सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत बुद्धांची केवळ जन्मभूमी नाही, तर अहिंसा, सजगता आणि मध्यममार्ग या त्यांच्या जागतिक संदेशाचा रक्षकही आहे - गजेंद्र सिंह शेखावत

Posted On: 15 MAY 2025 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2025

नवी दिल्लीतील डॉ.बी.आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आज भगवान शाक्यमुनी बुद्धांना आध्यात्मिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आदरांजलीपर कार्यक्रमात वैशाख बुद्ध पौर्णिमा 2025 चे औपचारिक उद्घाटन म्हणून करण्यात आले.बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तिन्ही घटनांचे औचित्य साधून सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेखावत यांनी यावेळी पवित्र बौद्ध वारशाचे संरक्षक म्हणून भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. "भारत ही केवळ बुद्धांची जन्मभूमी नाही - तर ती अहिंसा, सजगता आणि मध्यममार्गाच्या त्यांच्या जागतिक संदेशाची रक्षक आहे," असे शेखावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक दृष्टिकोनाला अधोरेखित करताना सांगितले.

‘भारत आपला पवित्र वारसा सक्रियपणे सामायिक करत आहे आणि जतन करत आहे. अलिकडच्या काळात, भारत सरकारने जागतिक बौद्ध संबंध मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रयत्नांपैकी एक म्हणजे पवित्र बुद्ध अवशेषांचे प्रदर्शन. हे अवशेष - म्हणजेच श्रद्धा आणि भक्तीचा खजिना - मंगोलिया, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये विशेष दौऱ्यांवर पाठवण्यात आला होता. यामुळे परदेशातील आपल्या बौद्ध बांधवांशी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंध आणखी दृढ होतील." असे शेखावत यांनी समृद्ध बौद्ध वारशावर प्रकाश टाकताना सांगितले,

हे प्रदर्शन औपचारिकतेच्या पलीकडे जात - ते सांस्कृतिक राजनैतिकता आणि आध्यात्मिक एकतेचे कृत्य बनले आहे. बुद्धांचे पवित्र अवशेष जिथे जिथे जातात तिथे ते भक्ती जागृत करतात, संबंध अधिक दृढ करतात आणि बौद्ध धर्माचा आध्यात्मिक उगमस्थान असलेल्या भारताची भूमिका आणखी स्पष्ट करतात, असेही त्यांनी पुढे सांगितले. आतापर्यंत, गेल्या दहा दिवसांत, व्हिएतनाममधील 18 लाखांहून अधिक लोकांनी या  पवित्र अवशेषांचे दर्शन आणि  आशीर्वाद घेतले आहेत.

या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे, संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी बुद्धांच्या शिकवणींच्या समावेशक प्रासंगिकतेवर भर दिला "बुद्धांची शिकवण   विशेषतः अशांतता आणि अनिश्चिततेच्या काळात सर्वांसाठी मार्गदर्शक प्रकाश आहे,." असैही ते म्हणाले.

या कार्यक्रमात 600 हून अधिक लोक उपस्थित होते. यामध्ये संघ, भिक्षू, बौद्ध धर्माचे विद्यार्थी, सामान्य साधक आणि इतर लोकांचा समावेश होता. विविध देशातील राजनैतिक समुदायाचे सदस्य देखील यावेळी उपस्थित होते. भूतान, मंगोलिया, नेपाळ आणि श्रीलंकेच्या राजदूतांचा तसेच लाओस, जपान, रशिया, तैवान आणि कंबोडिया येथील प्रतिनिधींचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात दोन प्रमुख प्रदर्शने भरवण्यात आली होती -भारताचा तुलनात्मक बौद्ध कला इतिहास आणि तसेच व्हिएतनाममधील संयुक्त राष्ट्रांच्या वेसाक दिन 2025 च्या कार्यक्रमांचा भाग असलेले बुद्धांचे जीवन आणि शिकवण.


 N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2128969) Visitor Counter : 10