संरक्षण मंत्रालय
सैनिकांनी युध्द कौशल्याबरोबर जटिल आव्हानांना तोंड देण्यासाठी मानसिक संतुलन आणि आध्यात्मिकते संदर्भातही प्रभुत्व प्राप्त करावे : संरक्षण मंत्री
ईसीएचएस लाभार्थ्यांच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी संरक्षण मंत्रालयाने केला सामंजस्य करार
Posted On:
21 APR 2025 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2025
“आजच्या युगामध्ये सतत बदलणाऱ्या युद्धाच्या स्वरूपामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपल्या सैनिकांनी मानसिक स्थैसर्य राखले पाहिजे आणि युध्द कौशल्याइतकेच आध्यात्मिक सक्षमीकरणातही कुशल असले पाहिजे,” असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज -21 एप्रिल 2025 रोजी राजस्थानमधील माउंट अबू येथील ब्रह्मकुमारी मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. आजकाल सायबर, अवकाश, माहिती आणि मानसिक आघाड्यांवर युद्धे लढली जात आहेत आणि सैनिकांनी मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याची गरज आहे. कारण देशाचे संरक्षण केवळ शस्त्रांनीच नव्हे तर मजबूत व्यक्तिमत्त्व, प्रबुद्ध चेतना आणि जागरूकतेने देखील करता येते, यावर त्यांनी भर दिला.
याप्रसंगी मंत्री राजनाथ सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, सैनिकासाठी शारीरिक शक्ती मूलभूत असली तरी मानसिक शक्ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी सांगितले की, सैनिक कठीण परिस्थितीत सेवा करून, राष्ट्राचे रक्षण करतात आणि या आव्हानांवर मात करण्यासाठी एका मजबूत अंतर्मनातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर केला जातो. त्यांनी पुढे सांगितले की, दीर्घकाळ ताणतणाव, अनिश्चितता आणि कठीण परिस्थितीत काम केल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यासाठी अंतर्मन मजबूत करणे आवश्यक आहे. सैनिकांचे मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी ब्रह्मकुमारींची मोहीम त्या दिशेने एक प्रशंसनीय पाऊल आहे, असे ते म्हणाले.
सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेता, हा उपक्रम सैनिकांचे मन अधिक बळकट करेल असे संरक्षण मंत्री म्हणाले. “‘स्व-सशक्तीकरण - आंतरिक जागृतीद्वारे’ या मोहिमेची संकल्पना आजच्या काळात अत्यंत प्रासंगिक आहे. ध्यान, योग, सकारात्मक विचार आणि आत्म-संवादाद्वारे आत्म-परिवर्तन आपल्या शूर सैनिकांना मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक शक्ती प्रदान करेल. आत्मपरिवर्तन हे बीज आहे, राष्ट्रीय परिवर्तन हे त्याचे फळ आहे. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात, भारत या संदेशाचा प्रसार करू शकतो की, अंतर्मन आणि सीमांचे संरक्षण एकत्रितपणे शक्य आहे,” असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय संस्कृतीत रुजलेले अध्यात्म आणि योग हे मानसिक आरोग्य वाढवण्याचे आणि ताण, चिंता आणि भावनिक अशांततेला तोंड देण्याचे सर्वात मोठे साधन असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, एक सतर्क आणि मजबूत सुरक्षा कर्मचारी राष्ट्रासाठी दीपस्तंभ बनतो, जो कोणत्याही वादळाला दृढनिश्चयाने तोंड देऊ शकतो. निवासी, क्षेत्रीय आणि ऑनलाइन कार्यक्रम, विशेष मोहिमा आणि बल विशिष्ट प्रकल्पांद्वारे सुरक्षा दलांना बळकटी दिल्याबद्दल त्यांनी ब्रह्मा कुमारी संघटनेच्या सुरक्षा सेवा शाखेचे कौतुक केले.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालय आणि ब्रह्मा कुमारींच्या एसएसडब्ल्यू मुख्यालय, राजयोग शिक्षण आणि संशोधन प्रतिष्ठा्न यांच्यामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला. माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस) लाभार्थ्यांना औषधोपचाराची कमीत कमी गरज भासावी,त्यांना औषधांवरच अवलंबून रहावे लागू नये, यासाठी चांगले मानसिक आरोग्य मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123258)
Visitor Counter : 10