युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डॉ. मनसुख मांडविया यांनी भारताच्या क्रीडा परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी खेलो इंडिया अंतर्गत वार्षिक दिनदर्शिका केली प्रकाशित
Posted On:
18 MAY 2025 5:39PM by PIB Mumbai
देशभरातील तळागाळातील खेळ आणि खेळाडूंच्या विकासाला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत एक व्यापक वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. विविध क्रीडा प्रकारात तरुणांना वर्षभर सहभागी करून घेणारी संरचित, समावेशक आणि स्पर्धात्मक क्रीडा परिसंस्था तयार करण्याचा सरकारचा दृष्टिकोन या उपक्रमातून प्रतिबिंबित होतो.
"खेलो इंडिया वार्षिक दिनदर्शिका हे केवळ एक वेळापत्रक नाही तर भारताला जागतिक क्रीडा महाशक्ती म्हणून रूपांतरित करण्यासाठी भारताच्या देशांतर्गत स्पर्धा संरचना मजबूत करणारा एक धोरणात्मक आराखडा आहे," असे या उपक्रमाबद्दल बोलताना, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले.
या मजबूत पायावर उभारणी केलेल्या खेलो इंडिया छत्राचा मंत्रालय आता विस्तार करत आहे, जेणेकरून भारताच्या विविध प्रदेशातील आजवर वापरात न आलेल्या क्षमता तसेच देशातील विशाल आणि वैविध्यपूर्ण प्रतिभावंतांना जगासमोर आणण्यासाठी यात अधिकाधिक कार्यक्रमांचा समावेश करता येईल.
याशिवाय, खेलो इंडिया मार्शल आर्ट गेम्स, खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया स्वदेशी स्पर्धा या सारख्या कार्यक्रमांचा समावेश करत देशी आणि पारंपरिक मार्शल आर्ट्सना मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश आहे.
या उत्साहात भर घालत, खेलो इंडिया बीच गेम्स ची (KIBG) पहिली आवृत्ती दीव येथे 19 ते 25 मे 2025 दरम्यान होणार आहे. ही ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा समुद्रकिनारी खेळल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांकडे देशाचे लक्ष वेधून घेईल, तसेच या प्रदेशाच्या पर्यटन क्षमता अधोरेखित करेल.
उर्वरित वार्षिक दिनदर्शिकेत खेलो इंडिया शालेय स्पर्धा (ऑगस्ट ते डिसेंबर), खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा (मार्च-एप्रिल), वॉटर स्पोर्ट्स आणि ईशान्येकडील राज्यांच्या क्रीडा स्पर्धा (मे-जून), आदिवासी क्रीडा स्पर्धा (छत्तीसगड, सप्टेंबर) तसेच स्वदेशी आणि मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा (तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये -जुलै-ऑगस्ट) यासारख्या अनेक प्रमुख कार्यक्रमांचा समावेश आहे. देशभरात फिट इंडिया कार्निव्हल (फेब्रुवारी, दिल्ली), अस्मिता लीग आणि पीस अँड डेव्हलपमेंट लीग उपक्रम यासारखे पूरक उपक्रम देखील वर्षभर चालतील.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129482)