अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्तू आणि सेवा कराच्या  अंमलबजावणीला आठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी ) वतीने ‘संडेज ऑन सायकल ’ या फिटनेस आणि वस्तू आणि सेवाकर विषयक जनजागृती मोहिमेचे आयोजन

Posted On: 18 MAY 2025 2:31PM by PIB Mumbai

 

वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीला आठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने  ‘संडेज ऑन सायकल ’  या देशव्यापी सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळी अंतर्गत आणि फिट इंडिया चळवळीच्या समन्वयाने हा उपक्रम आयोजित केला गेला. या मोहिमेअंतर्गतचे मुख्य आयोजन आज जीएसटी  सकाळी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम इथे केले गेले. यात देशभरातील 100 पेक्षा जास्त सीजीएसटी आयुक्तालयांनीही सहभाग घेतला होता.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे सदस्य शशांक प्रिया यांनी नवी दिल्ली इथल्या सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. आपल्या संवादातून त्यांनी वस्तू आणि सेवा कराचा भारताच्या कर प्रणालीवरील  परिवर्तनकारी परिणामांविषयी सांगितले. वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सुमारे 30 वेगवेगळ्या अप्रत्यक्ष करांचे एकात्मिकीकरण करून कशारितीने एकच पारदर्शक कर व्यवस्था तयार केली गेली हे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे व्यवसाय आणि नागरिक दोघांसाठीही कर प्रशासन आणि संबंधित अनुपालन सुलभ झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

जीएसटी कंपोझिशन योजना आणि मासिक पेमेंट तिमाही विवरणपत्र  (Quarterly Return Monthly Payment - QRMP) योजनेसारख्या उपक्रमांद्वारे छोट्या करदात्यांना मिळत असलेल्या लाभांची माहिती देखील त्यांनी उपस्थितांना दिली. यामुळे अनुपालन भार कमी झाला असून व्यवसाय सुलभता वाढली असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय वस्तु आणि सेवा कराच्या मुंबई आणि पुणे विभागातून अभिनेता सुनील शेट्टी, मिलिंद सोमण  आणि जॉन अब्राहम हे बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या उपक्रमात सहभागी झाले होते.

या सायक्लोथॉनमध्ये देशभरातील 50,000 हून अधिक सायकलस्वारांनी उत्साहाने भाग घेतला. यामध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे  वरिष्ठ अधिकारी –केंद्रीय वस्तू आणि सेवा कर दिल्ली विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त राजेश सोधी, वस्तू आणि सेवा कर विभागाचे  प्रधान महासंचालक तसेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे महासंचालक सी.पी. गोयल, आणि करदाता सेवेचे महासंचालक महेश कुमार रस्तगी या वरीष्ठ अधिकाऱ्यांसह विविध मंत्रालये आणि विभागांचे प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक देखील या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी, सहभागींशी संवाद साधण्यासाठी आणि जीएसटी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी जीएसटी विषयी जाणून घ्या हे समर्पित जीएसटी मदत दालनही  उभारण्यात आले होते. सुलभता तसेच प्रचार प्रसाराची व्याप्ती वाढवण्यासाठी, जीएसटीच्या प्रमुख विषयांवरील विविध माहितीपूर्ण पुस्तिकांचेही वाटप यावेळी केले गेले.

याशिवाय ठिकठिकाणी क्यूआर कोडची सोय असलेली डिजीटल  किओस्कदेखील उभारण्यात आले होते. यामुळे या उपक्रमात सहभागी झालेल्यांना स्कॅन करून थेट आपल्या मोबाइल उपकरणावर जीएसटी विषयक सामग्री डाउनलोड करता आली.

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2129440)