माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा” – वेव्हज 2025 मध्ये कथाकथनाच्या भविष्याबाबतचा जागतिक संवादाला चालना
प्रसारण, चित्रपट आणि साहित्य यांचा वेव्हज 2025 मध्ये मिलाफ
Posted On:
02 MAY 2025 9:22PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 2 मे 2025
पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वेव्हज 2025 शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज “जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा” या विषयावर आधारित गटचर्चेमध्ये सुप्रसिद्ध वक्त्यांची मांदियाळी बघायला मिळाली. नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या संस्थेतील मुख्य कथाकथनकार केटलिन यार्नाल; वॉल्ट डिस्ने कंपनीचे ईव्हीपी तसेच कॉर्पोरेट विकास विभाग प्रमुखजस्टीन वॉरब्रूक; अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ कंपनीत आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपाध्यक्ष केली डे; बीबीसी स्टुडीओजच्या आशिया विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक फिल हार्डमन; भारतातील एक नावाजलेले दिग्दर्शक राजकुमार हिरानी तसेच गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि राजनीतिज्ञ अनिश त्रिपाठी यांनी चर्चा संचालक म्हणून या चर्चांमध्ये भाग घेतला.

कथाकथनातील परिवर्तनशील सामर्थ्याचा शोध घेण्यासाठी या सत्राने जागतिक माध्यमे, मनोरंजन आणि साहित्य विश्वातील अनेक दूरदर्शी नेते आणि कथाकथनात प्रभुत्व मिळवलेले वक्ते यांना एकत्र आणले. विविध प्रसारण मंच आणि प्रसारण क्षेत्रातील बड्या कंपन्या ते चित्रपट आणि साहित्य जगत यांच्यात गाजलेल्या वक्त्यांनी गुंगवून टाकणाऱ्या कथा कशा पद्धतीने सीमापार प्रवास करुन संस्कृतीला आकार देतात आणि जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडतात याबद्दलचे विचारधन सामायिक केले. या कार्यक्रमातील चर्चेने जागतिक कथाकथन क्षेत्राला चालना देणाऱ्या धोरणात्मक, सर्जनशील आणि भावनिक शक्तींवर आणि या शक्तींचा दृष्टीकोन, संस्कृती तसेच सामाजिक बदलांवर किती मोठा प्रभाव पडतो हे सांगण्यावर अधिक भर दिला.
जगभरातील प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी विज्ञान, शोध तसेच दृश्य कथाकथन यांची वीण असलेल्या सशक्त कथा निर्माण करण्यासाठीची धोरणात्मक दृष्टी केटलिन यार्नाल (नॅशनल जिओग्राफिक) यांच्याकडे आहे. उपरोल्लेखित चर्चेदरम्यान त्यांनी कथाकथन क्षेत्राची सत्यता तसेच उत्कृष्टता यांचे महत्त्व सांगण्यावर अधिक भर दिला. तसेच त्यांनी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आपलासा वाटेल अशा आशयाच्या निर्मितीत असलेली आव्हाने आणि संधी अशा दोन्हींवर त्यांनी यावेळी अधिक भर दिला.

जस्टिन वारब्रुक (वॉल्ट डिस्ने) यांनी भारतीय बाजारपेठेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आणि वेगाने वाढणारी माध्यम आणि मनोरंजन बाजारपेठ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी डिस्नेच्या भारतीय कंपन्यांबरोबरच्या सहकार्याबद्दलही सांगितले, आणि ही भागीदारी परस्परांच्या संस्कृतीला जोडण्यासाठी आणि कथाकथनाच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी कशी सहाय्य करत आहे, यावर भर दिला.
केली डे (अमेझॉन प्राइम व्हिडिओ) यांनी जागतिक विस्तार आणि आशय सामग्री विषयक धोरण, विविध खंडांमधील प्रेक्षकांपर्यंत वैविध्यपूर्ण आणि स्थानिक पातळीवर गुंफलेल्या कथा आणण्याचे काम कसे करते, यावर आपले विचार मांडले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या कथा आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतील, हे व्यासपीठ कसे ठरवते, यावर बोलताना त्या म्हणाल्या की, याचे कोणतेही ठरलेले सूत्र नाही. सशक्त कथाकथन, स्थानिक प्रेक्षकांचा कल ओळखणे आणि योग्य स्वरूप आणि शैली निवडणे यात यशाचे गमक आहे.
फिल हार्डमन (बीबीसी स्टुडिओ, आशिया) आशियाई प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या निवडक ब्रिटिश सामग्रीच्या वितरणाचे प्रमुख आहेत. त्यांनी दर्जेदार सामग्रीच्या शाश्वत सामर्थ्याबद्दल बोलताना, त्यांनी बीबीसीच्या शिक्षण आणि माहिती देण्याच्या मुख्य मिशनवर भर दिला. त्या ध्येयाला अनुसरून अर्थपूर्ण कथांचा शोध घेऊन त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकुमार हिरानी: भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक असलेले राजकुमार हिरानी, हे भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी चित्रपट निर्माण करण्यासाठी ओळखले जातात. त्यांचे चित्रपट भारतासह जगभरातील प्रेक्षकांना भावतात. चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले की, कथाकथन हे स्वाभाविकपणे व्यक्तीनिष्ठ असते, त्याचा प्रतिध्वनी व्यक्तीनुरूप वेगळा असतो. कृत्रिम प्रज्ञेबद्दल आपण आशावादी असून, सर्जनशीलता आणि कथाकथन शैलीत भर घालणारे हे एक मौल्यवान साधन असल्याचे ते म्हणाले.
अमिश त्रिपाठी: बेस्टसेलिंग (लोकप्रिय) लेखक आणि मुत्सद्दी अमिश त्रिपाठी आपल्या कथाकथनात पौराणिक कथा आणि सांस्कृतिक संपन्नतेचा अनोखा मिलाफ साधतात. समन्वयक म्हणून त्यांनी या गट चर्चासत्राला कौशल्याने मार्गदर्शन केले, विविध दृष्टीकोनांची सांगड घातली आणि कथेमध्ये विविध देशांच्या लोकांना जोडण्याची अफाट शक्ती असल्याचे अधोरेखित केले.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/Sanjana/Rajshree/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126355)
| Visitor Counter:
23