आयुष मंत्रालय
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने दोन दुर्मिळ आयुर्वेदिक हस्तलिखिते पुनरुज्जीवित केली : द्रव्यरत्नाकर निघंटु आणि द्रव्यनामकार निघंटु
हस्तलिखिते विद्वत्तापूर्ण संशोधन आणि भारताच्या अभिजात वैद्यकीय साहित्याशी दृढ संबंध निर्माण करण्यास प्रेरणा देतील
Posted On:
07 MAY 2025 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2025
पारंपारिक औषधांमधील भारताच्या समृद्ध वारशाचे जतन करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस) दोन दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक हस्तलिखिते द्रव्यरत्नाकर निघंटु आणि द्रव्यनामकार निघंटु पुनरुज्जीवित केली आहेत.
मुंबईतील आरआरएपी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला सीसीआरएएस, नवी दिल्लीचे महासंचालक प्रा. वैद्य रविनारायण आचार्य यांचे बीजभाषण झाले. भाषणात त्यांनी पारंपरिक आयुर्वेदिक साहित्याचे संशोधन, डिजिटायझेशन आणि पुनरुज्जीवन करण्यात 'सीसीआरएएस, आयुष मंत्रालयाचे उपक्रम' अधोरेखित केले.

मुंबईचे प्रसिद्ध हस्तलिखित तज्ञ आणि ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सदानंद डी. कामत यांनी हस्तलिखितांचे संपादन आणि अनुवाद केला आहे. प्रकाशन समारंभाला रणजित पुराणिक, अध्यक्ष, आयुर्विद्या प्रसारक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री धूतपेश्वर लिमिटेड यांच्यासह ; डॉ.रवी मोरे, प्राचार्य, आयुर्वेद महाविद्यालय, सायन; आयुर्विद्या प्रसारक मंडळाचे डॉ.श्याम नाबर आणि डॉ.आशानंद सावंत; आणि डॉ. आर. गोविंद रेड्डी, सहाय्यक संचालक (आयु), CARI, मुंबई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना, प्रा. वैद्य रविनारायण आचार्य यांनी भारताच्या प्राचीन ज्ञानाला समकालीन संशोधन चौकटींशी जोडण्यासाठी अशा पुनरुज्जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, "हे ग्रंथ केवळ ऐतिहासिक कलाकृती नाहीत - त्या जिवंत ज्ञान प्रणाली आहेत ज्यांचा अभ्यास आणि विचारपूर्वक वापर केल्यास समकालीन आरोग्यसेवा दृष्टिकोन बदलू शकतात".
या महत्वपूर्ण आवृत्त्या विद्यार्थी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि आयुर्वेद अभ्यासकांसाठी अमूल्य संसाधने म्हणून काम करतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे विद्वत्तापूर्ण संशोधन आणि भारताच्या अभिजात वैद्यकीय साहित्याशी दृढ संबंध निर्माण होण्यास प्रेरणा मिळेल.
हस्तलिखितांबद्दल
द्रव्यरत्नाकर निघंटु:
1480 मध्ये मुद्गल पंडित यांनी लिहिलेला हा यापूर्वी अप्रकाशित शब्दकोश अठरा प्रकरणांचा आहे ज्यामध्ये औषधांचे समानार्थी शब्द, उपचारांचे परिणाम आणि औषधी गुणधर्मांबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. 19 व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात संदर्भ म्हणून वापरलेल्या या ग्रंथात धन्वंतरी आणि राजा निघंटु सारख्या अभिजात निघंटुंची माहिती आहे तसेच वनस्पती, खनिज आणि प्राण्यांच्या उत्पत्तीपासून बनवलेल्या असंख्य नवीन औषधी पदार्थांचे दस्तावेजीकरण आहे. डॉ. एस. डी. कामत यांनी पुनरुज्जीवित केलेली ही महत्वपूर्ण आवृत्ती द्रव्यगुण आणि संबंधित आयुर्वेदिक शाखांमध्ये एक महत्वपूर्ण योगदान आहे.

द्रव्यनामकार निघंटु:
भीष्म वैद्य नावाने लिहिलेले हे अद्वितीय प्रकाशन धन्वंतरी निघंटु यांचे एक स्वतंत्र परिशिष्ट म्हणून काम करते, जे केवळ औषध आणि वनस्पतींच्या नावांच्या समानार्थी शब्दांवर लक्ष केंद्रित करते जो आयुर्वेदाच्या अभ्यासाचा गुंतागुंतीचा भाग आहे . 182 श्लोक आणि दोन कोलोफोन श्लोकांचा समावेश असलेला हा ग्रंथ डॉ. कामत यांनी काळजीपूर्वक संपादित केला आहे आणि त्यावर भाष्य केले आहे, ज्यामुळे रसशास्त्र, वैशाज्य कल्पना आणि अभिजात आयुर्वेदिक औषधनिर्माणशास्त्राच्या विद्वानांसाठी त्याची उपयुक्तता वाढली आहे.

सरस्वती निघंटु, भावप्रकाश निघंटु आणि धन्वंतरी निघंटु यांच्यावरील त्यांच्या अधिकृत कार्यासाठी ओळखले जाणारे डॉ. कामत पुन्हा एकदा भारताच्या आयुर्वेदिक वारशाचे जतन करण्यासाठी त्यांची सखोल विद्वत्ता आणि वचनबद्धता घेऊन आले आहेत.
या महत्वपूर्ण आवृत्त्या केवळ विद्वत्तापूर्ण कामगिरी नाहीत तर भविष्यातील आयुर्वेदिक अभ्यासक, संशोधक आणि शिक्षकांसाठी दीपस्तंभ आहेत. या कामांचे डिजिटायझेशन, संपादन आणि अर्थबोध करून सीसीआरएएस आणि त्यांचे सहयोगी साहित्यिक ठेव्याचे केवळ जतन करत नाहीत तर भारताच्या पारंपारिक आरोग्यसेवा प्रणालीला प्रमाणित प्राचीन विचारांनी समृद्ध करत आहेत.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2127533)
Visitor Counter : 34