वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय विदेश व्यापार संस्थेला गुजरात (गिफ्ट सिटी) येथे ऑफ-कॅम्पस केंद्र स्थापनेस मंजुरी;
NEP 2020शी संरेखित एमबीए (आंतरराष्ट्रीय व्यवसाय) अभ्यासक्रम, व्यापार संशोधनाला चालना देणार
गिफ्ट सिटी येथील आयआयएफटीच्या केंद्रामुळे भारताच्या व्यापारविषयक शिक्षण परिसंस्थेला बळकटी मिळेल आणि निर्यात-प्रेरित वृद्धीला पाठबळ मिळेल
Posted On:
06 MAY 2025 10:37AM by PIB Mumbai
गुजरातमध्ये गांधीनगर येथे स्थित गिफ्ट सिटीमध्ये भारतीय परदेश व्यापार संस्थेच्या (आयआयएफटी) ऑफ-कॅम्पस शिक्षणकेंद्र स्थापनेला केंद्रीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. युजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग नियमावली, 2023 मधील (विद्यापीठ मानल्या गेलेल्या शिक्षण संस्थांच्या संदर्भातील)नियमांनुसार या केंद्राची उभारणी केली जाणार आहे.
जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात आलेल्या स्वारस्यपत्रातील अटींचे आयआयएफटीने यशस्वीरित्या पालन केल्यानंतर युजीसी कायदा, 1956 मधील कलम 3 अंतर्गत ही मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे 1,000 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय, गुणवत्ता पूर्ण शिक्षकवर्ग, तपशीलवार शैक्षणिक अभ्यासक्रम, संस्थेच्या स्थायी कॅम्पसच्या उभारणीच्या योजना तसेच सत्याधुनिक वाचनालयाच्या निर्मितीसह बहुशाखीय शिक्षणसंस्था उभारण्याच्या उद्देशाने विकास आराखडा सादर करण्याची अट देखील उपरोल्लेखित कलमात अंतर्भूत आहे.
आयआयएफटीला ही परवानगी मिळाल्याबद्दल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी संस्थेचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “भारताचे जागतिक दर्जाचे वित्तीय केंद्र असलेल्या @GIFTCity_ मध्ये नवे ऑफ-कॅम्पस केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळाल्याबद्दल @IIFT_Official चे हार्दिक अभिनंदन. यामुळे अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील संशोधनासह प्रतिभावान विद्यार्थ्यांना या संस्थेच्या एमबीए (आंतरराष्ट्रीय व्यापार) या अत्यंत महत्त्वाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेण्याचा मार्ग खुला झाला आहे.”
नव्याने उभारण्यात येणारे संस्थेचे गिफ्ट सिटी कॅम्पस गिफ्ट टॉवरच्या 16 व्या आणि 17 व्या मजल्यावर स्थित असेल. या ठिकाणी वैशिष्ट्यीकृत अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इतर संबंधित क्षेत्रातील संशोधनासह या संस्थेच्या एमबीए (आंतरराष्ट्रीय व्यापार) या अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाईल.
हा उपक्रम बहुशाखीय शिक्षणाला चालना देण्याचे आणि उच्च दर्जाच्या शिक्षणापर्यंतचा मार्ग विस्तारण्याचे उद्दिष्ट असलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील ध्येयांशी जुळवून घेणारा आहे.
वर्ष 1963 मध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत स्थापन झालेली आयआयएफटी ही संस्था आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील क्षमता उभारणीप्रती समर्पित असलेली प्रमुख संस्था आहे. वर्ष 2002 मध्ये या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला असून राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून (एनएएसी) या संस्थेला ए+ श्रेणी देण्यात आली आहे, तसेच एएसीएसबी या अमेरिकी संस्थेने देखील, या संस्थेला मान्यता दिल्यामुळे आता ही संस्था जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त व्यवसाय शिक्षण संस्थांच्या विशेष गटाचा भाग झाली आहे.
गिफ्ट सिटी मध्ये नव्याने सुरु होणारे हे शिक्षणकेंद्र भारताच्या व्यापार शिक्षण परिसंस्थेत लक्षणीय योगदान देईल आणि निर्यातविषयक जागतिक शक्तीकेंद्र होण्याच्या देशाच्या आकांक्षेला पाठबळ देईल अशी अपेक्षा आहे.
***
SonalT/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2127217)