गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज राजस्थानमध्ये अबू रोड इथे सुरक्षा दलाच्या जवानांसाठी आयोजित आत्मजागृतीच्या माध्यमातून स्व-सक्षमीकरण या विषयावरील एका राष्ट्रीय परिसंवादाचे केले उद्घाटन
आज जगभरातील करोडो लोक योगाभ्यास, ध्यानधारणा आणि अध्यात्माच्या मार्गावर चालत आहेत, आगामी काळात हाच जागतिक शांततेचा मार्ग बनेल
प्रविष्टि तिथि:
17 APR 2025 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज राजस्थानमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांसाठी आयोजित आत्मजागृतीच्या माध्यमातून स्व-सक्षमीकरण या विषयावरील एका राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन केले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ब्रम्हा कुमारी ही संस्था योग आणि ध्यान धारणेच्या माध्यमातून जगभरातील प्रत्येक व्यक्तिमध्ये शांती आणि आध्यात्मिक साधनेचा दीप प्रज्वलित करण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तीमधील चांगुलपणा जागृत करण्याचे प्रयत्न इथे केले जातात आणि ही संस्था बऱ्याच काळापासून हे काम करत आली आहे, अशा शब्दांत त्यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. इथे आल्यावर एक अद्भुत शांतीमय वातावरणाची अनुभूती येते, आणि याचे कारण या ठिकाणातल्या आध्यात्मिक ऊर्जेत आहे असे ते म्हणाले.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आपला देशाने खूप मोठी मजल मारली आहे, आता भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, आणि काही वर्षातच आपण जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपला देश 2047 मध्ये स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे करत असताना प्रत्येक क्षेत्रात जगातील आघाडीचा देश बनण्याचे ध्येय घेऊन वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. जागतिक बंधुत्वाची भावना असलेल्या, प्रत्येक मानवाच्या आत्म्याला दैवी शक्तीशी जोडण्याची आणि प्रत्येक जीवाला सद्गुणाच्या मार्गावर नेण्याची क्षमता असलेल्या आपल्या परंपरांना पुढे नेणे हेच आपले उद्दिष्ट असायला हवे, आणि ब्रम्हा कुमारीसारख्या संस्था या दिशेने चांगले काम करत आहेत, असे अमित शहा म्हणाले.

आपल्या सुरक्षा दलांचा मोठा त्याग आणि त्यांच्या समर्पणामुळेच आज देशाची राष्ट्रीय सुरक्षा अबाधित असल्याचे त्यांनी नमूद केले. आपले जवान अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही अथक प्रयत्न करत आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करतात ही बाब त्यांनी अधोरेखित केली. जेव्हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेची गोष्ट असते, त्यावेळी लष्कर, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दल कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच संरक्षण करण्यासाठी कठोर मेहनत घेतात, या जबाबदारीमुळे त्यांच्यावर मोठा ताणही येत असतो याची दखलही त्यांनी आपल्या संबोधनातून घेतली. यावेळी शहा यांनी मानसिक आणि भावनिक कल्याणाचे महत्त्व देखील अधोरेखित केले. सुरक्षा कर्मचाऱ्यांना मनःशांती लाभावी, त्यांना शरीरिक आणि आत्म्यिक शांतीची अनुभूती यावी यासाठी मदत करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे असे त्यांनी नमूद केले. याच अनुषंगाने ही संस्था गेल्या 25 वर्षांपासून सुरक्षा दलांपर्यंत पोहोचत आहे, सुरक्षा दलांतील जवानांचा मानसिक आणि शारिरीक ताण कमी करून त्यांच्या आत्मिक शांतीला चालना देत आहे, हे एका सक्षम आणि अधिक सुरक्षित राष्ट्राच्या निर्माणातले योगदानच आहे असे शहा यावेळी म्हणाले.

आज जगभरातील लाखो लोक योगाभ्यास, ध्यान धारणा आणि अध्यात्माचा आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून अवलंब करत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. येत्या काही वर्षांत हाच मार्ग जागतिक शांततेचा मार्ग बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
* * *
N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2122586)
आगंतुक पटल : 59