संरक्षण मंत्रालय
आफ्रिका-भारत यांच्यातील महत्वपूर्ण संयुक्त सागरी सराव - AIKEYME 2025
Posted On:
12 APR 2025 12:00PM by PIB Mumbai
भारत आणि आफ्रिका देशातील मोठ्या व्याप्तीचा बहुस्तरीय संयुक्त सराव अर्थात AIKEYME (Africa India Key Maritime Engagement - AIKEYME) या सागरी सराव उपक्रमाचे पहिले पर्व 13 ते 18 एप्रिल 2025 दरम्यान होणार असेल. हा सागरी उपक्रम सहा दिवस चालणार आहे. भारत आणि टांझानिया संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन करणार आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वात सह-यजमान भारत आणि टांझानिया सोबत कोमोरोस, जिबूती, केनिया, मादागास्कर, मॉरिशस, मोझांबिक, सेशेल्स आणि दक्षिण आफ्रिका हे देशही सहभागी होणार आहेत. AIKEYME या शब्दाचा संस्कृतमधील अर्थ एकता असा आहे. या बहुपक्षीय सरावाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन सहा दिवसांसाठी केले जाणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या, आफ्रिकेतील प्रदेशांमधील सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर सामायिक आणि सर्वंकष प्रगती (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions - MAHASAGAR) अर्थात महासागर या दृष्टिकोनाला सुसंगत स्वरुपातच या सरावाचे आयोजन केले गेले आहे.
या सरावात भारताची विनाशिका आयएनएस चेन्नई आणि लष्करी सामग्री वाहक (Landing Ship Tank) आयएनएस केसरी हे मोठे जहाज सहभागी होणार आहे. आयएनएस चेन्नई 10 एप्रिल रोजी तर आयएनएस केसरी हे जहाज 11 एप्रिल 2025 रोजी दार-एस-सलाम येथे पोहोचले आहे. टांझानियातील संरक्षण दूत (DA Tanzania - Defence Attaché in Tanzania) आणि संपर्क पथकाने जहाजांचे स्वागत केले. यावेळी आयएनएस चेन्नईवर टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्स आणि भारतीय नौदलाच्या बँडने एकत्रितपणे दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतांची धून वाजवत औपचारिक मानवंदना दिली. या जहाजावरच टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्स सोबत (Tanzanian Peoples' Defence Force - TPDF) एकत्रितपणे AIKEYME सरावाचा उद्घाटन समारंभ होणार आहे.
AIKEYME 25 सरावादरम्यान बंदरावरील सरावाच्या टप्प्याअंतर्गत उद्घाटन समारंभ होईल, तसेच भारताचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि टांझानियाचे संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिक स्वागत समारंभ होणार आहे.
या टप्प्यातील नियोजित प्रमुख उपक्रमाअंतर्गत टेबल टॉप एक्सरसाइज (चर्चा करून कृती आराखडा ठरवण्याचा सराव) आणि कमांड पोस्ट एक्सरसाइज (मुख्यालयाचे आदेश आणि नियोजनावर आधारित युद्धसराव) यांचा समावेश आहे. या सरावांअंतर्गत चाचेगिरी विरोधी मोहिमा (anti-piracy operations) आणि माहितीची देवाणघेवाण या बाबींवर भर दिला जाणार आहे. यासोबतच टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्स (TPDF) च्या सहकार्याने एकत्रितपणे सीमनशिप (जहाज चालवण्याचे, बांधणीचे आणि देखरेखीचे कौशल्य) आणि व्हिजिट, बोर्ड, सर्च अँड सीझर (VBSS) सराव (संशयित जहाजांवर जाऊन तपासणी आणि जप्ती करण्याची प्रक्रिया) प्रशिक्षण उपक्रमही राबवला जाणार आहे. मैत्रीपूर्ण संबंध वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने क्रीडा स्पर्धा तसेच योग सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे. स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने हार्बर टप्प्यातील (जहाज बंदरात असताना) सरावाच्या काळात, भारतीय नौदलाची जहाजे सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुली असणार आहेत.
16 ते 18 एप्रिल 2025 दरम्यान प्रत्यक्ष समुद्रातील सरावाचा टप्पा पार पडेल. याअंतर्गत या सरावात सहभागी झालेल्या सागरी प्रदेशातील राष्ट्रांमध्ये सागरी सुरक्षा विषयक परस्पर सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रादेशिक सागरी प्रदेशातील परस्पर सामायिक आव्हानांवर सहकार्यात्मक उपाययोजना विकसित करणे हाच AIKEYME 25 या सरावाचा उद्देश आहे. भारतीय नौदलाचा या क्षेत्रासाठीचा हा पहिलाच उपक्रम असून, भागीदार देशांच्या नौदलांमधील परस्पर सहकार्य वाढवणे आणि संयुक्त नौदल मोहिमांसाठी परस्पर समन्वयित कार्यक्षमतेचा विकास करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भारत आणि आफ्रिकन देशांमधील दृढ तसेच मैत्रीपूर्ण संबंधही ठळकपणे अधोरेखित होणार आहेत.
हिंद महासागरीय जहाज सागर म्हणून 05 एप्रिल 2025 रोजी कारवारहून रवाना झालेले आयएनएस सुनयना हे भारताचे आणखी एक जहाज AIKEYME 25 मध्ये सहभागी होणार आहे.
(3)AVWC.jpg)
(3)V67F.jpg)
(3)MYSQ.jpg)
***
M.Pange/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121302)
Visitor Counter : 38