माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कथाकथनाची कलाः फरहान अख्तर यांनी वेव्हज 2025 मध्ये सांगितल्या त्यांच्या वाटचालीतील आठवणी
फरहान अख्तर यांनी केले कथाकथन, आत्मविश्वास आणि कलेबरोबर होणाऱ्या बदलांविषयीचे विवेचन
Posted On:
02 MAY 2025 7:51PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 2 मे 2025
सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेता आणि लेखक फरहान अख्तर यांनी वेव्हज 2025 मध्ये “द क्राफ्ट ऑफ डायरेक्शन” या मास्टरक्लासमध्ये प्रमुख मार्गदर्शन केले. गौरव कपूर यांनी या सत्राचे संचालन केले. या सत्रामध्ये अख्तर यांनी एक कथाकथनकार, सिनेमाच्या उत्क्रांतीचा वेध, दिग्दर्शनातील आव्हाने आणि चित्रपटनिर्मितीत अस्सलपणाची निकड यावर अतिशय उत्कटतेने आपला दृष्टीकोन मांडला.
वेव्हज हा एक अतिशय चांगल्या प्रकारे सक्षमीकरण करणारा एक कार्यक्रम असल्याचे फरहान यांनी या संवादाची सुरुवात करताना सांगितले आणि आपल्यामध्ये रुजलेल्या सृजनशीलतेवर प्रकाश टाकला. गायन आणि अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतच्या त्यांच्या बहुआयामी कारकिर्दीतील कोणत्याही एका विशिष्ट पैलूला ते अधिक महत्त्व देतात का, असे विचारले असता, त्यांनी हे म्हणजे आपल्या अपत्यांपैकी आवडते मूल निवडण्यासारखे आहे असे सांगितले. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी असू शकतात, पण प्रत्येक प्रकारात स्वतःचा असा एक वेगळाच आनंद असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिक काळातील हिंदी सिनेमाला एका वेगळ्या वाटेवर नेणाऱ्या दिल चाहता है या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना फरहान म्हणाले, “ मला मैत्रीबद्दल, आपल्यासारख्या लोकांबद्दल काही तरी वास्तविक लिहायचे होते. तुम्ही दुसऱ्याची नक्कल करता कामा नये. जेव्हा एखाद्या गोष्टीत प्रामाणिकपणाचा अभाव असेल तर प्रेक्षकांना त्याची लगेच जाणीव होते.” कोणत्याही लेखकासाठी प्रामाणिकपणा आणि संवेदना हे अत्यावश्यक गुण आहेत असे त्यांनी सांगितले. आपल्या वाटचालीमध्ये केंद्रित राहण्याचा आणि अपयशाला आपल्या वाटचालीचाच एक भाग म्हणून स्वीकारण्याचा सल्ला त्यांनी युवा निर्मात्यांना दिला.
अनेक आठवणींनी भरलेले असे हे सत्र होते. पदार्पणाच्या चित्रपटासाठी कलाकारांच्या निवडीपासून ते सिंक साऊंडच्या वापरापर्यंतचे अनुभव, जे या चित्रपटातील बहुतेक कलाकारांसाठी एक नवा अनुभव होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “त्यांना डबिंगची सवय होती आणि सिंक साऊंडमुळे ते अस्वस्थ झाले,” असे त्यांनी चित्रपट निर्मितीत नव्या तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेवर भर देत सांगितले.
‘लक्ष्य’ या चित्रपटाविषयी बोलताना फरहान यांनी लडाखमध्ये चित्रिकरण करताना आलेल्या शारीरिक आणि मानसिक अडचणींचे तसेच चित्रिकरण पूर्ण झाल्यावर आढळलेल्या तांत्रिक समस्यांमुळे बसलेला धक्का, यांचे वर्णन केले. “आम्हाला पुन्हा मागे जावे लागले, पण जेव्हा आम्ही पुन्हा ते केले त्यावेळी तर आम्हाला अतिशय जास्त थरारक दृश्यांचे चित्रिकरण करणे शक्य झाले,” अशी आठवण त्यांनी सांगितली. “ प्रत्येक गोष्टीमागे काही तरी कारण असते”
फरहान अख्तर यांनी ‘डॉन’ बद्दल सांगितले की, ट्रेनच्या प्रवासादरम्यान मूळ संगीत ऐकताना त्यांना या चित्रपटाची कल्पना सुचली. त्यांच्यासमोर मुख्य आव्हान चित्रपटाची पुनर्निर्मिती करणे नव्हते तर, त्याला नव्याने साकारणे होते. “मी ‘डॉन को पकडना मुश्किल ही नहीं…’ या ओळीला नवा अर्थ कसा देऊ शकतो, हेच खरे आव्हान होते,” असे ते म्हणाले. त्यांनी हा चित्रपट शाहरुख खान यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिल्याचे सांगितले, तसेच स्वतः मूळ चित्रपटाचा मोठा चाहता असल्याचे नमूद केले.
त्यांनी आपले वडील जावेद अख्तर आणि बहीण झोया अख्तर यांच्याबद्दल आपुलकीने बोलताना सांगितले की, दोघेही त्यांच्या स्क्रिप्ट्ससाठी महत्त्वाचे सल्लागार आहेत. “माझे वडील सर्वात कठोर टीकाकार आहेत. ते थेट विचारतात, ‘तू हा चित्रपट का बनवतो आहेस?’” जावेद अख्तर यांच्या आवडत्या चित्रपटांबद्दल विचारले असता, फरहान यांनी ‘दिल चाहता है’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांच्यासह काही चित्रपटांचा उल्लेख केला.
‘भाग मिल्खा भाग’साठी केलेल्या शारीरिक बदलाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मिल्खा सिंग यांचा उत्साह त्यांना प्रेरणा देणारा ठरला. “मिल्खाजींना हा चित्रपट, पुढच्या पिढीला कठोर परिश्रम आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश देणारा असावा, असे वाटले. त्या ऊर्जेने आम्हा सर्वांना प्रेरित केले,” असे ते म्हणाले.
उपस्थित प्रेक्षकांना फरहान यांनी प्रभावी सल्ला दिला: “कोणाच्या तरी कथेत पात्र बनू नका. स्वतःची कथा लिहा आणि शिस्तीचे महत्त्व कधीही कमी लेखू नका.”
प्रेक्षकांच्या प्रश्नांनी प्रेरणादायी मास्टरक्लासची सांगता झाली.
* * *
PIB Mumbai |S.Nilkanth/Shailesh/Nikhilesh/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126306)
| Visitor Counter:
15