वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि युरोपीय महासंघ दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराला वर्ष 2025 च्या अखेरपर्यंत अंतिम स्वरूप देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा दोन्ही बाजूंनी पुनरुच्चार
Posted On:
02 MAY 2025 11:55AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2025
जागतिक स्तरावरील आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच वर्ष 2025 च्या अखेरीपर्यंत महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराची (एफटीए) पूर्तता करण्याच्या दिशेने सामायिक निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि युरोपीय महासंघाचे व्यापार तसेच आर्थिक सुरक्षाविषयक आयुक्त मारोस सेफ्कोविक यांनी एका भविष्यसूचक आणि वस्तुनिष्ठ संवादात भाग घेतला. फेब्रुवारी 2025 मध्ये आयुक्तांच्या युरोपीय महासंघ महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे दिलेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डर लेयेन यांनी दिलेल्या धोरणात्मक निर्देशांनुसार ही कटिबद्धता व्यक्त केली आहे.
या कराराच्या पूर्ततेसाठी उच्च स्तरीय सहभाग, आर्थिक लवचिकता आणि समावेशकतेला पाठींबा देणा-या व्यावसायिक दृष्टीने अर्थपूर्ण, परस्पर लाभदायक, समतोल आणि प्रामाणिक व्यापारी भागीदारी उभारण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रयत्नांचे धोरणात्मक महत्व बैठकीत अधोरेखित करण्यात आले. या बैठकीत विविध स्तरावरील वाटाघाटींमध्ये प्रगती झाल्याचे दिसून आले. तसेच दर महिन्याला होणाऱ्या वाटाघाटींच्या फेऱ्या तसेच सतत सुरु असलेल्या आभासी सहभागाच्या माध्यमातून या चर्चांना सध्या आलेला वेग कायम ठेवण्याच्या महत्त्वावर अधिक भर देण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे येत्या 12 ते 16 मे 2025 या कालावधीत नियोजित पुढील फेरीतील चर्चेसह दोन्ही बाजूंनी परस्पर आदर आणि व्यवहार्यता राखण्याच्या मानसिकतेसह प्रलंबित समस्या सोडवण्याच्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार यावेळी केला.
“विश्व मित्र” म्हणजेच जगाचा सहचर या रुपात भारताच्या उदयाच्या भावनेसह आणि 2047 पर्यंत गाठण्यासाठी निश्चित केलेल्या विकासविषयक उद्दिष्टांना अनुसरून असणारा भारत-युरोपीय महासंघ यांच्यातील एफटीए हा करार वैविध्यपूर्ण उत्पादन ‘नेटवर्क’ला चालना देण्यासाठी तसेच न्याय्य व्यापार तत्वांचे पालन करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन असेल. वेगवेगळ्या मुक्त व्यापारी करारांच्या माध्यमातून भारत स्वतःच्या पदचिन्हांचा विस्तार करणे सुरु ठेवत असताना होत असलेल्या या चर्चेद्वारे राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि जगातील आकांक्षा यांच्याशी जुळणाऱ्या भविष्यवादी आराखड्याला आकार देण्याची भारताची विस्तारित दृष्टी दिसून येते.
* * *
S.Bedekar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2126050)
Visitor Counter : 20