सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकास भी विरासत भी' या ब्रीदवाक्याचा पुनरुच्चार करत, वारसा स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यावर भर दिला जाईल असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे प्रतिपादन
केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळाची (सीएबीए) 38 वी बैठक भारत मंडपम येथे यशस्वीपणे संपन्न
Posted On:
23 APR 2025 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2025
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळाची (सीएबीए) 38 वी बैठक यशस्वीपणे पार पडली. ही बैठक भारताच्या समृद्ध पुरातत्त्वीय वारसा स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या सामूहिक प्रयत्नांमधील महत्वाचा टप्पा ठरली. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आपल्या बीज भाषणात पुरातत्त्व, उत्खनन, शोध आणि संवर्धन क्षेत्रातील गतिशील, समावेशक आणि दूरदर्शी आराखडा मांडला. देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यामध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. अलीकडे उत्खनन आणि शोध कामांची संख्या वाढत आहे, या गोष्टीची प्रशंसा करताना, उत्खनन आणि शोध प्रकल्प अधिक व्यापक, समावेशक आणि दूरगामी असायला हवेत, असे ते म्हणाले. तसेच एएसआयच्या अंडरवॉटर आर्किऑलॉजी विंग (यूएडब्ल्यू), म्हणजेच पाण्याखालील पुरातत्त्व संशोधन विभागाचे पुनरुज्जीवन करण्याची रूपरेषा त्यांनी सांगितली, ज्याअंतर्गत द्वारका येथे पाण्याखाली संशोधन सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकास भी विरासत भी' या ब्रीदवाक्याचा पुनरुच्चार करत त्यांनी वारसा स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यावर भर दिला. परदेशातून पुरातन वस्तू भारतात यशस्वीपणे परत आणल्या, त्यावर प्रकाश टाकून ते म्हणाले की, देशाची सांस्कृतिक ओळख पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना मिळालेले हे मोठे यश आहे. शिवाय, केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातील ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यामधील एएसआयची सक्रिय भूमिका त्यांनी अधोरेखित केली, ज्यामधून जागतिक सांस्कृतिक वारशाप्रति असलेली भारताची वचनबद्धता अधोरेखित होते. पुरातत्व आणि वारसा संवर्धन क्षेत्रातील भागधारकांमध्ये नियमित संवाद आणि सहयोगात्मक नियोजन सुलभ व्हावे, यासाठी सीएबीएच्या (CABA) सातत्यपूर्ण वार्षिक बैठकांच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

सीएबीएचे दिवंगत सदस्य आणि नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना आदरांजली अर्पण करून या महत्वाच्या बैठकीची सुरुवात झाली.
सभेला मान्यवर आणि विविध राज्य सरकारांच्या सांस्कृतिक आणि पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महत्त्वाच्या स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीचे उपक्रम, शोध आणि प्रस्तावांवरील अभ्यासपूर्ण चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. मंडळाने एएसआय अंतर्गत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि भविष्यातील पुरातत्त्वीय उपक्रमांवर विचारमंथन केले.

* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123976)
Visitor Counter : 15