वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
डीपीआयआयटी आणि स्ट्राइड व्हेंचर्स यांनी भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज 2025 च्या विजेत्याची केली घोषणा, 10 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार
Posted On:
22 APR 2025 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2025
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) स्टार्टअप इंडिया आणि स्ट्राइड व्हेंचर्स यांच्या भागीदारीत, भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज 2025 चा विजेता म्हणून स्टार्टअप ब्युयन्सी प्लास्टिक्स फॉर चेंज रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेडची घोषणा केली. उच्च-प्रभाव असलेल्या, स्वदेशी स्टार्टअप्सना मान्यता देऊन त्यांना सक्षम बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या स्पर्धेच्या 30 दिवसांच्या कालावधीत प्राप्त झालेल्या 120 हून अधिक स्टार्टअप अर्जांमधून विजेत्याची निवड करण्यात आली. देशातील 22 राज्यांमधून अर्ज आले होते, ज्यात शाश्वतता, फिनटेक आणि ई-मोबिलिटी क्षेत्रात कार्यरत स्टार्टअप्सचा समावेश होता.
या स्पर्धेचा विजेता, प्लास्टिक्स फॉर चेंज ची स्थापना 2015 मध्ये झाली होती आणि फेअर ट्रेड सत्यापित पुनर्वापर-योग्य प्लास्टिक पुरवठा साखळी तयार करण्यावर त्यांचा भर आहे. कंपनी सध्या रीसायकलिंग युनिट्सना उच्च-दर्जाचे आरपीईटी, आरएचडीपीई आणि आरपीपी साहित्य प्रदान करण्यासाठी प्लास्टिक कचऱ्याचे नैतिकदृष्ट्या सोर्सिंग आणि एकत्रीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने अनौपचारिक कचरा आणि प्लास्टिक संग्राहकांबरोबर थेट काम केले आहे आणि औपचारिक अर्थव्यवस्थेत त्यांचा अंतर्भाव केला आहे. स्टार्टअपची विद्यमान संकलन क्षमता 20,000 टनांहून अधिक आहे आणि आता भारतीय प्लास्टिक पुनर्वापर क्षेत्रात अधिक व्यापक होण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे.
स्ट्राइड व्हेंचर्स हा भारतातील सर्वात मोठा व्हेंचर डेट फंड असून त्याने गेल्या पाच वर्षांत नवीन युगातील 170 हून अधिक स्टार्टअप्समध्ये 1अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. स्ट्राइडने आता सिंगापूर, अबू धाबी, रियाध आणि लंडनमध्ये आपला विस्तार केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, स्ट्राइड व्हेंचर्सने देशभरातील नवोदित स्टार्टअप्सना निधीपुरवठा, नेटवर्क, बाजारपेठ प्रवेश तसेच मार्गदर्शनपर सहाय्य प्रदान करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर भारतीय स्टार्टअप्सना विस्तार करण्यास मदत करण्यासाठी डीपीआयआयटी सोबत एक सामंजस्य करार केला.
स्ट्राइड व्हेंचर्सने प्रथमच भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज आयोजित केले. विजेत्यांसाठी, स्ट्राइड व्हेंचर्सने, आवश्यक माहिती घेतल्यानंतर त्याला अनुसरून भारतात शाश्वतता आणि पुनर्वापर मधील स्टार्टअपच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी सहाय्य, मार्गदर्शन आणि स्ट्राइडच्या नेटवर्कमध्ये सुलभतेसह 10 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची घोषणा केली.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123540)
Visitor Counter : 11