पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
नेपाळमधील काठमांडू येथील पहिल्या सगरमाथा संवादात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी नाजूक पर्वतीय परिसंस्थांच्या संरक्षणाकरिता 'जागतिक कृतीसाठी पाच-सूत्री आवाहन' केले सादर
Posted On:
16 MAY 2025 2:39PM by PIB Mumbai
काठमांडू, नेपाळ येथे आयोजित सगरमाथा संवादाच्या उद्घाटन सत्रात आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 'हवामान बदल, पर्वत आणि मानवतेचे भविष्य' या संकल्पनेखाली उच्चस्तरीय जागतिक संवाद आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये जगभरातील मंत्री आणि हवामान नेत्यांचा सहभाग होता.
शिखर परिषदेतील उपस्थितांना संबोधित करताना भूपेंद्र यादव यांनी जागतिक हवामान कृतीसाठी भारताच्या अतूट वचनबद्धतेवर तसेच हिमालय आणि इतर पर्वतीय परिसंस्थांचे रक्षण करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला. जागतिक हवामान संकटाला तोंड देण्याप्रति भारताची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.
संवाद आयोजित केल्याबद्दल यादव यांनी नेपाळचे कौतुक केले आणि सांगितले की, भारत आपल्या विशाल हिमालयीन प्रदेशासह, आपल्या पर्वतीय शेजाऱ्यांशी समान पर्यावरणीय आणि सांस्कृतिक बंध सामायिक करतो. जागतिक लोकसंख्येच्या जवळपास 25 % लोकसंख्या असूनही दक्षिण आशियाचा ऐतिहासिक जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात फक्त 4% वाटा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यादव यांनी भारत आणि नेपाळ या प्रदेशासारख्या अतिउंचावरील परिसंस्थांच्या अफाट जैवविविधता मूल्यावर भर दिला. त्यांनी सीमापार संवर्धन प्रयत्न वाढवण्याच्या गरजेवर भर दिला, सर्व हिमालयीन राष्ट्रांना हिम बिबटे, वाघ आणि बिबटे यांसारख्या प्रजातींसाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स अंतर्गत संयुक्त संरक्षण उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. "या अलौकिक प्रजातींच्या संरक्षणासाठी संवर्धन कौशल्य वाढवणे, महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करणे आणि ज्ञानाचे भांडार तयार करणे हे या आघाडीचे उद्दिष्ट आहे", असे त्यांनी सांगितले.
पर्वतीय प्रदेशांच्या सामायिक पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्याकरिता जागतिक कृतीसाठी पाच-कलमी आवाहनही मंत्र्यांनी मांडले.
• वैज्ञानिक सहकार्य वाढविणे
• हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी लवचिकता निर्माण करणे
• पर्वतीय समुदायांना सक्षम बनवणे
• हरित वित्तपुरवठा उपलब्ध करणे
• पर्वतीय दृष्टिकोन जाणून घेणे


***
S.Kane/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129101)