युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑलिम्पिकपटू सात्विक-चिराग यांना केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान


केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय सात्विक -चिराग यांच्या कामगिरीचे केले कौतुक; तिरंग्यासह व्यासपीठावर उभे राहणे हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे काढले गौरवोद्गार

Posted On: 01 MAY 2025 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मे 2025

 

ऑलिंपिकपटू  सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना आज नवी दिल्ली येथे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2023 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या आणि हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या या दिग्गज बॅडमिंटन जोडीला 2023 मध्ये खेलरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते. तथापि, त्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा खेळण्‍यात  व्यग्र असल्यामुळे  त्यांना हा प्रतिष्‍ठेचा पुरस्कार  घेता आला नाही.

सध्याच्या जागतिक क्रमवारीतील 11 व्या क्रमांकावर असलेल्या या  जोडीचे कौतुक करताना डॉ. मांडविय म्हणाले: "मेजर ध्यानचंद खेलरत्न हा देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. सात्विक आणि चिराग, तुम्ही दोघांनीही असामान्य कौशल्य आणि कठोर परिश्रमाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून देशाला सन्मान मिळवून दिला आहे."

जेव्हा तुम्ही प्रतिष्ठित पदके स्वीकारण्यासाठी तिरंग्यासोबत व्यासपीठावर उभे असता, तेव्हा ती केवळ तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी सन्मानाची गोष्ट असते. देशाचा अभिमान  आणि तिरंग्याचा मान वाढवल्याबद्दल, तुम्हा दोघांनाही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

खेलरत्न मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना चिराग शेट्टी म्हणाले की, हा सन्मान सोहळा खूप दिवसांपासून खोळंबला होता. “शेवटी, आम्हाला आज हा पुरस्कार स्वीकारण्याचा सन्मान मिळाला. 2023 मध्ये त्याची घोषणा करण्यात आली होती. क्रीडामंत्र्यांकडून खेलरत्न मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. मी आणि सात्विक एकत्र आल्यापासून भारत सरकारकडून निरंतर भरपूर पाठिंबा मिळत आहे.

आपल्या  भावना व्यक्त करताना सात्विक म्हणाले: “आजच्या तरुणांना अनेक योजना आणि उपक्रमांद्वारे पाठिंबा मिळत आसून त्यात  सरकार मोठी भूमिका बजावत आहे - खेलो इंडिया, टार्गेट ऑलिंपिक पोडियम योजना (टॉप्स) इत्यादींचा त्यात समावेश आहे. सुरुवातीला, जेव्हा मी आणि चिराग खेळायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला आर्थिकदृष्ट्या संघर्ष करावा लागला. नंतर, सरकार आमच्या मदतीला आले आणि त्यांनंतर मात्र आम्ही मागे वळून पाहिले नाही.”

  

या भारतीय जोडीने जानेवारीमध्ये मलेशिया ओपन आणि नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया ओपनमध्ये दोनदा पोडियम गाठले, उत्तम कामगिरी केली आणि त्यांच्या क्रीडा हंगामाची चांगली सुरुवात केली.

 

* * *

S.Bedekar/H.Kulkarni/D.Rane


(Release ID: 2125965) Visitor Counter : 26
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu