वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'जेम' अर्थात गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस उपक्रमातून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सुमारे 1.3 कोटी लोकांना मिळाले विमा कवच


आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 'जेम 1' ने दशलक्ष लोकांना सेवेत रुजू केले

Posted On: 16 APR 2025 12:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2025 

 

सार्वजनिक खरेदीसाठी भारतातील सर्वात मोठे ई-मार्केटप्लेस असलेले गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस 'जेम'ने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सेवा पुरवठ्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 10 लाख मनुष्यबळाची भरती करण्याव्यतिरिक्त, 'जेम' ने आरोग्य, जीवन आणि वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी समाविष्ट करून 1.3 कोटींहून अधिक व्यक्तींना यशस्वीरित्या विमा उपलब्ध करून दिला आहे.

विमा पॉलिसी खरेदीत अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि किफायतशीरता आणण्याच्या दृष्टीने 'जेम' ने जानेवारी 2022 मध्ये विमा सेवा श्रेणी सुरू केली. यासाठी केवळ भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) - मान्यताप्राप्त सेवा प्रदात्यांनाच सहभागी करून घेतले गेले. या व्यासपीठाच्या माध्यमातून खरेदीदार संस्था अखंडपणे ग्रुप मेडिक्लेम, वैयक्तिक अपघात आणि मुदत विमा पॉलिसी मिळवू शकतात, ज्यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना आर्थिक सुरक्षा मिळते.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोलताना 'जेम' चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भादू म्हणाले, "सुविहित, सुरक्षित आणि कमी खर्चिक असे खरेदीचे माध्यम म्हणून या व्यासपीठाच्या सेवा वृद्धिंगत कार्यासाठी जेम वचनबद्ध आहे. 1.3 कोटी विमाधारकांच्या उद्दिष्टपूर्तीतून, केंद्र सरकारी संस्थांच्या विमा विषयक गरजांसाठी 'जेम' चा लाभ घेण्यातील वाढता विश्वास तसेच सार्वजनिक खरेदीत एक परिवर्तनकारी भूमिका बजावण्यात जेम ने केलेली कामगिरी प्रतिबिंबित होते, असे ते म्हणाले.

'जेम' च्या विमासेवांचा एक प्रमुख फायदा म्हणजे याअंतर्गत सरकारी खरेदीदार आणि विमा प्रदाता कंपन्यांमध्ये कोणाही मध्यस्थाशिवाय थेट व्यवहार घडून येतो.

या सुव्यवस्थित दृष्टिकोनामुळे प्रक्रियेला उल्लेखनीय गती मिळाली आहे त्याचबरोबर विमा प्रीमियम देखील कमी झाला आहे ज्यामुळे सरकारी संस्थांच्या खर्चात बचत झाली आहे.

जीवन आणि आरोग्य विम्याच्या पलीकडे, या प्लॅटफॉर्मने मालमत्ता विमा, वाहतूक आणि सागरी विमा, दायित्व विमा, पशुधन विमा, मोटार विमा, पीक विमा आणि सायबर विमा यासारख्या विमा सेवांची विस्तृत श्रेणी समाविष्ट करुन आपल्या विमा सेवांचा विस्तार केला आहे. सेवांच्या या विस्तृत श्रेणींमुळे सरकारी खरेदीदारांना विमा सेवांचा लाभ घेताना एकल, पारदर्शक आणि कार्यक्षम व्यासपीठाद्वारे  सर्वांना सुलभ आणि किफायशीर विमाविषयक सेवा पूर्ण करण्याची हमी मिळते.

 

* * *

G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2122034) Visitor Counter : 32