आयुष मंत्रालय
राष्ट्रीय आयुष मिशन परिषद 2025: देशभरात पारंपरिक आरोग्यसेवा पुरवठा बळकट करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सहयोग
राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेच्या दुसऱ्या पर्वाचे लोणावळ्यात आयोजन: समग्र, सुलभ आणि समावेशक आरोग्यसेवेची रूपरेषा
मजबूत आणि एकात्मिक आयुष चौकटीद्वारे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा सर्वांसाठी समग्र आरोग्याचा दृष्टिकोन साकारण्याचे आमचे ध्येय: केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Posted On:
29 APR 2025 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2025
भारत सरकारचे आयुष मंत्रालय 1-2 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील लोणावळा येथील कैवल्यधाम येथे राष्ट्रीय आयुष मिशन (एनएएम) परिषद 2025 आयोजित करणार आहे. हा परिवर्तनकारी 2 दिवसांचा कार्यक्रम भारतातील आयुष-आधारित आरोग्यसेवेचे भविष्य घडवण्यासाठी एक राष्ट्रीय मंच म्हणून काम करेल. आयुष तज्ज्ञ, धोरणकर्ते, आरोग्य व्यावसायिक, संशोधक आणि नवोन्मेषकांना एकत्र आणून, पारंपरिक भारतीय औषध प्रणालींचे मुख्य प्रवाहातील आरोग्यसेवेत एकत्रीकरण बळकट करून सामान्य नागरिकांसाठी निरामयता अधिक सुलभ, परवडणारी आणि पुराव्यावर आधारित बनवण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
या परिषदेचे उद्घाटन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे तर राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री आणि नऊ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री देखील परिषदेत उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. या परिषदेत राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आयुष विभागांचे अधिकारी, मिशन संचालक, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सहभाग घेतील. या कार्यक्रमात पूर्ण सत्रे, धोरणात्मक गोलमेज बैठका, तांत्रिक सखोल चर्चा, आयुष क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती, राज्य यशोगाथा आणि तंत्रज्ञान-प्रणित नवोन्मेषांचे प्रदर्शन करण्याबरोबरच पूर्ण सत्रे, धोरणात्मक गोलमेज बैठका, तांत्रिक सखोल चर्चा यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे.
आगामी कार्यक्रमाबद्दल बोलताना आयुष मंत्र्यांनी नमूद केले की, "राष्ट्रीय आयुष मिशन परिषद म्हणजे देशभरात आरोग्य आणि आरोग्यसेवा पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सहयोगी परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एका मजबूत आणि एकात्मिक आयुष चौकटीद्वारे सर्वांसाठी समग्र आरोग्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा दृष्टिकोन साकारण्याचे आमचे ध्येय आहे."
राष्ट्रीय आयुष मिशन परिषद ही भारतातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथीमधील आधुनिक घडामोडी, संशोधन नवोपक्रम आणि क्षेत्रीय सहकार्यांवर चर्चा करण्यासाठी एक सक्षम मंच म्हणून काम करेल. पथदर्शी उपक्रमांच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यावर, पुराव्यावर आधारित पद्धतींना प्रोत्साहन देण्यावर आणि आंतरराष्ट्रीय व्याप्ती वाढवण्यावर देखील या परिषदेचा भर असेल. राष्ट्रीय आयुष मिशन योजनेचा भविष्यातील विस्तार निश्चित करण्यासाठी मंत्री स्तरावर चर्चा करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालय सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले, “राष्ट्रीय आयुष अभियानाच्या कामगिरीचे दर्शन घडवणे, नव्याने उदयाला येणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधणे आणि स्वावलंबी तसेच भक्कम आयुष आरोग्यसेवा यंत्रणा उभारणीच्या दिशेने मार्ग आखणे या उद्दिष्टांसह केंद्रीय आयुष मंत्रालयाने एनएएम बैठक-2025 चे आयोजन केले आहे.”
या बैठकीतील विविध संकल्पनांविषयी बोलताना केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सह सचिव कविता गर्ग म्हणाल्या, “या बैठकीत वित्तीय व्यवस्थापन, देखरेख आणि मूल्यांकन, मनुष्यबळ बळकटीकरण, आधुनिक औषधविज्ञानासह एकत्रीकरण तसेच गुणवत्तेची हमी यांसारख्या विविध संकल्पनांचा समावेश आहे. या कार्यक्रमातून सर्वोत्तम पद्धती, माहिती तंत्रज्ञानविषयक नाविन्यपूर्ण संकल्पना, नियामकीय यंत्रणा तसेच गुंतवणूक आणि निर्यात संधींसह विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या समृद्ध अनुभवांचे दर्शन घडेल.”
बैठकीचे महत्त्वाचे घटक:
दस्तावेज अनावरण: आयुष धोरण 2025 ची ब्लू प्रिंट तसेच वैद्यकीय विज्ञानातील आयुष प्रणालीमधील चयापचय विकारांच्या संदर्भातील प्रमाणित उपचारविषयक मार्गदर्शक तत्वे यांची सुरुवात.
मंत्रीस्तरीय गोलमेज बैठक: केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्यासह विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री यांच्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाला बळकटी देण्याबाबत चर्चा
तज्ञांची सत्रे: डीजीएचएस, एनएबीएच, इन्व्हेस्ट इंडिया, आयुष निर्यात प्रोत्साहन मंडळ तसेच गुणवत्ता मानके, मान्यता प्रणाली तसेच गुंतवणूक सुलभीकरण या क्षेत्रातील आघाडीच्या संस्था या संदर्भात सादरीकरणे
यशस्वी उपचारांचा अभ्यास: बहुतांश राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम पद्धती
योग सत्रे: या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी मार्गदर्शित योग आणि ध्यानधारणा सत्रे देखील आयोजित करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय आयुष अभियानाविषयी थोडक्यात माहिती:
राष्ट्रीय आयुष अभियान हा महत्त्वाचा सरकारी कार्यक्रम वर्ष 2014 मध्ये सुरु करण्यात आला आणि त्याने भारतातील पारंपरिक औषधोपचार प्रणालींचे जतन करण्यात आणि त्यांचे मुख्य प्रवाहातील आरोग्यसेवांसह एकत्रीकरण करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.हे अभियान केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचा भाग म्हणून आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष)च्या ,माध्यमातून देशभरात आयुष आरोग्य सेवांची उपलब्धता, पोहोच आणि दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आले आहे.
वर्ष 2023 मध्ये आयोजित एनएएम बैठकीच्या गेल्या सत्रात, आयुष आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांचा(आता एएएम-आयुष) विस्तार, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये आयुष सेवांचे एकत्रीकरण तसेच आयुष उपचार करणाऱ्या व्यावसायिकांची क्षमता उभारणी इत्यादी अनेक महत्त्वाचे ठराव करण्यात आले. आता वर्ष 2025 मधील कार्यक्रमात या यशस्वी कामगिरीत वाढ करून नवोन्मेष, मानकीकरण तसेच आंतरराष्ट्रीय प्रसार यांच्यावर नव्याने लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
* * *
N.Chitale/Vasanti/Sanjana/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125273)
Visitor Counter : 20