आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली 'यकृत आरोग्य प्रतिज्ञा कार्यक्रम', केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेलही उपस्थित


स्वयंपाकात तेलाचा वापर किमान 10% कमी करण्याच्या आणि लठ्ठपणावर मात करण्यासाठी जनजागृती करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा नड्डा यांनी केला पुनरुच्चार

Posted On: 21 APR 2025 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 एप्रिल 2025

 

जागतिक यकृत दिन 2025 निमित्त, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज निर्माण भवन येथे  आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली  'यकृत आरोग्य प्रतिज्ञा कार्यक्रम' झाला. या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव, आरोग्य सेवा महासंचालक प्रा. (डॉ.) अतुल गोयल, यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेचे(आयएलबीएस) संचालक प्रा. (डॉ.) एस.के. सरीन, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलावर्धन राव हेदेखील उपस्थित होते.

या वर्षीच्या जागतिक यकृत दिनाची संकल्पना  'अन्न हेच औषध' अशी असून  पोषण आणि यकृत आरोग्य यातील  महत्त्वाचा संबंध यातून अधोरेखित करण्यात आला आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले.  "यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे जो अन्नाचे पचन, विषारी पदार्थ काढून टाकणे आणि ऊर्जा साठवणे यासारखी आवश्यक कार्ये करतो. जर यकृत निरोगी नसेल तर संपूर्ण शरीराला त्रास होतो."असे सांगून नड्डा यांनी यकृताच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.  "फॅटी लिव्हर किंवा मेदयुक्त यकृत  केवळ यकृताच्या कार्यावर परिणाम करत नाही तर हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि  कर्करोगाचा धोकादेखील लक्षणीयरीत्या वाढवते." असे त्यांनी सांगितले. "पण लक्षात घेण्याची बाब म्हणजे मेदयुक्त यकृताच्या समस्येला रोखता येऊ शकते आणि निरोगी जीवनशैली व आरोग्यपूर्ण आहाराच्या सवयींचा अवलंब करून त्याचे आरोग्य बऱ्याच अंशी राखता येऊ शकते."

नड्डा यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली,  "अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये भाषण करताना, देशवासीयांना स्वयंपाकात तेलाचा वापर किमान  10% कमी करण्याचे आवाहन केले होते. हे छोटेसे पण प्रभावी पाऊल यकृताचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि देशातील असंसर्गजन्य आजारांचे  (एनसीडी) प्रमाण  कमी करण्यासाठी खूप मदत करू शकते." नड्डा यांनी सर्वांना "यकृताच्या आरोग्याची काळजी घेण्याची, त्याची नियमित तपासणी करण्याची आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची" प्रतिज्ञा करण्याचे आवाहन केले.

शिबिरात, सर्व सहभागींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माहितीपूर्ण अन्न निवडी करण्याचे, निरोगी जीवनशैली जगण्याचे, खाद्यतेलाचे सेवन किमान 10% कमी करण्याचे आणि लठ्ठपणावर मात करण्यासंबंधी जनजागृती करण्याची प्रतिज्ञा घेतली. 

मंत्रालयाने एफएसएसएआय आणि आयएलबीएस यांच्या सहयोगाने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एका व्यापक, यकृत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून  एफएसएसएआयने 'अन्न हेच औषध' या वर्षीच्या संकल्पनेला अनुसरून, पौष्टिक भरडधान्य आणि यकृतासाठी चांगल्या आहाराचे प्रदर्शनही आयोजित केले. 

पौष्टिक भरडधान्यांच्या पोषणमूल्यांकडे लक्ष वेधताना यकृत आरोग्य जपण्यासाठीचे त्यांचे फायदे प्रदर्शनात मांडण्यात आले. आहारातील फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध, पौष्टिक भरडधान्य चांगले पित्त स्रवण, दाह कमी करण्यास, लिपिड प्रोफाइल  आणि पचन सुधारण्यास मदत करतात. या घटकांचा   यकृताच्या आरोग्याशी निकटचा संबंध आहे. दैनंदिन आहारात पौष्टिक भरडधान्यांचा  समावेश यकृताच्या विकारांना प्रतिबंध घालण्यास मदत करतो. यामध्ये नॉन -अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजदेखील  समाविष्ट आहे.

  

याखेरीज, शरीरातले घातक पदार्थ काढून टाकण्यासाठी सहायक ठरतात आणि एकंदर यकृत आरोग्य राखतात, अशा उपयुक्त भाज्या (जसे ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर), हिरव्या पालेभाज्या, फॅटी फिश (ओमेगा -3 चे भरपूर प्रमाण असलेले), नट्स आणि सीड्स, निंबूवर्गीय फळे आणि आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ (जसे ऑलिव्ह तेल) यांचे प्रदर्शन येथे मांडण्यात आले होते. 

 

* * *

JPS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123138) Visitor Counter : 24