पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया स्टील 2025: उद्घाटनपूर्व कार्यक्रम


24 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत मुंबईत भव्य आंतरराष्ट्रीय पोलाद परिषदेचे आयोजन करण्यासाठी भारत सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलाद उद्योगाच्या या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे उद्घाटन करणार

Posted On: 17 APR 2025 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 एप्रिल 2025

 

मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 24 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत इंडिया स्टील 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. सहाव्यांदा आयोजित केल्या जात असलेल्या या  द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेच्या व्यासपीठावर जागतिक पोलाद मूल्य साखळीतील आघाडीचे भागधारक एकत्र येतील आणि विकास, शाश्वतता, लवचिकता आणि नवोन्मेशावर लक्ष केंद्रित करून या क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा करतील.

राष्ट्रीय पोलाद धोरणानुसार भारत 2030 साला पर्यंत 300 दशलक्ष टन उत्पादन क्षमता आणि दरडोई 160 किलो वापराचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने पुढे जात आहे. पोलाद क्षेत्रातील हा महत्वाकांक्षी विकास लक्षात घेता, आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नवीन संधी खुल्या करण्यासाठी, ज्ञानाची सहज देवाण घेवाण करण्यासाठी आणि पोलाद मूल्य साखळीमध्ये व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या उद्देशाने भारताच्या धोरणात्मक सुधारणा आणि पायाभूत सुविधा उपक्रम प्रदर्शित करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिल 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, पोलाद आणि अवजड उद्योग राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विशुदेव साई यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत, देशाच्या पोलाद उद्योगावरील या भव्य कार्यक्रमाला संबोधित करतील.

या परिषदेत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह विविध केंद्रीय मंत्रालये आणि राज्यांचा उच्चस्तरीय सहभाग असेल. पोलाद क्षेत्र हे आत्मनिर्भर भारताच्या रथाच्या चाकाचा महत्वाचा भाग असल्याचे यामधून अधोरेखित होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद व्यंकटेश जोशी, खाण मंत्री जी किशन रेड्डी, पोलाद व अवजड उद्योग राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. परिषदेतील महत्वाच्या सत्रांचे ते संचालन करतील. यामधून भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणातील पोलादाचे बहुक्षेत्रीय महत्व प्रतिबिंबित होईल.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय) सचिव, केंद्रीय पोलाद मंत्रालय सचिव तसेच कोळसा मंत्रालय सचिव यांच्यासह अनेक ज्येष्ठ केंद्र सरकारी अधिकारी देखील या कार्यक्रमात आयोजित महत्त्वाच्या सत्रांचे अध्यक्षपद भूषवतील.

पोलाद क्षेत्रातील वाढता आंतरराष्ट्रीय सहभाग आणि धोरणात्मक सहकार्य यांचे दर्शन घडवत जागतिक पातळीवरील आघाडीच्या उद्योगांचे प्रमुख, रशियन महासंघाचे उद्योग आणि व्यापार उपमंत्री तसेच ऑस्ट्रेलिया, मोझांबिक आणि मंगोलिया या देशांच्या राजदूतांसह उच्चस्तरीय शिष्टमंडळांचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ परदेशी मान्यवर देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.

सदर आंतरराष्ट्रीय परिषदवजा प्रदर्शनात अंतर्भूत असलेले महत्त्वाचे घटक:

  • प्रदर्शन आणि नवोन्मेष दर्शन: पोलाद उद्योगातील अत्यधुनिक तंत्रज्ञाने आणि घडामोडी यांचे सादरीकरण करणारे प्रदर्शन
  • गोलमेज परिषदा: मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदा तसेच विभागवार परिषदांसह क्षेत्र-विशिष्ट विषय, आंतरराष्ट्रीय सहयोग आणि उभरत्या पद्धतींविषयी चर्चा.
  • प्रतिक्रमित खरेदीदार-विक्रेता भेट (आरबीएसएम): व्यापारविषयक संधींची सुलभ उपलब्धता तसेच नव्या व्यापार सहभागाची जोपासना करण्यासाठी बैठकीचे आयोजन
  • आंतरराष्ट्रीय सहभाग : दक्षिण कोरिया, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि  मंगोलिया या देशांसह महत्त्वाच्या पोलाद उत्पादक देशांना सहभागी करून घेणारी देश-विशिष्ट सत्रे. या सत्रांमधील चर्चांमध्ये भारताच्या पोलाद उत्पादनाला असलेला धोका कमी करणे आणि जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकतेला चालना देणे या उद्देशाने संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि लवचिक पुरवठा साखळ्या इत्यादी बाबींवर सखोल चर्चा होईल.

पोलादाचा देशांतर्गत वापर वाढवणे, पोलादाच्या भविष्यकालीन उपयोगाचे दर्शन घडवणे आणि जागतिक भागीदारीला चालना देणे यांसारख्या संकल्पनांवर या कार्यक्रमात अधिक लक्ष एकाग्र करण्यात येणार आहे.

सुमारे 12,000 हून अधिक व्यापार अभ्यागत, 250 प्रदर्शक आणि विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे 1200 परिषद प्रतिनिधी यांच्यासह केंद्र सरकारी विभाग, राज्य सरकारे, देशाचे प्रतिनिधित्व करणारी शिष्टमंडळे आणि भारत तसेच परदेशातील आंतरराष्ट्रीय खरेदीदार या सर्वांचा सहभाग असलेली ही परिषद जागतिक पातळीवर आयोजित सर्वात भव्य पोलादसंबंधी कार्यक्रमांपैकी एक असेल.

 

* * *

G.Chippalkatti/Rajshree/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2122474)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil