कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील सहा राज्यांतल्या महिला विद्यालयांमध्ये 30 उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करून ‘महिलांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील कारकीर्द’ सुरु करण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता (एमएसडीई) मंत्रालय आणि मायक्रोसॉफ्ट एकत्र आले


‘मागणी असलेली डिजिटल कौशल्ये शिकवून युवतींना सक्षम केल्यामुळे व्यक्तिगत कारकिर्दीत परिवर्तन घडेलच, पण त्याचसोबत अधिक न्याय्य आणि नवोन्मेष-प्रेरित अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या देशाच्या वाटचालीला देखील वेग येईल: केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

Posted On: 22 APR 2025 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2025

 

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता (एमएसडीई) मंत्रालय आणि मायक्रोसॉफ्ट यांनी ‘महिलांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील कारकीर्द’ सुरु करण्याच्या उद्देशाने सामंजस्य करार केला आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) क्षेत्रातील कारकीर्द घडवण्यासाठी महिलांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरु केलेला हा एक अग्रगण्य कौशल्य उपक्रम आहे. हा धोरणात्मक सहयोग महिलांना उद्योग क्षेत्राला अनुसरून असणाऱ्या एआय कौशल्यांनी सुसज्ज करून उदयोन्मुख तंत्रज्ञानातील लिंगभावात्मक दरी भरून काढेल, महिलांना डिजिटल अर्थव्यवस्थेत अधिक अर्थपूर्ण रीतीने सहभागी होणे शक्य करेल आणि  त्यांना भारताच्या नवोन्मेष प्रणीत  विकासात सक्रीय योगदान देण्यासाठी मदत करेल.

या सहयोगी उपक्रमाचा भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट कंपनी महिलांसाठी एआय कौशल्य आणि नवोन्मेष आराखड्याअंतर्गत 240 तासांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करेल. हा अभ्यासक्रम उद्योगांच्या मानकांना अनुसरून असेल आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाशी (एनसीव्हीईटी)विचारविनिमय करुन तो विकसित करण्यात येईल. हब आणि स्पोक नमुन्यानुसार भागीदारीत हे प्रशिक्षण देण्यात येईल.

या भागीदारीबद्दल बोलताना, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी म्हणाले, “हा उपक्रम म्हणजे समावेशक आणि भविष्यासाठी सज्ज कार्यबळाला आकार देण्यासाठी सरकार आणि उद्योगक्षेत्र कशा प्रकारे एकत्र येऊ शकतात याचे उदाहरण आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीशी झालेली आपली ही भागीदारी एआय सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये महिलांसाठी संधींचा विस्तार करण्याप्रती मंत्रालयाची बांधिलकी अधोरेखित करते. मागणी असलेली डिजिटल कौशल्ये शिकवून युवतींना  सक्षम केल्यामुळे व्यक्तिगत कारकिर्दीत परिवर्तन घडेलच, पण त्याचसोबत अधिक न्याय्य आणि नवोन्मेष-प्रेरित अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या देशाच्या वाटचालीला देखील वेग येईल.”

या उपक्रमातील एक भागीदार एज्युनेट फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येणार असून सहभागी शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट संघटना आणि उद्योग संस्थांसह एकत्र येऊन ही संस्था काम करत आहे. यातून परिसंस्थाविषयक बदल घडवण्यासाठी आघाडी स्थापन करून महिलांना उद्योगांशी संबंधित कौशल्ये आणि आर्थिक संधी मिळवणे शक्य करून कार्यबळात त्यांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हा कार्यक्रम महिला शिक्षण संस्थांमध्ये हब सेंटर्स म्हणून कार्य करणाऱ्या 30 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करून उच्च शिक्षणविषयक वर्गअध्ययनाला पूरक असणार आहे. त्यापुढेही हा कार्यक्रम स्तर 2 आणि स्तर 3 च्या शहरांमध्ये 150 स्पोक केंद्रांना पाठबळ देऊ करणार आहे.

या कार्यक्रमातून एआय साधने आणि वास्तव जगातील साधनांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे सखोल एआय प्रशिक्षण देऊन 20,000 शिक्षणार्थींना उद्योगांना समर्पक ठरणारे कौशल्य आणि प्रकल्पाधारित अनुभव मिळवण्यासाठी मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हे शिक्षण घेणाऱ्यांना संरचित प्रशिक्षणाच्या माध्यमातून एआय सक्षम भूमिकांमध्ये तज्ञ व्यक्ती, एआय प्रमाणीकरण, अंतर्वासिता, शिकाऊ प्रशिक्षण, फेलोशिप, कारकीर्दविषयक मार्गदर्शन आणि नोकरीच्या संधी यांचा लाभ होणार आहे.

हा कार्यक्रम ग्रामीण भारतातील महिलांसाठी एआय बद्दल संशोधन करून महिलांच्या आर्थिक संधी सुधारणे, एआय विकासक होण्यासाठी त्यांना सज्ज करणे, एआय साधने आणि डाटासेट्स उभारणे या संदर्भातील संधी निर्माण करून ग्रामीण एआय नवोन्मेष/ उद्योग संस्थांसाठी टॅलेंट पाईप लाईन  निर्माण करेल.  

समावेशक कौशल्याप्रती मायक्रोसॉफ्ट कंपनीची बांधिलकी अधोरेखित करत, मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या जागतिक वितरण केंद्र प्रमुख अपर्णा गुप्ता म्हणाल्या, “सर्वसमावेशक आर्थिक वृद्धीसाठी एआय कौशल्ये न्याय्य पद्धतीने उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे यावर आमचा विश्वास आहे. या सहयोगाच्या माध्यमातून, आम्ही स्तर 2 आणि स्तर 3 मधील शहरांतील शिक्षण संस्थांमध्ये क्षमता निर्मितीला मजबुती देत आहोत.आणि यातून शेवटी एआय-सामर्थ्यावर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेत महिलांना अधिक समृध्द होण्यास सक्षम करून उद्याच्या कार्यबळाला घडवणे शक्य होणार आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123625) Visitor Counter : 8