ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने जागतिक मापनशास्त्र दिन 2025 च्या निमित्ताने मीटर कन्वेंशनची 150 वर्षे केली साजरी
Posted On:
20 MAY 2025 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2025
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने आज जागतिक मापनशास्त्र दिन 2025 साजरा केला. 20 मे 1875 रोजी पॅरिसमध्ये ऐतिहासिक मीटर कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी करण्यात आली होती, त्याला आज 150 वर्षे पूर्ण झाली.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणात कायदेशीर मोजमापशास्त्राला आर्थिक विकास आणि ग्राहकांच्या विश्वासाचा आधारस्तंभ बनवण्याचा सरकारचा दृष्टिकोन अधोरेखित केला जो भारतीय मानकांना जागतिक मापदंडांशी सुसंगत बनवण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला अनुरूप आहे.
भारताला ओआयएमएल प्रमाणपत्रे जारी करण्याचा अधिकार आहे अशी घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की भारत अधिकृतपणे ओआयएमएल (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी) प्रमाणपत्रे जारी करणारा जगातील 13 वा देश बनला आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे भारताच्या मापन प्रणालींवरील जागतिक विश्वास वाढून आंतरराष्ट्रीय व्यापारात एक विश्वासार्ह देश म्हणून भारताला स्थान मिळवून दिले आहे . यामुळे भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत व्यापक मान्यता मिळेल.
विशेषतः सोने आणि दागिने यांसारख्या उच्च-मूल्याच्या व्यवहारांमध्ये ग्राहकांना अधिक संरक्षण देण्यासाठी, सरकारने 1 मिलीग्राम प्रिसिजन बॅलन्सचा अनिवार्य वापर प्रस्तावित केला आहे. या निर्णयामुळे सोने, दागिने आणि इतर मौल्यवान धातूंचे वजन करण्यात अधिक अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित होईल, ज्यामुळे ग्राहकांचे हक्क आणि बाजाराचे दायित्व मजबूत होईल.
डिजिटल प्रशासनाकडे वाटचाल करताना, कायदेशीर मापनशास्त्र प्रक्रिया सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी eMaap पोर्टल सुरू करण्यात आले आहे .
केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बी.एल.वर्मा यांनी आपल्या बीजभाषणात निष्पक्ष अर्थव्यवस्था उभारण्यात कायदेशीर मापनशास्त्राची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी जागतिक मापनशास्त्र दिन 2025 च्या निमित्ताने "सर्व काळासाठी, सर्व लोकांसाठी मोजमाप" या संकल्पनेवरील पोस्टर प्रकाशित केले.

S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2130061)