संरक्षण मंत्रालय
दस्तलिक या भारत-उझबेकिस्तान दरम्यानच्या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वाचा औंध येथील परदेशी प्रशिक्षण केंद्रात प्रारंभ
Posted On:
16 APR 2025 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2025
दस्तलिक या भारत-उझबेकिस्तान दरम्यानच्या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वाचा औंध (पुणे) येथील परदेशी प्रशिक्षण केंद्रात आज प्रारंभ झाला. हा सराव 16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
60 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय पथकात जाट रेजिमेंट आणि भारतीय हवाई दलाची बटालियन प्रतिनिधित्व करत आहेत. उझबेकिस्तान पथकात उझबेकिस्तानच्या लष्करी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दस्तलिक हा भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान दरवर्षी होणारा संयुक्त सराव असून तो दोन्ही देशात आळीपाळीने आयोजित केला जातो. गेल्या वर्षी एप्रिल 2024 मध्ये उझबेकिस्तानच्या तेरमेझ जिल्ह्यात हा सराव आयोजित करण्यात आला होता.
HAQR.jpg)
या सरावाची संकल्पना ही निम-शहरी परिस्थितीत संयुक्त बहु क्षेत्रीय उप-पारंपरिक मोहीम या संकल्पनेवर आधारित असेल. हा सराव एका ठराविक प्रदेशावर कब्जा करण्याच्या दहशतवादी कारवाईला प्रत्युत्तर देण्यावर केंद्रित असेल. यामध्ये निरंतर संयुक्त कारवाईसाठी बटालियन स्तरावर संयुक्त कारवाई केंद्राची स्थापना, लोकसंख्या नियंत्रण उपाय, छापे, शोध आणि बिमोड कारवाया यासारख्या दहशतवादविरोधी मोहिमांची अंमलबजावणी आणि दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यासाठी हवाई साधनांसह अग्निशस्त्राचा वापर यांचा समावेश असेल. सरावा दरम्यान, लष्कर आणि हवाई दलाचे विशेष दल पुढील मोहिमांसाठी माउंटिंग बेस म्हणून वापरण्यासाठी हेलिपॅड सुरक्षित करतील. सरावात ड्रोन तैनात करणे, मानवरहित हवाई प्रणाली आणि प्रतिकूल भागात सैन्याला तग धरण्यासाठी हवाई दलाकडून लॉजिस्टिक सपोर्टचा देखील समावेश असेल. याव्यतिरिक्त, हेलिकॉप्टरचा वापर टेहळणी आणि निरीक्षण, विशेष हेलिबोर्न ऑपरेशन्स (SHBO), लहान टीम इन्सर्शन आणि एक्सट्रॅक्शन (STIE) आणि इतर संबंधित मोहिमांसाठी केला जाईल.
8F28.jpg)
संयुक्त सराव दस्तलिक -VI दोन्ही बाजूंना संयुक्त उप-पारंपरिक मोहीम आयोजित करण्याच्या रणनीती, तंत्र आणि प्रक्रियांमध्ये सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास सक्षम करेल. यामुळे दोन्ही सैन्यांमध्ये परस्पर-कार्यक्षमता, मैत्री आणि सौहार्द विकसित करण्यास मदत होईल. संयुक्त सराव संरक्षण सहकार्य देखील वाढवेल, ज्यामुळे दोन्ही मैत्रीपूर्ण राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध आणखी वाढतील.
* * *
G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122107)