संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत एक विकसित देश म्हणून तसेच जगातील अग्रेसर लष्करी सामर्थ्य म्हणून उदयाला येईल: संरक्षणमंत्री

Posted On: 17 APR 2025 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 एप्रिल 2025

 

नवी दिल्ली येथे आज, दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी आयोजित संरक्षण परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज भारताच्या उभारणीचा ठोस दृष्टीकोन  सर्वांसमोर मांडला. स्वदेशीकरण, नवोन्मेष आणि जागतिक पातळीवरील नेतृत्वावर स्पष्टपणे लक्ष एकाग्र करत त्यांनी जाहीर केले की भारत स्वतःच्या सीमांचे संरक्षण करतानाच  आंतरराष्ट्रीय संरक्षण परिसंस्थेतील महत्त्वाचा भागीदार म्हणून स्वतःला सिद्ध करत आहे. “भारत फक्त विकसित देश म्हणून उदयाला येत नसून जगातील सर्व लष्करी शक्तींमध्ये सर्वात शक्तिशाली लष्कर म्हणून उदयाला येईल तो दिवस आता फार दूर नाही,” त्यांनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या उपक्रमांमध्ये संरक्षण क्षेत्राचे पुनरुज्जीवन तसेच बळकटीकरण यांना सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. “भारत त्याचे आयातीवरील अवलंबित्व कमी करेल आणि असे एक संरक्षण संबंधी उद्योगांचे संकुल उभारेल जे भारताच्याच गरजा पुरवण्यासोबतच संरक्षण सामग्रीच्या निर्यातीची क्षमता देखील वाढवेल,” त्यांनी सांगितले.  

“आज, जेव्हा भारत स्वावलंबनाच्या मार्गावरून आगेकूच करत आहे तेव्हा तो जागतिक पुरवठा साखळ्या मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी देखील सज्ज आहे,” संरक्षणमंत्र्यांनी अधिक भर देत सांगितले. ते पुढे म्हणाले की देशातील संरक्षण सामग्रीच्या निर्मितीला बळकट करण्यासोबतच मेक इन इंडिया कार्यक्रमात जागतिक पुरवठा साखळी आधी मजबूत आणि लवचिक बनवण्याची देखील क्षमता आहे. भारताच्या संरक्षण सामग्री निर्मिती क्षमता राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक स्वायत्तता उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी काम करत असताना त्या जागतिक पुरवठासंबंधी धक्क्यांपासून देशातील निर्मिती उद्योगांना संरक्षण पुरवत आहेत असे त्यांनी सांगितले.

भारताच्या वाढत्या संरक्षण विषयक क्षमता संघर्ष निर्माण करण्याच्या हेतूने नाहीत ही बाब राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले, “आमच्या संरक्षण क्षमता शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी विश्वासार्ह प्रतिबंधक यंत्रणांसारख्या आहेत. आपण मजबूत असू तेव्हाच शांतता राखणे शक्य आहे,” ते पुढे म्हणाले.

युद्धाचे बदलते स्वरूप बघता, आगामी काळात संघर्ष आणि युद्धे अधिक हिंसक आणि अनपेक्षित असतील, असे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले.

सायबर आणि अंतराळ क्षेत्र नवीन युद्धभूमी म्हणून वेगाने म्हणून उदयाला येत आहेत, आणि त्याच बरोबर जगभरात मिथ्यक आणि दृष्टीकोनाचे युद्ध देखील लढले जात आहे. ही आव्हाने हाताळण्यासाठी सर्वांगीण क्षमता विकास आणि सातत्त्यपूर्ण सुधारणांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वदेशी कंपन्यांकडून खरेदी करण्यासाठी सरकारने संरक्षण अर्थसंकल्पात 75 टक्के निधी राखून ठेवल्याचेही राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. भारतातील संरक्षण उत्पादन 2014 मधील 40,000 कोटी रुपयांवरून आज 1.27 लाख कोटी रुपयांच्या पुढे  पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.  यंदाच्या वर्षी देशाचे संरक्षण उत्पादन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल, तर 2029 साला पर्यंत 3 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांचे उत्पादन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

संरक्षण निर्यातीचा आकडा 2013–14 मधील 686 कोटी रुपयांवरून 2024–25 मध्ये 23,622 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले. आपल्या देशात तयार झालेली संरक्षण उत्पादने सुमारे 100 देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. आपली संरक्षण निर्यात यंदाच्या वर्षी 30,000 कोटी रुपयांवर, तर 2029 साला पर्यंत 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचायला हवी, असे ते म्हणाले.

युवा वर्ग आणि स्टार्ट-अप्स मध्ये नवोन्मेशाला चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध  असल्याचे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. जहाजबांधणीमध्ये भारताने मिळवलेल्या यशावर भर देत राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या 97% हून अधिक युद्धनौका आता भारतीय शिपयार्डमध्ये तयार केल्या जातात. भारताने तयार केलेली जहाजे मॉरिशस, श्रीलंका, व्हिएतनाम आणि मालदीव यासारख्या मित्र देशांमधेही निर्यात केली जात आहेत, असे ते म्हणाले.

 

* * *

N.Chitale/Sanjana/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2122407) Visitor Counter : 48