदेश दिला, हाच संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भूमीतूनही संपूर्ण जगाला दिला. दहशतवादाला आता शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही, हाच तो संदेश होता. आणि भारताने दिलेली शिक्षा अनुकरणीय होती असे ते म्हणाले. भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे, शत्रूच्या भूक्षेत्रात दूरपर्यंत हल्ला केला, या कारवाईतही केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याच्या आपल्या नीतीमूल्यांचे आपण पालन केले असे ते म्हणाले. भारताच्या कारवाईचा कोणीही पुरावा मागत नाही आहे, कारण ज्या दहशतवाद्यांना आपण लक्ष्य केले होते त्यांनी, त्यांच्या देशाच्या लष्करी दलाने, त्या देशाच्या राजकीय वर्गाने आणि दहशतवाद्यांनी शवपेट्यांना सोबत करून संपूर्ण जागतिक समुदायाला स्वतःहून पुरावा दिला, असे त्यांनी सांगितले. हे एक अद्वितीय तसेच कदाचित लोकशाही व्यवस्थेच्या इतिहासातले अतुलनीय यश आहे असे ते म्हणाले.

आजच्या वेगाने बदलत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीत, जागतिक व्यापार, धोरणात्मक अडथळे (strategic choke points), सायबर धोके आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा परस्पर संबंध येतच राहतो. अशावेळी समुद्रावर नियम-आधारित सुव्यवस्था लागू करणे अधिकाधिक आव्हानात्मक होत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली केली. समुद्रावर नियम-आधारित सुव्यवस्था प्रस्थापित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु ती सुरक्षित राखण्यातली आव्हाने कमी नसल्याची बाबही त्यांनी नमूद केली. भारताची सागरी सुरक्षा लवचिक, सक्रिय आणि भविष्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे, यादृष्टीने आपण जहाजबांधणीत आघाडी घेतली पाहिजे, जहाजबांधणीत क्षेत्राचे नेतृत्व झाले पाहीजे असे आवाहन त्यांनी केले. हे आवश्यक असून या क्षेत्रातील मागणी वाढू लागेल असे ते म्हणाले. आपण आपल्या 70% मालाची वाहतूक ही मूल्याच्या दृष्टीने जहाजाने करत आहोत, अशातच आपली अर्थव्यवस्था केवळ मोठी झेप नसून, गरुड भरारी घेत आहे, त्यामुळे या क्षेत्रातली मागणी वाढेल असे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले आणि यासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

गोव्यातील मुर्मुगाव बंदरात आज 3 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प, दोन हार्बर मोबाईल क्रेनची व्यावसायिक कार्यवाही आणि कोळसा हाताळणीसाठी बंदिस्त डोम यांचे उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना धनखड‌ यांनी राष्ट्रासाठी महासागरांचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले, “आज जागतिक आर्थिक शक्ती आणि सागरी शक्ती म्हणून उदयास येणारा आपला भारत हा शांतता, शाश्वतता आणि विकासासाठी वचनबद्ध आहे. आपण याआधीच जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रात उदयास येत आहोत, आपल्या स्वतःच्या अधिकारात एक नेता आहोत. आपले महासागर आता आपल्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, सुरक्षिततेसाठी, आपल्या व्यापारासाठी खरोखर महत्त्वाचे आहेत.”

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना धनखड म्हणाले, “आज सुमारे 300 कोटी रुपयांच्या आर्थिक खर्चाचे तीन प्रकल्प लोकार्पण करण्यासाठी येणे ही माझ्यासाठी एक आनंददायी संधी होती. नरेंद्र मोदी सरकारचा एक पैलू म्हणजे ते लोकार्पण करतात - म्हणजेच ते जलद गतीने पूर्ण करतात. पंतप्रधानांची आवड विकासाची आहे; विकास हे त्यांचे ध्येय आहे व ते जलद अंमलबजावणीवर विश्वास ठेवतात आणि प्रमाणानुसार अंमलबजावणी करतात. महिला आणि सद्गृहस्थांनो, आज समर्पित केलेले हे तीन प्रकल्प भारताची बदलती रूपरेषा परिभाषित करत आहेत.

नुकत्याच उद्घाटन झालेल्या विझिंजम बंदराविषयी बोलताना ते म्हणाले, "केरळमध्ये मी जे पाहिले आहे, ते सचिव [बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग] यांना माहीत आहे. हे संघराज्यवादाचे एक उल्लेखनीय उदाहरण आहेत, पंतप्रधान तेथे उपस्थित आहेत, विविध राजकीय पक्षांचे मुख्यमंत्री तेथे उपस्थित आहेत आणि खाजगी क्षेत्रातील एक महत्त्वाचा‌ समूह‌ ते बंदर फलदायी करत आहे."

भारतीय तटरक्षक दलाच्या समर्पणाची आणि सेवेची प्रशंसा करताना उपराष्ट्रपती म्हणाले, “आजचा दिवस माझ्यासाठी एक खास प्रसंग आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून तीन वर्षे काम केले... चक्रीवादळे, महाचक्रीवादळे यांचा सामना करणारे हे राज्य… मी तटरक्षक दलाचे समर्पण, कामगिरी आणि वचनबद्धता पाहिली. तुमच्या धाडसाला आणि दृढनिश्चयाला सलाम करण्यासाठी मी येथे आलो आहे. सागरी सुरक्षारक्षक म्हणून तुमच्या अढळ दृढनिश्चयाचा मी साक्षीदार आहे, तुम्ही एक अद्भुत काम करत आहात. प्रिय तटरक्षक दलांनो, मला माहीत आहे की तुमचे जीवन सोपे नाही. कठीण परिस्थितीत तुम्ही कठीण आव्हानांना तोंड देता. धोके अनेक आहेत, परंतु स्वतःच्या कर्तव्याप्रति असलेली तुमची वचनबद्धता आणि समर्पण हे सुनिश्चित करते की संकटाच्या वेळी खोल समुद्रात मृत्युदर नाही. पश्चिम बंगालमध्ये, खोल समुद्रातही मृत्युदर शून्य होता आणि चक्रीवादळेही खूप गंभीर होती - तुमच्या समुदायाचे, तुमच्या गणवेशाचे आभार. आणि मग, ओळख कधीकधी उशिराने येते. कधीकधी ती येतही नाही. परंतु समुद्रकिनाऱ्यावरील समुदायांना तुमच्याबद्दल असलेले प्रेम उल्लेखनीय आहे. मी स्वतः पाहिले आहे. तुम्ही आपल्या समुद्रकिनाऱ्यांजवळ राहणाऱ्या लोकांच्या जीवनात मोठा फरक पाडला आहे. राष्ट्र तुम्हाला सलाम करत आहे…

भारतीय तटरक्षक दल हे पोलाद, रणनीती आणि विवेकाने बनलेली शक्ती आहे. आपले महासागर म्हणजे पृथ्वीमातेची फुफ्फुसे‌ आहेत - हवामानाचे नियमन करणारी, निवास, जीवन आणि जैवविविधतेचे समर्थन करणारी. तुम्ही [तटरक्षक] लक्षद्वीपच्या प्रवाळ खडकांवर शांतपणे लक्ष ठेवता. तुम्ही ... सुंदरबनच्या खारफुटींवर लक्ष ठेवता. ऑलिव्ह रिडले कासवे, त्यांचे वास्तव्य असलेली ठिकाणे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे सागरी सस्तन प्राण्यांचे स्थलांतर मार्ग. तुम्ही बेकायदेशीर मासेमारीविरुद्ध कायदे लागू करून, प्रदूषण रोखून आणि तेल गळती आणि विषारी पदार्थांच्या उत्सर्जनाविरुद्ध गस्त घालून सागरी ऱ्हास दूर ठेवून सागरी पर्यावरणाचे संतुलन साधता."

या कार्यक्रमाला गोव्याचे माननीय राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्री. शंतनू ठाकूर, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग सचिव श्री. टी. के. रामचंद्रन आयएएस, भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी, बंदर प्राधिकरण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

***

S.Patil/T.Pawar/N.Mathure/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2130310)