कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची ब्राझील भेट अनेक कारणांनी ठरली महत्त्वाची, 21 एप्रिल रोजी होणार मायदेशी आगमन


15 व्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या परिषदेत सहभाग; भारत आणि ब्राझील यांच्यातील कृषी व्यापार, तंत्रज्ञान व नवोन्मेष सशक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली

Posted On: 20 APR 2025 6:36PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारचे कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे सोमवारी सकाळी, 21 एप्रिल रोजी ब्राझील दौऱ्यावरून परतणार आहेत. त्यांचा हा दौरा अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. 15 व्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीत भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करण्याबरोबरच, हा दौरा भारत आणि ब्राझील यांच्यातील कृषी व्यापार, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांना बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

ब्राझील दौऱ्यात त्यांनी भारतामध्ये सोयाबीन उत्पादन आणि निर्यात वाढविण्याच्या मुद्द्यावर भर दिला. जागतिक तंत्रज्ञानाचा लाभ भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने त्यांनी विविध उपक्रमांची चर्चा केली. विविध देशांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच जागतिक अन्नसुरक्षेला बळकटी मिळू शकते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

या दौऱ्यात मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भारतातील लहान शेतकऱ्यांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवल्या. लहान शेतकऱ्यांचे संरक्षण व सक्षमीकरण झाल्याशिवाय जागतिक अन्नसुरक्षा अपूर्ण राहील, असे त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, भारत सर्वसमावेशक, समताधिष्ठित व शाश्वत कृषीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

वसुधैव कुटुंबकम् या मूल्यभावनेला अनुसरून भारत देश नेहमीच परस्पर विश्वास व सहकार्याचा संदेश देतो, असे ते म्हणाले. कृषी तंत्रज्ञान, नवोन्मेष, क्षमतेचा विकास आणि व्यापार सुलभीकरणाच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढवावे, जेणेकरून विविध देशांतील शेतकरी व कृषी उद्योजक यांना त्याचा लाभ घेता येईल, असे आवाहन त्यांनी केले.

ब्रिक्स व्यासपीठावर भारताने कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, संशोधन, अन्न प्रक्रिया आणि व्यापार या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्याची मागणी केली. चौहान यांनी भारताच्या वतीने दिलेल्या भाषणात जागतिक अन्नसुरक्षा, लहान शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, कृषी नवोन्मेष व तांत्रिक सहकार्य, तसेच ब्रिक्स देशांबरोबर भागीदारी वाढविण्यावर भर दिला.

एकूणच, शिवराजसिंह चौहान यांचा ब्राझील दौरा केवळ राजकीय नव्हे तर तंत्रज्ञान नवोन्मेष, उत्पादनवाढ आणि भारतीय शेतीसाठी जागतिक भागीदारी साध्य करण्याचा एक उपक्रम आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळू शकतो.

ब्राझिलिया येथे झालेल्या 15व्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीस भारत, यजमान ब्राझील तसेच ब्रिक्स सदस्य राष्ट्रे रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इंडोनेशिया आणि इराण येथील कृषी मंत्री/वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीचा मुख्य विषय  “ब्रिक्स देशांमधील सहकार्य, नवोन्मेष आणि न्याय्य व्यापाराद्वारे सर्वसमावेशक व शाश्वत शेतीला प्रोत्साहन” हा होता.

15व्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतल्यानंतर चौहान यांचा दौरा भारत आणि ब्राझील यांच्यातील कृषी सहकार्याला नवीन दिशा देईल, असा अंदाज आहे. यामुळे दोन्ही देशांमधील कृषी व्यापाराला चालना मिळेल. हवामानस्नेही सोयाबीन वाण, यांत्रिकीकरण, साधनसंपत्तीचा अचूक वापर असलेली शेती आणि शाश्वत शेतीच्या बाबतीत ब्राझीलसोबत ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची इच्छा केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली. ब्राझीलच्या कृषी प्रतिमानामधून यांत्रिकीकरण, सिंचन आणि संशोधन यांचे अध्ययन करून त्याची अंमलबजावणी भारतीय शेतीत करण्याचा उद्देश त्यांनी व्यक्त केला. यामुळे भारतीय शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळू शकेल.

या बैठकीत जैव इंधन, जैव ऊर्जा, पुरवठा साखळी एकीकरण आणि कृषी यंत्रसामग्री या क्षेत्रांतील सहकार्याबाबतही चर्चा झाली. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळू शकेल. भारत आणि ब्राझील यांचे संयुक्त प्रयत्न जागतिक अन्न सुरक्षेला बळकटी देतील, कारण ब्राझीलने गेल्या 50 वर्षांत कृषी निर्यातीत मोठी वाढ साधली आहे, जी भारतासाठी प्रेरणादायी आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी ब्राझीलचे कृषी व पशुधन मंत्री कार्लोस हेन्रिक बॅकेटा फाव्हेरो आणि कृषी विकास व कौटुंबिक शेती मंत्री लुईझ पावलो टेक्सेरा यांच्याशी द्विपक्षीय बैठकाही घेतल्या. या बैठकीत कृषी, अ‍ॅग्रो-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. साओ पावलोमध्ये त्यांनी ब्राझीलमधील 27 कृषी उद्योग समुदायाच्या सदस्यांची देखील भेट घेतली. या बैठकीत कृषी व्यापार, उत्पादन तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, जैव इंधन, तांत्रिक नवोन्मेष आणि पुरवठा साखळी एकीकरण या क्षेत्रांतील सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय मंत्री चौहान यांनी ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन प्रकल्प, टोमॅटो फार्म आणि इतर संस्थांना भेट दिली तसेच यांत्रिकीकरण, सिंचन आणि अन्न प्रक्रिया यांच्याशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बारकाईने निरीक्षण केले. सध्या भारत सोयाबीन तेल आयात करतो, परंतु आता दोन्ही देश संयुक्तपणे सोयाबीन उत्पादन आणि प्रक्रिया करण्यासाठी गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि प्रकल्प स्थापित करण्याच्या शक्यतांचा शोध घेत आहेत. यामुळे भारतात सोयाबीन उत्पादन आणि निर्यात वाढू शकते. भारतात सोयाबीन उत्पादन आणि प्रक्रिया वाढवण्यासाठी ब्राझीलसोबत एकत्र काम करण्याची योजना आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, यांत्रिकीकरण आणि बियाणे संशोधनात दोन्ही देशांमधील सहकार्याच्या शक्यतांचाही पडताळणी केली जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा दररोज एक रोप लावण्याचा दिनक्रम त्यांनी ब्राझीलमध्येही सुरू ठेवला. त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि मातृत्वाचा आदर करणाऱ्या 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत ब्राझीलिया येथील भारतीय दूतावासात वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला. शिवराज सिंह यांनी ब्राझीलमधील साओ पावलो येथे भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत काळ असून 2047 मध्ये, आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करू तेव्हा भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आपले ध्येय आहे, असे ते म्हणाले.

ब्राझीलमधील माझ्या वास्तव्यादरम्यान, मला विविध अनुभव आणि तंत्रांनी स्वतःला समृद्ध करण्याची संधी मिळाली. आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर भारतात उत्पादन वाढवण्यासाठी करू. मला विश्वास आहे की भारत आणि ब्राझीलमधील परस्पर सहकार्य आपल्या शेतकऱ्यांना सक्षम करेल आणि जागतिक अन्न सुरक्षेला एक नवीन दिशा मिळेल,” असे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह म्हणाले.

भारत-ब्राझील कृषी सहकार्य, ब्रिक्स देशांसोबतची भागीदारी आणि भारतीय शेतीमध्ये नवोन्मेष आणि शाश्वत वाढीला गती देण्याच्या दिशेने ही भेट एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे सिंह म्हणाले.

***

S.Patil/N.Gaikwad/G.Deoda/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2123069) Visitor Counter : 68