गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
कराड शहरात शारीरिक स्वच्छता विषयक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट : कचरा व्यवस्थापनात स्थापित केला मापदंड
Posted On:
16 APR 2025 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2025
सॅनिटरी कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयाने संपूर्ण देशासमोर एक आव्हान उभे केले आहे, या कचऱ्याची विल्हेवाट अयोग्य पद्धतीने लावल्यास त्याचा पर्यावरणीय आणि मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. मात्र महाराष्ट्रातील कराड शहराने या समस्येवर मात करुन एक आदर्श निर्माण केला आहे. जैव वैद्यकीय आणि सॅनिटरी कचऱ्याचे 100% वर्गीकरण, संकलन आणि त्यांवर योग्य प्रक्रिया करुन कराडने कार्यक्षम आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन क्षेत्रात मापदंड स्थापन केला आहे. सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स आणि अशा प्रकारच्या शारीरिक स्वच्छताविषयक इतर वस्तूंचा कचरा अर्थात सॅनिटरी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्याने कराडने आरोग्याला असलेला धोका तसेच पर्यावरणीय हानी आणि चुकीच्या सामाजिक धारणांना प्रतिबंध करण्यात यश मिळवले आहे.
कराड मध्ये रुग्णालये, दवाखाने, घरगुती वापर आणि इतर संस्थांमधून दररोज सुमारे अंदाजे 300 ते 350 किलो इतका सॅनिटरी कचरा संकलित केला जातो. प्रशासनाने केलेल्या महत्त्वपूर्ण उपाययोजनांमधील एक महत्वाची म्हणजे सॅनिटरी कचऱ्याबद्दल असलेली निषेधात्मक भावना मोडून काढणे ही होय. या अंतर्गत सॅनिटरी कचरा व्यवस्थापन आणि त्याच्या अयोग्य विल्हेवाटीशी निगडित धोक्यांविषयी समाजामध्ये जनजागृती करुन त्याचे शिक्षण देणे यांचा समावेश होतो. शहरात निरनिराळ्या कार्यशाळा, समुदाय संपर्क कार्यक्रम आणि सार्वजनिक सेवा घोषणा यासारख्या उपक्रमांद्वारे रहिवाशांना कचरा वर्गीकरणाबद्दल शिक्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे स्वीकारली आहेत. या उपक्रमाने जबाबदार कचरा वर्गीकरण आणि त्याची विल्हेवाट लावण्यास प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कराड नगरपरिषदेने (केएमसी) तेथील महिला रहिवाशांना केलेल्या सहकार्यातून महिला बचत गटांची स्थापना झाली आणि त्यांनी निवासी भागात सॅनिटरी कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि वर्गीकरण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी शहरातील सार्वजनिक शौचालयांमध्ये लाल रंगाच्या वेगळ्या कचरापेट्या बसवण्यात आल्या, ज्यामुळे महिलांना अत्यंत जबाबदारीने सॅनिटरी कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य झाले.

याशिवाय शाळांनाही सॅनिटरी पॅड्स व्हेंडिंग मशीन आणि डिस्पोझेबल सिस्टिम बसवण्यास प्रोत्साहित केले जात आहे. याशिवाय वापरलेले सॅनिटरी पॅड फेकण्यापूर्वी कागदात गुंडाळून टाकणे यासारख्या स्वच्छतेच्या विल्हेवाटीच्या पद्धतींविषयी शहराची आयईसी अर्थात माहिती, शिक्षण आणि संवाद टीम जनजागृती करत आहे. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक शाळांनी इन्सिनरेटर बसवले आहेत, ज्यामुळे सॅनिटरी कचऱ्यावर योग्य प्रक्रिया केली जाते आणि उर्वरित अवशेष जैव-वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठवले जातात.

शहरातील कचरा संकलन वाहनात सॅनिटरी कचरा गोळा करण्यासाठी एक वेगळी कचराकुंडी असते. कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लागावी यासाठी स्वच्छता कर्मचारी या कचऱ्याचे वेगळे संकलन करतात. ज्यामुळे फक्त योग्य साहित्य जाळले जाते. कराड हॉस्पिटल असोसिएशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या उच्च-तापमानाच्या इन्सिनरेटर- जळीतयंत्रावर वर्गीकृत कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, याठिकाणी तो उच्च तापमानात जाळला जातो. इन्सिनेशन दरम्यान, सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडायझेशन केले जाते, ज्यामुळे उष्णता, वायू आणि राख निर्माण होते. पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी, हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी उत्पादित वायू फिल्टर केले जातात. हवेच्या गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी सुविधेच्या उत्सर्जन प्रक्रियेचे सातत्याने निरीक्षण केले जाते, नियामक देखरेखीसाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (SPCB) देखरेख प्रणालीशी रिअल-टाइम डेटा संलग्न केला जातो.
सॅनिटरी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी, कराड नगर परिषदेने (MC) स्वच्छता आणि जैव वैद्यकीय कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी कराड हॉस्पिटल असोसिएशनशी भागीदारी केली आहे. या करारांतर्गत, KMC ने जैव-वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामासाठी जमीन वाटप केली असून त्याचे संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी रुग्णालय संघटनेवर आहे. या व्यवस्थेचा एक भाग म्हणून, हॉस्पिटल असोसिएशनने 600 किलो/प्रतिदिन क्षमता असलेली 'कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी' (CBWTF) स्थापन केली जिथे नगरपरिषदेकडून मोफत गोळा केलेल्या स्वच्छता कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. 1200°C पर्यंत तापमान गाठण्यास सक्षम असलेल्या केंद्रीकृत इन्सिनरेटर च्या सहाय्याने शहरातील सर्व सॅनिटरी कचरा जाळला जातो. अशा प्रकारे उच्च-तापमानात जाळण्यामुळे प्रदूषणाचे धोके आणि आरोग्य धोके प्रभावीपणे कमी होतात, ज्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कामाचे सुरक्षित वातावरण सुनिश्चित होते. कराड शहरातील सुधारित स्वच्छता कचरा व्यवस्थापन प्रणालीचा सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय शाश्वततेवर लक्षणीय सकारात्मक परिणाम झाला आहे.

कराड हॉस्पिटल असोसिएशनसोबतच्या करारामुळे कराड नगरपरिषदेवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, कारण नगरपरिषदेला केवळ कचरा संकलन आणि वाहतुकीचा खर्च उचलावा लागतो. ही भागीदारी घनकचरा व्यवस्थापनात सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलचे महत्त्व अधोरेखित करते. सॅनिटरी कचरा उच्च-तापमानात जाळण्यामुळे आरोग्य धोके आणि दूषितता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, विशेषतः कचरा हाताळणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होत आहे. सॅनिटरी कचरा उघड्यावर टाकणे बंद करून, शहराने पर्यावरणाचा ऱ्हास रोखला आहे आणि रोगांचा प्रसार रोखला आहे.
कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, जनजागृती वाढवणे आणि अधिक परिणामकारक पायाभूत सेवासुविधांची निर्मिती या उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे कराडने अपुर्या स्वच्छता कचरा व्यवस्थापनामुळे निर्माण होणारे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय धोके टाळले आहेत. यामुळे केवळ शहराच्या स्वच्छतेतच हातभार लागत नाही तर रहिवाशांचे, विशेषतः महिलांचे, जीवनमान सुधारण्यास मदत होते, ज्यांच्या आरोग्यावर सॅनिटरी कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या आव्हानांचा सर्वात जास्त परिणाम होतो.
* * *
G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122065)
Visitor Counter : 34