संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त युद्ध अभ्यास केंद्राच्या (CENJOWS) वतीने मध्यम - पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली (MRSAM) विषयक इंडिया इको-सिस्टम समिट 2.0 या शिखर परिषदेचे आयोजन

Posted On: 08 MAY 2025 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मे 2025

 

संयुक्त युद्ध अभ्यास केंद्राने (Centre for Joint Warfare Studies - CENJOWS) एरोस्पेस सर्व्हिसेस इंडिया (ASI) आणि इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) यांच्या सहकार्याने मध्यम - पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली (MRSAM) विषयक आयोजित केलेली इंडिया इको-सिस्टम समिट 2.0 ही शिखर परिषद यशस्वीपणे पार पडली.  7 मे, 2025 रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ केंदा्मध्‍ये  ही परिषद आयोजित केली गेली होती. या एकदिवसीय शिखर  परिषदेत भारताच्या संरक्षण परिसंस्थेतील प्रमुख भागधारक एकत्र आले होते. या परिषदेतील चर्चांमधून आत्मनिर्भर भारत आणि मेक-इन-इंडिया उपक्रमांतर्गत देशाच्या हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी सहकार्यपूर्ण भागिदारीतून मिळालेले यश आणि भविष्यातील शक्यता अधोरेखित केल्या गेल्या.

या कार्यक्रमात संरक्षण मंत्रालय, सशस्त्र दले, भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनामिक्स लिमिटेड तसेच संरक्षण क्षेत्रातील भारतातील प्रमुख उत्पादकांचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी आपल्या मनोगत आणि विचारांतून प्रगत संरक्षण प्रणाली क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याची परस्पर सामायिक वचनबद्धता ठळकपणे व्यक्त केली. एरोस्पेस सर्व्हिसेस इंडियाने देखील भारतातील संरक्षण सेवा विषयक प्रमुख पुरवठादार बनण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान  भूषवले. या क्षेत्रातील प्रमुख उद्योगपतींनीही या परिषदेत मार्गदर्शन केले. त्यांनी आपापल्या संबोधनातून भारत आणि इस्रायलच्या संरक्षण क्षेत्रातील परस्पर वाढत्या समन्वयावर भर दिला.  या शिखर परिषदेत खाली नमूद महत्वाची सत्रे पार पडली.:

  • क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये कार्यान्वयात्मक सज्जता आणि आत्मनिर्भरता या विषयावरील निमंत्रीतांची चर्चा.
  • एरोस्पेस सर्व्हिसेस इंडियाने विकसित केलेल्या STORMS या सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाधारित सेवा व्यवस्थापन प्रणालीचे तंत्रज्ञानविषयक प्रदर्शन.
  • स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताची दीर्घकालीन क्षमता निर्माण करण्यासंबंदीच्या मुद्यांवर या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांमधील संवाद.

या शिखर परिषदेत एरोस्पेस सर्व्हिसेस इंडिया (ASI) आणि इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) या संपूर्णपणे भारतीय मालकीच्या उपकंपन्यांनी साध्य केलेले यश अधोरेखित केले गेले. या दोन्ही संस्थांनी मध्यम-पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली (MRSAM) आणि त्याच्याशी संबंधित बराक 8 क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण प्रक्षेपण नियंत्रक रडार (Air Defence Fire Control Radar) या उपप्रणालींकरता तंत्रज्ञान सहाय्य, जसे की फायर कंट्रोल रडारसाठी तांत्रिक प्रतिनिधित्व, पूर्ण कार्यकालीन सेवा सहाय्य आणि स्थानिक पातळीवरी उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सातत्यपूर्ण परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारी, क्षमता विकास आणि स्थानिक पातळीवरील नवोन्मेषाच्या माध्यमातून एक लवचिक आणि भविष्याला अनुसरून असलेली हवाई संरक्षण पायाभूत सुविधा स्थापन करण्याचे महत्वही या परिषदेतून अधोरेखित झाले.

 

* * *

S.Bedekar/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127711) Visitor Counter : 2