सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
ग्लोबल ऍक्सेसिबिलिटी अवेअरनेस डे निमित्त 15 मे 2025 रोजी इन्क्लुझिव इंडिया परिषदेचे आयोजन
दिव्यांग व्यक्तींकरिता सर्वसमावेशक विकास व डिजिटल अॅक्सेसिबिलिटीला चालना देणारी परिषद
Posted On:
14 MAY 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2025
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग (डीईपीडब्ल्यूडी) तर्फे ग्लोबल अॅक्सेसिबिलिटी अवेअरनेस डे (जीएएडी) निमित्त ‘इन्क्लुझिव इंडिया परिषद’ चे आयोजन 15 मे 2025 रोजी करण्यात आले आहे. जीएएडी हा दिवस जगभरातील दिव्यांग व्यक्तींसाठी डिजिटल प्रवेशयोग्यता आणि समावेशनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो.
ही परिषद हायब्रीड पद्धतीने, म्हणजेच प्रत्यक्ष व आभासी स्वरूपात इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे होणार आहे. याचे आयोजन एसबीआय फाउंडेशन आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब), नवी दिल्ली यांच्या भागीदारीत, तसेच असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसेबिलिटी (एपीडी) आणि मिशन अॅक्सेसिबिलिटी (धनंजय संजोगता फाउंडेशन) यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
या परिषदेचा उद्देश देशात सर्वसमावेशक विकास व डिजिटल अॅक्सेसिबिलिटीला चालना देणे, तसेच सरकार, उद्योगजगत, शिक्षणसंस्था, नागरी समाज आणि दिव्यांग समुदाय यांच्यातील सहकार्य बळकट करून दिव्यांग व्यक्तींना समान संधी व प्रवेशयोग्य वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे.
या कार्यक्रमात डीईपीडब्ल्यूडीचे सचिव राजेश अग्रवाल हे अध्यक्षस्थानी असतील. परिषदेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे डिजिटल अॅक्सेसिबिलिटीवरील परिसंवाद , ज्यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती दिव्यांग व्यक्तींकरिता तंत्रज्ञान आणि उत्पादने अधिक समावेशक व प्रवेशयोग्य करण्यासाठी आवश्यक उपायांवर चर्चा करतील.
या प्रसंगी डीईपीडब्ल्यूडी विविध संस्थांशी सामंजस्य करार (एमओयू) स्वाक्षरी करणार आहे. यात आय फॉर ह्यूमिनिटी फाउंडेशन , निपमॅन फाउंडेशन, यंग लीडर्स फॉर ऍक्टिव्ह सिटीजनशिप (वाईएलएसी) आणि रॅम्प माय सिटी फाउंडेशन यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात मिशन अॅक्सेसिबिलिटी अंतर्गत देशातील दिव्यांग जनाच्या प्रवेशयोग्यतेच्या स्थितीचे सादरीकरण करणारा वार्षिक अॅक्सेसिबिलिटी रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध करेल. तसेच, विभागीय योजनांची माहिती देणारा एआय-सक्षम चॅटबॉट जाहीर केला जाईल.
याच कार्यक्रमात, संगणक विज्ञान आणि आरेखन अभ्यासक्रमांमध्ये डिजिटल अॅक्सेसिबिलिटी मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करणारे मसुदा अभ्यासक्रम देखील सादर केला जाईल. हा अभ्यासक्रम एपीडीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सल्लामसलत प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आला आहे.
‘इन्क्लुझिव इंडिया परिषद’ ही केवळ समावेशनाचा मुद्दा समोर आणणारी कृती नाही, तर डिजिटल जगाला सर्वांसाठी प्रवेशयोग्य बनविण्याकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128769)