संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एलएसएएम 24 (134 यार्ड) या दारुगोळा, टोर्पेडो आणि क्षेपणास्त्रसज्ज (एसीटीसीएम) दहाव्या बार्जचे हस्तांतरण

Posted On: 23 APR 2025 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2025

 

मुंबईत नौदल गोदी येथे 22 एप्रिल 2025 रोजी एलएसएएम 24 (134 यार्ड) दहाव्या एसीटीसीएम बार्जचा हस्तांतरण समारंभ आयोजित करण्यात आला. मुंबईच्या नौदल गोदीतील जनसंपर्क विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक आणि कोमोडोर एकेके रेड्डी या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दारुगोळा, टोर्पेडो आणि क्षेपणास्त्राने सुसज्जित (एसीटीसीएम) अशा 11 बार्जेसच्या बांधणी तसेच हस्तांतरण यासाठी 5 मार्च 2021 रोजी ठाण्यातील मे. सूर्यदीप्त प्रोजेक्ट्स या एमएसएमई जहाजबांधणी कंपनीशी करार करण्यात आला. या जहाजबांधणी कंपनीने भारतीय जहाज संरचना कंपनीच्या सहयोगासह स्वदेशी पद्धतीने या बार्जेसची रचना केली असून नंतर समुद्रप्रवासविषयक योग्यता सुनिश्चित करण्यासाठी विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत त्यांच्या नमुन्याची यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली.

भारतीय नौवहन नोंदणी रजिस्टरमधील (आयआरएस) संबंधित नौदल नियम आणि नियमने यांना अनुसरून या बार्जेसची उभारणी करण्यात आली आहे. हे बार्जेस केंद्र सरकारच्या “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” या उपक्रमांचे गौरवशाली ध्वजवाहक आहेत. उपरोल्लेखित जहाजबांधणी कंपनीने याआधीच नऊ एसीटीसीएम बार्जेसचे वितरण केले आहे आणि एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहित करण्याप्रति भारतीय नौदलाची बांधिलकी अधोरेखित करत चार सुलाज बार्जेसची बांधणी तसेच भारतीय नौदलाकडे हस्तांतरण करण्याचे कंत्राट देखील या कंपनीला देण्यात आले आहे.

नौदलाकडे या बार्जेसच्या हस्तांतरणामुळे भारतीय नौदलाच्या जेटींच्या धक्क्यांवर तसेच बाह्य भागातील बंदरांच्या ठिकाणी वाहतूक आणि नौदलाच्या जहाजांवर सामान/दारुगोळा चढवणे आणि उतरवणे अधिक सुलभ होईल आणि त्याद्वारे भारतीय नौदलाच्या परिचालनात्मक वचनबद्धतेला अधिक चालना मिळेल.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123912) Visitor Counter : 24