गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे गुजरात दिन आणि महाराष्ट्र दिन यानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले संबोधन
गुजरात आणि महाराष्ट्राने आपसांमध्ये कटुता न ठेवता, निरोगी स्पर्धा करून आपल्या राज्यांबरोबरच देशाचा विकास साधून उत्कृष्ट उदाहरण सर्वांसमोर ठेवले :अमित शहा
‘व्हायब्रंट गुजरात’ आणि ‘मॅग्निफिसंट महाराष्ट्र’ देशाच्या विकासाचे मजबूत आधारस्तंभ
गुजरात आणि महाराष्ट्राने वारसा जपताना आधुनिकताही स्वीकारली; देशाच्या एकता आणि अखंडतेत दोन्ही राज्यांचे मोठे योगदान
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने आपली परंपरा पुढे नेताना मातृभाषा, स्वराज्य आणि स्वधर्माचा उंचावला झेंडा
Posted On:
01 MAY 2025 11:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे गुजरात आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण केले. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा स्थापना दिन आहे. गुजरात आणि महाराष्ट्राने, एका राज्यातून निर्माण झालेली दोन राज्ये एकमेकांचा आदर करून आणि कोणत्याही कटुतेशिवाय त्यांच्यात निरोगी स्पर्धा करून देशाच्या विकासाचे नेतृत्व कसे करू शकतात, याचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. ते म्हणाले की सीमा, भाषा आणि संस्कृतीचे मुद्दे बनवून देशाचे विभाजन करू इच्छिणारे लोक त्यांच्या वाईट हेतूंमध्ये यशस्वी होऊ पाहत होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व वाईट कल्पना हाणून पाडल्या.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मराठी आणि गुजराती यांच्यात कोणतीही स्पर्धा नाही आणि दोन्ही भाषा आपापल्या जागी महान आहेत. ते म्हणाले की 1 मे 1960 रोजी मुंबई राज्यातून दोन राज्ये जन्माला आली, एक गौरवशाली गुजरात बनले आणि दुसरे महान महाराष्ट्र बनले. ते म्हणाले की दोन्ही राज्यांनी अनेक वर्षांपासून देशाच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात आणि विकास पुढे नेण्यात मोठे योगदान दिले आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की वीर छत्रपतींची भूमी असलेल्या महाराष्ट्राने आपली परंपरा पुढे नेली आणि बाजीराव पेशव्यांपासून ते इतर सेनापतींपर्यंत सर्वांनी मुघलांशी जोरदार लढा दिला आणि मातृभाषा, स्वराज्य आणि स्वधर्माचा झेंडा फडकवला.
ते म्हणाले की संपूर्ण स्वातंत्र्याचा पहिला विचार युवावयातील शिवाजी महाराजांनी मांडला होता आणि जेव्हा ब्रिटीश राजवट आली तेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी महाराजांचा हाच विचार पुढे नेला. लोकमान्य टिळक यांनी त्यावेळी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा नारा दिला. शाह म्हणाले की, भक्ती चळवळ असो किंवा सामाजिक सुधारणांचा प्रगतीशील मार्ग असो, ज्योतिबा फुले, बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर, या सर्वांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मार्ग दाखवला. ते म्हणाले की, वीर सावरकर एक समर्पित देशभक्त म्हणून देशभरातील कोट्यवधी तरुणांचे प्रेरणास्थान बनले.
अमित शाह म्हणाले की, गुजरात ही श्रीकृष्णाची कर्मभूमी आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मस्थान देखील आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर भारताच्या विकासात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांचे योगदान मोठे आहे. ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात गरबा त्याच उत्साहात साजरा केला जातो आणि गुजरातमध्ये गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक घरात मोठ्या श्रध्देने गणपती आणला जातो. ते म्हणाले की, ही आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. शाह म्हणाले की, दोन्ही राज्ये देशाच्या आर्थिक विकासाचे अतिशय मजबूत आधारस्तंभ म्हणून उभी आहेत. ते म्हणाले की, महाराष्ट्र नेहमीच देशाची आर्थिक राजधानी राहिला आहे आणि आजही ती देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
अमित शाह म्हणाले की, गुजरात आणि महाराष्ट्राने त्यांचा वारसा जपताना आधुनिकता स्वीकारली आहे आणि देशाच्या एकता आणि अखंडतेत मोठे योगदान दिले आहे.
* * *
S.Bedekar/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2126027)
Visitor Counter : 9